जेन्सन हुआंग यांच्या राजीनाम्याचे जागतिक पडसाद, स्पर्धक कंपन्याही वर्चस्वासाठी सज्ज, एनव्हिडियाच्या पुढील नेतृत्वाबाबत चर्चा; संजय मेहरोत्रा, निकेश अरोरा आणि थॉमस कुरियन यांच्या नावांची चर्चा
सॅन फ्रान्सिस्को : NVIDIA CEO Succession चिनी हेरगिरीचा संशय असलेल्या महिलेशी असलेल्या संबंधांमुळे ‘एनव्हीडिया’चे सीईओ जेन्सन हुआंग यांनी दिलेल्या राजीनाम्याने जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्रांतीचे सर्वात मोठे प्रचारक मानल्या जाणाऱ्या हुआंग यांच्या पतनामुळे या तंत्रज्ञानाभोवती असलेल्या उत्साहावर पाणी फिरण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे, एनव्हीडियामधील या अस्थिरतेचा फायदा उठवण्यासाठी ब्रॉडकॉम, इंटेल आणि एएमडी यांसारख्या स्पर्धक चिप उत्पादक कंपन्या सज्ज झाल्या आहेत.
एआय मॉडेल्स प्रशिक्षित करण्यासाठी लागणाऱ्या संगणकीय चिप्सच्या बाजारपेठेत एनव्हीडियाची आतापर्यंत एकतर्फी मक्तेदारी होती. वर्षाच्या अखेरीस कंपनीकडे १ ट्रिलियन डॉलर्सच्या ऑर्डर्स असतील, असा अंदाज हुआंग यांनी मार्चमध्ये वर्तवला होता. मात्र, त्यांच्या राजीनाम्यानंतर गुरुवारी गुंतवणूकदारांनी स्पर्धक कंपन्यांकडे मोर्चा वळवला.
स्पर्धकांचे शेअर्स वधारले
ग्राहक आता एकाच कंपनीवर अवलंबून न राहता पुरवठादारांमध्ये विविधता आणतील, या अंदाजाने ब्रॉडकॉम, इंटेल आणि एएमडीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली.
मक्तेदारी संपण्याची शक्यता
वेस्ट मन्रो संस्थेचे मुख्य एआय अधिकारी ब्रेट ग्रीनस्टीन यांच्या मते, यामुळे बाजारपेठेतील एकाधिकारशाही संपून पुन्हा निकोप स्पर्धा सुरू होईल आणि ग्राहकांना अधिक पर्याय मिळतील.
चीनची होणार कोंडी
अमेरिकी चिप्सच्या निर्यातीवर आता अधिक कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता असून, त्याचा फायदा चिनी चिप उत्पादक कंपनी ‘हुआवे’ला होऊ शकतो. मात्र, चीनमधील एआय डेव्हलपर्स अजूनही एनव्हीडियाच्या प्रणालीवर अवलंबून असल्याने त्यांच्यासाठी ही दुहेरी कोंडी ठरली आहे.
राजनैतिक आणि धोरणात्मक पोकळी
सॅम ऑल्टमन, डेमिस हसाबिस आणि जेफ्री हिंटन यांच्याप्रमाणेच जेन्सन हुआंग हे एआयचे जागतिक पातळीवरील अत्यंत प्रभावशाली चेहरा होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते आणि एआयवर सौम्य नियमन असावे, असा त्यांचा आग्रह होता. वॉशिंग्टन आणि बीजिंग या दोन्ही ठिकाणी थेट संवाद साधणारे ते मुख्य धोरणकर्ते होते. त्यांच्या जाण्याने एनव्हीडियाच्या तांत्रिक नेतृत्वापेक्षाही त्यांच्या राजनैतिक आणि व्यावसायिक कौशल्याची मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
‘अँथ्रोपिक’च्या ‘आयपीओ’वर टांगती तलवार
एनव्हीडियाने आपल्याच चिप्स खरेदी करणाऱ्या अनेक एआय कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अंतरिम सीईओ कोलेट क्रेस या धोरणाच्या मुख्य शिल्पकार होत्या, मात्र आता या ‘वर्तुळाकार निधी’ प्रवाहावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अनेक तंत्रज्ञान कंपन्यांनी आता निधी उभारणीसाठी पर्यायी योजनांवर काम सुरू केले आहे. या घडामोडींचा थेट परिणाम ‘अँथ्रोपिक’ सारख्या १.३ ट्रिलियन डॉलर्स मूल्यांकन असलेल्या कंपनीच्या आगामी आयपीओवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांनंतर डेटा सेंटर्स आणि एआय नियमांबाबत कठोर भूमिका घेणारे नेते पुढे आल्याने आगामी काळ या उद्योगासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे.
हुआंग म्हणजे एनव्हीडियाचे एकखांबी तंबू
हुआंग यांना एनव्हीडियातील ६० हून अधिक अधिकारी थेट दैनंदिन कामाचा अहवाल देत असत आणि संपूर्ण कंपनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती केंद्रित होती. त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने एनव्हीडियासमोर वारसदाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी १७ नोव्हेंबर रोजी कंपनीचे तिमाही निकाल जाहीर होणार असून, १८ नोव्हेंबर रोजी कोलेट क्रेस कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
प्रसिद्ध लेखक ताय किम यांनी सुचवली वारसदारांची नावे
दीर्घकाळ ‘एनव्हीडिया’चे नेतृत्व करणारे जेन्सन हुआंग यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या भविष्याबाबत तंत्रज्ञान विश्वात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आपल्या दिग्गज नेत्याशिवायही एनव्हीडिया यशस्वीपणे प्रगती करत राहील, असा विश्वास प्रसिद्ध लेखक ताय किम यांनी व्यक्त केला आहे. ‘द एनव्हीडिया वे’ या पुस्तकाचे लेखक असलेल्या किम यांनी एनव्हीडियाच्या पुढील सीईओ पदासाठी ‘आर्म’चे सीईओ रेने हास आणि एनव्हीडियाचे उपाध्यक्ष इयान बक ही दोन सर्वात प्रबळ नावे सुचवली आहेत.
सीईओ पदासाठी तीन भारतीयांची नावे चर्चेत
एनव्हिडिया राजीनामा दिलेले मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेन्सेन हुआंग यांच्या जागी कायमस्वरूपी वारसदार शोधत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वंशाचे तीन अधिकारी या सर्वोच्च पदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून समोर आले आहेत. चर्चेत असलेल्या नावांमध्ये संजय मेहरोत्रा, निकेश अरोरा आणि थॉमस कुरियन यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त कोलेट क्रेस, इयान बक, रेने हास, लिसा सू, पॅट जेलसिंगर आणि टिम कूक यांसारख्या इतर दिग्गज तंत्रज्ञान नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. हुआंग बाजूला झाल्यानंतर, कंपनीने आपल्या मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) कोलेट क्रेस यांची अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
Read About : China Space Military Capabilities – अमेरिकेच्या अंतराळ प्रभुत्वाला चीनचा धक्का
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.