Ad Advertisement Ad Advertisement

Moonshot AI – चीनची मूनशॉट एआय कंपनी वैज्ञानिक संशोधनाच्या शर्यतीत; जीवशास्त्र आणि औषधनिर्मितीवर विशेष लक्ष

अमेरिकन कंपन्यांना टक्कर देण्यासाठी चीनची नवी रणनीती; Kimi AI मॉडेलद्वारे जैववैद्यकीय संशोधनात मोठी झेप

बीजिंग : Moonshot AI किमी या एआय मॉडेल्सची निर्मिती करणाऱ्या चीनच्या मूनशॉट एआय या स्टार्टअपने आता वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. एआयला संशोधनाचे प्रभावी माध्यम बनवण्याच्या स्पर्धेत अमेरिकन कंपन्यांना टक्कर देण्यासाठी कंपनीने जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि औषधनिर्मिती क्षेत्रातील प्रगत संशोधनावर लक्ष केंद्रित केले आहे.

लिस्बन येथील वेब समिट तंत्रज्ञान परिषदेत बोलताना मूनशॉटचे आंतरराष्ट्रीय संचालक जियाकोमो फिकारी म्हणाले की, कोडिंग क्षेत्रातील तांत्रिक प्रगती आता स्थिरावत चालली असून खरा उत्साह विज्ञानाच्या क्षेत्रात आहे. ओपनएआय गणितावर अधिक लक्ष देत असताना, मूनशॉट कंपनी जीवशास्त्र आणि रसायनशास्त्रातील संशोधनावर भर देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जैववैद्यकीय संशोधनासाठी नवी भागीदारी

कंपनीने आपल्या या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. बीजिंगमधील डीपी टेक्नॉलॉजी या स्टार्टअपने जैववैद्यकीय संशोधनासाठी मूनशॉटचे ‘किमी के 3.1 प्रो हे मॉडेल आपल्या संशोधन प्रणालीत समाविष्ट केले आहे. एका चाचणीदरम्यान, या एआय प्रणालीने उंदराच्या स्वादुपिंडातील ३,६९६ पेशींच्या जनुकीय डेटाचे विश्लेषण करून पुढील संशोधनासाठी १०० संभाव्य जनुके अवघ्या ९० मिनिटांत शोधून काढली. मानवी संशोधकांना हेच काम करण्यासाठी सुमारे चार तास लागले असते.

संशोधनातील मर्यादा आणि वास्तव

एआय मॉडेल्स वेळखाऊ डेटा विश्लेषणाचे काम वेगाने करू शकत असले, तरी ते स्वत:हून एखादा मोठा वैज्ञानिक शोध लावण्यास अद्याप सक्षम नाहीत. मूनशॉटचे संस्थापक यांग झिलिन आणि प्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ अँर्ड्यू याओ यांच्या अलीकडील संशोधन पेपरमधूनही हीच बाब समोर आली आहे. १०० कठीण गणितीय आणि संगणकीय समस्यांच्या चाचणीत आघाडीचे एआय मॉडेल्स संशोधकांना मदत करू शकले, परंतु एकही मॉडेल स्वतंत्रपणे अनुत्तरित गणितीय कोडी सोडवू शकले नाही.

Read About : London Experts Cancer Surgeries – लंडनच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घाटीत तीन मोठ्या शस्त्रक्रिया
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.