Ad Advertisement Ad Advertisement

Father Throws Two Sons into Jayakwadi Canal – चॉकलेट, वडापावचे आमिष दाखवून 2 मुलांना जायकवाडीच्या कालव्यात फेकले

जन्मदात्या पित्याचे दुष्कृत्य : पैठण तालुक्यातील घटना, मुलांचा शोध सुरू

पाचोड (ता.पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) Father Throws Two Sons into Jayakwadi Canal : चॉकलेट आणि वडापाव खाण्याचे आमिष दाखवून जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या दोन चिमुकल्या मुलांना दुचाकीवरून बाहेर नेले आणि जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकून दिले. ही घटना नांदर (ता. पैठण) येथे सोमवारी (दि. १६) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. श्याम रोडगे (५) व आर्यन रोडगे (७) अशी या चिमुकल्यांची नावे आहेत. घटनेनंतर पाचोड पोलिसांनी संशयित आरोपी पिता सोमनाथ दामोदर रोडगे (४०, रा. नांदर, ता. पैठण) याला ताब्यात घेतले असून, दोन्ही मुलांचा शोध सुरू आहे.

नांदर येथील सोमनाथ रोडगे याने सोमवारी सायंकाळी आपली दोन मुले श्याम व आर्यन यांना चॉकलेट आणि वडापाव खाऊ घालण्याचे तसेच बाहेर फिरवून आणण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर दोघांना आपल्या स्कूटीवर बसवून तो जायकवाडीच्या डाव्या कालव्याजवळ घेऊन गेला. तिथे त्याने दोन्ही चिमुकल्यांना कालव्यात फेकून दिले. यावेळी दोन्ही मुले ‘पप्पा, आम्ही मरू, असे करू नका ना!’ अशी विनवणी करीत होते. मात्र, संशयित आरोपी पित्याला त्यांची दया आली नाही. दरम्यान, कालव्यावर विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या काही शेतकऱ्यांनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला.

त्यांनी आरोपीला जाब विचारत, ‘असे काय करतोस? अरे, तू काय मूर्ख आहेस?’ असे म्हणत मुलांच्या नात्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांच्याच दिशेने दगडफेक केली आणि शिवीगाळ केली. या घटनेची माहिती काही नागरिकांनी तातडीने पाचोड पोलिसांना दिली.

पित्याने दुष्कृत्याची पोलिसांना दिली कबुली

माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि सोमनाथ रोडगे याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने दोन्ही मुलांना कालव्यात फेकल्याची कबुली दिली. पोलिसांनी सोमवारी रात्रीपासूनच कालव्यात दोन्ही चिमुकल्यांचा शोध सुरू केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता. या घटनेने नांदर परिसरात एकच खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे. त्याने त्याच्या दोन मुलांना कालव्यात फेकून दिले असून मुलांचा शोध सुरू आहे.
– सचिन पंडित, सहायक पोलीस निरीक्षक, पाचोड पोलीस ठाणे

Read About : MS Dhoni IPL Retirement – ‘एमएस धोनीशिवाय चेन्नई सुपर किंग्स नाही’; 19 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीला पूर्णविराम
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.