Ad Advertisement Ad Advertisement

Sachin Tendulkar Batography Exhibition – वानखेडेवर सचिनची ‘बॅटोग्राफी’

क्रिकेट प्रवासातील २५ बॅट्स आणि वैयक्तिक वस्तू पाहण्याची संधी; एमसीएकडून कारकीर्दीचा अनोख्या पद्धतीने गौरव

मुंबई :Sachin Tendulkar Batography Exhibition मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एक नव्हे, तर क्रिकेट प्रवासातील तब्बल २५ बॅट्स आणि वैयक्तिक वस्तू पाहण्याची संधी चाहत्यांना उपलब्ध झाली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने (एमसीए) एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयात सचिनच्या बॅट्चा संग्रह असलेल्या ‘बॅटोग्राफी’ या अनोख्या दालनाचे सोमवारी सचिनच्या हस्ते अनावरण करण्यात आले. १९७८ ते २०१३ या कालावधीतील आपल्या आवडत्या बॅटस आणि वैयक्तिक वस्तूची माहिती सांगताना सचिन जुन्या आठवणीत रमल्याचे पाहण्यास मिळाले.

‘बॅटोग्राफी’ची सुरुवात १९७८ मध्ये वयाच्या पाचव्या वर्षी त्यांची मोठी बहीण सविता यांनी भेट दिलेल्या काश्मीर विलोच्या बॅटपासून होते, तर वानखेडेवर खेळलेल्या त्यांच्या अखेरच्या कसोटी डावातील बॅटने प्रवासाची सांगता होते. या संग्रहातील काही अत्यंत महत्त्वाच्या बॅट्समध्ये १९९० मध्ये वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी मँचेस्टर येथे पहिले कसोटी शतक झळकावण्यासाठी वापरलेली बॅट, १९९८ मध्ये सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी भेट दिलेली विशेष बॅट, २००३ आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात वापरलेली बॅट तसेच १६ मार्च २०१२ रोजी मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १०० शतक झळकावण्यासाठी वापरलेल्या बॅटचा समावेश आहे.

वानखेडेवर २७ नोव्हेंबर १९८३ रोजी १० वर्षांच्या सचिनने पहिल्यांदा कसोटी सामना पाहिला होता आणि आपला आदर्श खेळाडू व्हिव्हियन रिचर्ड्सला शतक झळकावताना पाहिले होते. सचिन आपल्या कुटुंबीयासह या अनावरण सोहळ्याला उपस्थित होता. या वेळी सचिन म्हणाला, २४ वर्षे माझे आयुष्य २२ यार्डच्या खेळपट्टीभोवती फिरत होते आणि या संपूर्ण प्रवासात माझ्या बॅट्स कायम माझ्यासोबत होत्या. या आठवणीतल्या बॅट्स नेहमी माझ्या हातांचाच एक भाग असल्यासारख्या वाटते.

प्रत्येक बॅटसोबत एखाद्या विशिष्ट टप्प्याच्या, ड्रेसिंग रूमच्या, खेळपट्टीच्या किंवा प्रेक्षकांच्या जल्लोषाच्या आठवणी जोडलेल्या आहेत. वानखेडे मैदानावर माझ्या प्रवासाची सुरुवात झाली आणि त्याच ठिकाणी या सर्व बॅट्स एकत्र पाहणे खूप आनंददायी आहे, असे म्हणताना सचिनने एमसीए आणि अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या प्रयत्नांमुळे ‘बॅटोग्राफी’ शक्य झाल्याची भावना व्यक्त केली.

पहिले हेल्मेट, रणजी संघाची जर्सी…

बॅट्सच्या या संग्रहाला तेंडुलकर यांच्या कारकीर्दीतील महत्त्वपूर्ण क्षणांची आठवण करून देणाऱ्या विविध स्मृतिचिन्हांची जोड देण्यात आली आहे. यामध्ये त्यांचे पहिले हेल्मेट, मुंबई रणजी करंडक संघाची जर्सी, त्यांच्या २०० व्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाची जर्सी आणि हेल्मेट, तसेच वानखेडेवर झालेल्या निरोपाच्या भाषणादरम्यान त्यांनी संदर्भासाठी वापरलेले कागदी पान यांचा समावेश आहे.

Read About : Jay Shah Re-Elected ICC Chairman – जय शाह ‘कॅप्टन’ पदी कायम
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.