Ad Advertisement Ad Advertisement

Teghaza 001 Martian Meteorite – सहारा वाळवंटात सापडलेला उल्कापिंड निघाला मंगळावरचा!

मालीतील सहारा वाळवंटात २०२२ मध्ये सापडलेल्या दोन पौंड वजनाच्या गुलाबी खडकाची मंगळावरील उल्कापिंड म्हणून ओळख

वॉशिंग्टन : Teghaza 001 Martian Meteorite माली देशातील सहारा वाळवंटात सापडलेला एक रहस्यमय गुलाबी दगड हा मंगळ ग्रहाचा एक दुर्मिळ तुकडा असल्याचे निष्पन्न झाले आहे. २०२२ मध्ये सापडलेला हा सुमारे दोन पौंड वजनाचा खडक ४.१ अब्ज वर्षांपूर्वी तयार झाला असावा, असे मानले जाते. ‘पीपल’ वेबसाईटने शास्त्रज्ञांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या शोधामुळे मंगळ ग्रह त्याच्या सुरुवातीच्या काळात कसा दिसत होता आणि ग्रहावर पाण्याचा प्रवाह कसा होता, हे समजण्यास मदत होऊ शकते. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) नुसार, हा उल्कापिंड पृथ्वीवर आतापर्यंत सापडलेल्या मंगळाच्या सर्वात जुन्या तुकड्यांपैकी एक आहे. हे निष्कर्ष ‘सायन्स’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.

माली देशातील ज्या मिठाच्या आगारावर हा उल्कापिंड सापडला, त्याच्या नावावरून त्याला ‘तेघाझा ००१’ असे नाव देण्यात आले आहे. नासाच्या मते, मंगळावरून आलेल्या सुमारे ४३५ ज्ञात उल्कापिंडांपैकी हा एक आहे. संशोधकांना या खडकाची बारकाईने तपासणी केल्यानंतरच तो असामान्य असल्याचे लक्षात आले, असे या अभ्यासाचे प्रमुख संशोधकआणि जेपीएल येथील शास्त्रज्ञ यांग लिऊ यांनी सांगितले. या शोधनिबंधाच्या एका समीक्षकाने त्याचे वर्णन मंगळासाठीचा ‘रोझेटा स्टोन’ असे केले आहे. शास्त्रज्ञांना उल्कापिंडात आढळलेल्या विविध खनिजांमध्ये विशेष रस होता. ही खनिजे मंगळाच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यात झालेल्या घडामोडींचा पुरावा देतात.

कसा आहे उल्कापिंड?

मंगळवरील हा उल्कापिंड इतर प्राचीन मंगळावरील उल्कापिंडांप्रमाणे नसून, त्यात वितळलेल्या खडकांपासून तयार झालेली अनेक प्रकारची खनिजे आहेत. अब्जावधी वर्षांपूर्वी गरम, वितळलेले पदार्थ थंड झाल्यावर मंगळाचा बाह्य खडकाळ थर कसा विकसित झाला, हे समजून घेण्यास या निष्कर्षांमुळे शास्त्रज्ञांना मदत होऊ शकते.

या अभ्यासाचे दुसरे संशोधक आणि नासाच्या एम्स रिसर्च सेंटरमधील शास्त्रज्ञ ली सेपर म्हणाले की, हा उल्कापिंड मंगळाच्या कवचाचा असा पहिला नमुना आहे, ज्याचा शास्त्रज्ञांनी यापूर्वी अभ्यास केलेला नाही. या खडकात पाणी खडकांशी कसे आंतरक्रिया करत होते याची नोंद आहे आणि त्यात मंगळावरून पाणी नष्ट होत असतानाच्या काळातील वातावरणाचे संकेतही असू शकतात.

जेव्हा शक्तिशाली आघातांमुळे मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाचे तुकडे अवकाशात फेकले जातात, तेव्हा मंगळावरून येणाऱ्या उल्का पृथ्वीवर पोहोचतात. यांपैकी काही तुकडे अखेरीस पृथ्वीच्या दिशेने प्रवास करतात. शास्त्रज्ञ मंगळावरील उल्कापिंडांची रासायनिक रचना अभ्यासून आणि नासाच्या मंगळ मोहिमांमधून गोळा केलेल्या माहितीशी तुलना करून त्यांची ओळख पटवतात, असे नासाने स्पष्ट केले आहे.

पाण्यामुळे दगडात बदल

‘तेघाझा ००१’ च्या बाबतीत, न्यू मेक्सिको विद्यापीठातील संशोधकांनी प्रथम त्याच्या ऑक्सिजन समस्थानिकांची तपासणी करून ते मंगळावरून आले असल्याची पुष्टी केली. नंतर जेपीएलमधील यांग लिऊ आणि त्यांच्या टीमने कॅलटेकचे शास्त्रज्ञ फ्रान्सुआ टिसॉट यांच्यासोबत या संशोधनात सहभाग घेतला. या अभ्यासात आढळून आले की सुमारे ४.१ अब्ज वर्षांपूर्वी पाण्याने खडकात बदल घडवला होता. याचा अर्थ असा की, उल्कापिंड त्यापूर्वी तयार झाले असावे.

Read About : Cellophane Bees Natural Plastic : मधमाश्या शरीरातून तयार करतात नैसर्गिक प्लास्टिक; मातीत अवघ्या काही महिन्यांत होते विघटन
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.