मुलीच्या शिक्षणासाठी घेतले होते उसने पैसे : दुसऱ्याच्या धनादेशावर स्वत:ची सही ठोकून फसवणूक
छत्रपती संभाजीनगर : Sambhajinagar Doctor Cheating Case एका पिग्मी एजंटने जुन्या ओळखीतून मेडिकव्हर हॉस्पिटलमधील एका डॉक्टरांकडून ७ लाख रुपये हातउसने घेतले. मात्र, त्याने हे पैसे परत तर केलेच नाहीत उलट दुसऱ्या व्यक्तीचे धनादेश स्वत:ह सही करून डॉक्टरांना देत त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी १७ नोव्हेंबरला न्यायालयाच्या आदेशाने सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबादास गोपाळराव कुलकर्णी (रा. कासलीवाल मार्वल वेस्ट, बीड बायपास), असे गुन्हा दाखल झालेल्या पिग्मी एजंटचे नाव असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली. डॉ. आनंददीप ओमप्रकाश अग्रवाल (५३) हे फिर्यादी आहेत. ते सिडकोतील मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये जनरल फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. पूर्वी ते समर्थनगर येथील साई हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना आरोपी कुलकर्णी हा द्वारकादास मंत्री बँकेचा पिग्मी एजंट म्हणून दररोज पैसे जमा करण्यासाठी त्यांच्याकडे यायचा. त्या ओळखीतून जून २०२२ मध्ये कुलकर्णीने मुलीच्या उच्च शिक्षणासाठी डॉ. अग्रवाल यांच्याकडे ७ लाख रुपयांची मागणी केली. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी मेडीकव्हर हॉस्पिटलमध्येच डॉ. आनंद देशमुख व कवीस पटवारी यांच्या समक्ष त्याला ७ लाख रुपये रोख दिले होते.
ते धनादेश नेमके कोणाचे?
- सहा महिन्यांत पैसे परत करण्याचे आश्वासन देणाऱ्या आरोपी कुलकर्णीने मुदतीनंतर टाळाटाळ सुरू केली. द्वारकादास मंत्री बँक बंद पडल्याची आणि स्वत:च्या एफडी मॅच्युअर होण्याची कारणे देत त्याने वेळ मारून नेली.
- डॉक्टरांनी तगादा लावल्यावर त्याने प्रथम लोकविकास बँकेचा ७ लाखांचा विनानाव असलेला नॉन-मायकर धनादेश दिला. डॉक्टरांनी तो नाकारल्यावर त्याने द्वारकादास मंत्री बँकेचे ४ लाख आणि ३ लाख रुपयांचे दोन धनादेश देत मार्चअखेर बँकेत टाकण्यास सांगितले.
- २६ मार्च २०२६ रोजी डॉ. अग्रवाल बँकेत गेले असता, हे दोन्ही धनादेश कुलकर्णीच्या खात्याचे नसून दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे बँक व्यवस्थापकांनी स्पष्ट केले. याबाबत जाब विचारला असता कुलकर्णीने उडवाउडवीची उत्तरे देत फोन उचलणे बंद केले.
- आरोपी हा द्वारकादास मंत्री बँकेचा पिग्मी एजंट होता. त्यामुळे त्याने डॉक्टरांना दिलेले इतर व्यक्तीचे धनादेश नेमके कोणाचे होते? पिग्मी एजंट म्हणून काम करताना त्याने इतर सर्वसामान्य खातेदारांचे धनादेश स्वत:कडे ठेवून घेतले होते का? याचा तपास हवालदार भाऊसाहेब जगताप करत आहेत.
Read About : MLM Fraud in Chhatrapati Sambhajinagar – 3 वर्षांपासून फरार भामट्यांनी थाटली नवीन कंपनी; सेमिनार सुरु असताना ठोकल्या बेड्या
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.