Ad Advertisement Ad Advertisement

Living Funeral Ceremony : 80 वर्षीय वृद्धाने जिवंतपणीच उरकले स्वतःच्या तेराव्याचे विधी; 900 जणांसाठी स्नेहभोजन

विवाहित मुलीवर अंत्यसंस्कार आणि तेराव्याचा खर्च पडू नये या भावनेतून बागपतच्या चौधरी बलजोर सिंह यांनी घेतला निर्णय

बागपत : Living Funeral Ceremony पारंपरिक प्रथांनुसार एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर तेराव्या दिवशी तेराव्याचा विधी आणि सामूहिक स्नेहभोजनाचे आयोजन केले जाते. मात्र, आपल्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार आणि तेराव्याच्या धार्मिक विधींचा भार आपल्या एकुलत्या एका मुलीवर पडू नये, या विचारातून उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील एका ८० वर्षीय वृद्धाने चक्क जिवंतपणीच स्वतःचा तेरावा उरकला आहे. जोहडी गावात राहणारे चौधरी बलजोर सिंह असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून, या अनोख्या सोहळ्याची सध्या संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

मुलीवरील जबाबदारी कमी करण्यासाठी घेतलेला निर्णय

चौधरी बलजोर सिंह यांच्या पत्नीचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांना मुलगा नसून पिंकी नावाची एकच विवाहित मुलगी आहे, जिला तीन मुले आहेत. आपल्या निधनानंतर पारंपरिक अंत्यसंस्कार आणि तेराव्याच्या खर्चाचा ताण आपल्या विवाहित मुलीवर येऊ नये, अशी बलजोर सिंह यांची इच्छा होती. त्यामुळे मृत्यूपूर्वीच सर्व धार्मिक विधी आणि स्नेहभोजन स्वतःच्या देखरेखीखाली पार पाडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याबाबत बोलताना बलजोर सिंह म्हणाले की, मला मुलगा नाही. त्यामुळे माझ्या पश्चात मुलीवर या सर्व जबाबदाऱ्यांचा अनावश्यक भार पडू नये, असे मला वाटले. म्हणूनच मी जिवंतपणीच हे सर्व विधी पूर्ण करत आहे.

९०० पाहुण्यांची उपस्थिती आणि स्नेहभोजन

जोहडी गावात पार पडलेल्या या तेराव्याच्या कार्यक्रमाला ग्रामस्थ, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्याला उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री के. पी. मलिक यांनीही विशेष हजेरी लावली होती. सुमारे ९०० जणांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आणि बलजोर सिंह यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नातवाकडे सोपवली कुटुंबाची धुरा आणि जमीन

या कार्यक्रमात एक अत्यंत भावनिक आणि महत्त्वपूर्ण क्षण पाहायला मिळाला. बलजोर सिंह यांनी आपला १० वर्षीय नातू मुकुल याच्या डोक्यावर पारंपरिक पगडी बांधून कुटुंबाची जबाबदारी पुढील पिढीकडे सोपवल्याचे प्रतीक दाखवले. विशेष म्हणजे, त्यांनी आपली २० गुंठे जमीन यापूर्वीच नातू मुकुलच्या नावावर केल्याची माहितीही दिली.

मुलीने व्यक्त केले समाधान

वडिलांच्या या आगळ्यावेगळ्या निर्णयाबाबत मुलगी पिंकी हिने पूर्ण समाधान आणि आनंद व्यक्त केला. मी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, मला भाऊ नाही. वडिलांनी स्वतःच्या हयातीतच स्वतःचा तेरावा करण्याचा निर्णय घेतला, याचा मला आनंद आणि अभिमान वाटत आहे, अशी प्रतिक्रिया पिंकी यांनी दिली.

Read About : Qualcomm Layoffs – नोकरी गेली, पण इंजिनिअर खूश!

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.