Ad Advertisement Ad Advertisement

Alexander Litvinenko Murder : पुतिन यांनी पतीची हत्या करवली – मरिना लिटविनेन्को यांचा आरोप

लिटविनेन्को यांच्या विषप्रयोगातून झालेल्या हत्येला २० वर्षे पूर्ण; रशियाला भेट दिल्यानंतर दुसऱ्या जोडीदाराचा कर्करोगाने मृत्यू झाल्याने मरिना यांनी व्यक्त केली शंका

लंडन : Alexander Litvinenko Murder रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक आणि माजी गुप्तहेर अलेक्झांडर लिटविनेन्को यांच्या क्रूर हत्येला वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी मरिना लिटविनेन्को यांनी रशिया दौऱ्यानंतर आपल्या नवीन जोडीदारालाही अचानक दुर्धर आजार जडला आणि अवघ्या दोन महिन्यांत त्यांचा मृत्यू झाला, अशी वेदना व्यक्त केली आहे.

एका विशेष मुलाखतीत आपल्या आयुष्यातील संघर्षाचा आणि दुसऱ्या जोडीदाराच्या संशयास्पद निधनाचा थरारक अनुभव त्यांनी मांडला आहे. नोव्हेंबर २००६ मध्ये लंडनमधील एका हॉटेलमध्ये अलेक्झांडर लिटविनेन्को यांना त्यांच्या दोन माजी केजीबी सहकाऱ्यांनी चहातून ‘पोलोनियम-२१०’ हे अत्यंत घातक किरणोत्सर्गी विष दिले होते. शरीरात आवश्यकतेपेक्षा दहा लाख पट जास्त विष गेल्याने २२ दिवसांच्या तीव्र यातनांनंतर त्यांचा मृत्यू झाला. ब्रिटिश चौकशी समितीने ही हत्या पुतिन यांच्याच आदेशावरून झाल्याचा निष्कर्ष काढला होता. या हत्येतील एक संशयित आंद्रेई लुगोवोय आजही रशियात मोकाट फिरत असून तो तेथे खासदार आहे, असे मरिना यांनी सांगितले.

मुलाच्या आग्रहाखातर आयुष्यात दुसरा जोडीदार

पतीच्या निधनानंतर मरिना यांनी आपला मुलगा अनातोली याचे जीवापाड संगोपन केले. मात्र, १६ वर्षांच्या अनातोलीने आपल्या आईला पुन्हा हसताना पाहण्यासाठी तिला नवीन जोडीदार शोधण्याचा आग्रह धरला. २०१० मध्ये जर्मनीत मरिना यांची ओळख अलेक्सेई नावाच्या एका रशियन रसायनशास्त्रज्ञाशी झाली. अलेक्सेई यांनी मरिना आणि अनातोलीला खूप आधार दिला, इतकेच नव्हे तर ते अलेक्झांडर लिटविनेन्को यांचाही मनापासून आदर करत असत.

पुतिन यांनी दुसऱ्यांदा लक्ष्य केले?

सुमारे आठ वर्षे एकत्र राहिल्यानंतर, अलेक्सेई यांना खोकल्याचा त्रास सुरू झाला आणि निदानात त्यांना शेवटच्या टप्प्यातील कर्करोग असल्याचे समोर आले. ऑगस्ट २०१८ मध्ये वयाच्या ६६ व्या वर्षी, निदानानंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांचे निधन झाले. विशेष म्हणजे, त्याआधी अलेक्सेई रशियाला जाऊन आले होते. आयुष्यात पुन्हा आनंदी राहण्याचा विचार केल्याची ही जणू शिक्षाच होती. अलेक्सेई रशियाला जाऊन आले होते आणि त्यांची प्रकृती इतक्या वेगाने खालावली की, पुतिन यांनी माझ्या कुटुंबाला दुसऱ्यांदा लक्ष्य तर केले नाही ना, अशी भीती आम्हा सर्वांच्या मनात निर्माण झाली होती, असे मरिना यांनी भावूक होत सांगितले.

पुतिन हे स्टॅलिनसारखेच क्रूर हुकूमशहा

सध्या ६४ वर्षांच्या असलेल्या मरिना लिटविनेन्को यांनी नुकताच युक्रेनचा दौरा केला. पुतिन यांच्या राजवटीवर टीका करताना त्या म्हणाल्या की, पुतिन हे माणूस नाहीत. त्यांनी रशियाला एका अशा तुरुंगात बदलले आहे जिथे लोक भीतीपोटी काहीही बोलू शकत नाहीत. इतिहासात पुतिन यांची नोंद सोव्हिएत हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन यांच्यासारख्याच क्रूर शासक म्हणून केली जाईल. जर पुतिन यांना युद्धगुन्ह्यांसाठी कधी पकडले गेले, तर त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयाऐवजी सर्वसामान्य रशियन जनतेने खटला चालवावा, अशी इच्छाही मरिना यांनी व्यक्त केली.

Read About : Qualcomm Layoffs – नोकरी गेली, पण इंजिनिअर खूश!
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.