Ad Advertisement Ad Advertisement

Data Center Expansion : भारतात ३.५ कोटी चौरस फूट वेअरहाउसिंग जागेची मागणी निर्माण होणार; हैदराबाद-मुंबईला सर्वाधिक फायदा

AI, क्लाउड आणि डिजिटायझेशनमुळे डेटा सेंटर क्षेत्राला वेग; २०३० पर्यंत क्षमता ७ गिगावॅटवर पोहोचण्याचा अंदाज

नवी दिल्ली : Data Center Expansion भारताचे वेगाने वाढणारे डेटा सेंटर क्षेत्र वर्ष २०३० पर्यंत देशाच्या औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स रिअल इस्टेट बाजारपेठेसाठी एक मोठी संधी ठरणार आहे. डेटा सेंटर उद्योगाच्या विस्तारामुळे २०३० पर्यंत सुमारे ३ कोटी ते ३.५ कोटी चौरस फूट अतिरिक्त वेअरहाउसिंग (गोदाम) जागेची मागणी निर्माण होऊ शकते, असे प्रॉपर्टी कन्सल्टिंग फर्म सॅव्हिल्स इंडियाच्या प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे.

अहवालानुसार, भारतातील ऑपरेटर-आधारित डेटा सेंटरची क्षमता २०३० पर्यंत वाढून ७ गिगावॅट आयटी पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. वाढते डिजिटायझेशन, क्लाउडचा वापर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित कामे, सरकारची अनुकूल धोरणे आणि डेटाचा वाढता वापर यामुळे या क्षेत्राला मोठी गती मिळत आहे.

डेटा सेंटर उद्योगाचा हा विस्तार केवळ डेटा सेंटर परिसरांपुरता मर्यादित राहणार नाही, तर ज्या भागात मोठे डेटा सेंटर क्लस्टर विकसित होत आहेत, तिथे ग्रेड-ए वेअरहाउसिंग सुविधांची मागणीही वेगाने वाढेल. अहवालानुसार, डेटा सेंटरच्या प्रत्येक १ मेगावॅट आयटी क्षमतेसाठी सरासरी ६,००० ते ७,००० चौरस फूट सहायक वेअरहाउसिंग जागेची गरज भासते. बांधकाम टप्प्यात उपकरणांचा साठा करणे, साहित्य व्यवस्थापन आणि कामकाज सुरू झाल्यानंतर देखभाल व दुरुस्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या गोदामांचा वापर केला जातो.

सॅव्हिल्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स) श्रीनिवास एन. म्हणाले की, डेटा सेंटर कॅम्पसव्यतिरिक्त, उपकरणे साठवणूक, स्थापना आणि दैनंदिन कामकाजासाठी सहायक परिसंस्थेला योग्य ठिकाणी वेअरहाउसिंगची आवश्यकता भासेल. डेटा सेंटर क्षेत्राच्या वाढीमुळे देशांतर्गत उत्पादनालाही चालना मिळेल, ज्यामुळे औद्योगिक जमीन आणि विशेष उत्पादन सुविधांची मागणी वाढेल, असेही त्यांनी नमूद केले. भौगोलिकदृष्ट्या हैदराबाद आणि मुंबई या संधीचे सर्वात मोठे लाभार्थी ठरू शकतात.

Read About : AI in Banking : एआय बँकिंग क्षेत्राचे अर्थशास्त्र बदलणार; सुरुवातीच्या टप्प्यात वापर करणाऱ्या बँकांना 3 पट परताव्याचा अंदाज
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.