Ad Advertisement Ad Advertisement

Jalna Groundwater Recharge Project – 66 गावांमध्ये 582 रिचार्ज शाफ्ट उभारण्याचे नियोजन

पुनर्भरणाला चालना : भूजल पातळी वाढविण्यासाठी कृत्रिम पुनर्भरणाचा उपाय, ५५९.८४ लाख रुपयांचा अंदाजित आराखडा

जालना Jalna groundwater recharge project : दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान असते. पावसाचे प्रमाण कमी झाल्यास तसेच पावसाचे पाणी जमिनीत पुरेशा प्रमाणात मुरले नाही तर भूजल पातळीवर त्याचा परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात भूजल पुनर्भरणाला चालना देण्यासाठी रिचार्ज शाफ्ट ही उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली आहे. मागील पाच वर्षांत सलग पाणीटंचाई भासलेल्या जिल्ह्यातील ६६ गावांमध्ये एकूण ५८२ रिचार्ज शाफ्ट उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी अंदाजित ५५९.८४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

राज्यात बहुतांश ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा पाणीपुरवठा प्रामुख्याने भूजलावर अवलंबून आहे. भूजल उपशासाठी विहिरी, हातपंप आणि विंधन विहिरींचा वापर केला जातो. मात्र, पावसाच्या पाण्याचे जमिनीत नैसर्गिकरीत्या होणारे पुनर्भरण कमी झाल्यास भूजल पातळी वाढण्यास मर्यादा येतात. विशेषत: उथळ आणि खोल जलधरांमध्ये कठीण खडकांचा थर असल्यामुळे काही ठिकाणी पावसाचे पाणी नैसर्गिकरीत्या जमिनीत मुरण्यास अडथळे निर्माण होतात. अशा ठिकाणी कृत्रिमरीत्या भूजल पुनर्भरण करण्यासाठी रिचार्ज शाफ्ट ही उपाययोजना उपयुक्त ठरते. या पद्धतीत पावसाचे पाणी संकलित करून विशिष्ट संरचनेच्या माध्यमातून जमिनीतील भूजल साठ्यापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली जाते.

रिचार्ज शाफ्टच्या माध्यमातून पृष्ठभागावरील गाळ काढून पाणी जमिनीत थेट पुनर्भरण करण्यास मदत होते. नैसर्गिक पुनर्भरणाच्या तुलनेत या पद्धतीत कमी कालावधीत आणि जास्त प्रमाणात जलपुनर्भरण होण्यास मदत होऊ शकते. कमी पर्जन्यमानामुळे भूजल पातळीत घट झालेल्या भागांमध्ये पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविण्यासाठी ही पद्धत उपयुक्त असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकण १५८ रिचार्ज शाफ्ट प्रस्तावित आहेत. तर अंबड, घनसावंगी, जाफराबाद, जालना, परतूर आणि भोकरदन तालुक्यांचाही या नियोजनात समावेश आहे.

तालुकानिहाय प्रस्तावित आराखडा

अंबड तालुका : ५ गावांमध्ये ४२ रिचार्ज शाफ्ट (खर्च : ४०.४३ लाख रू.)
घनसावंगी तालुका : ५ गावे, ४४ रिचार्ज शाफ्ट (खर्च : ४२.३३ लाख रू.)

जाफराबाद तालुका : ५ गावे, ४० रिचार्ज शाफ्ट (खर्च : ३८.५३ लाख रू.)
जालना तालुका : ३ गावे, २८ रिचार्ज शाफ्ट (खर्च : २६.९१ लाख रू.)

परतूर तालुका : २ गावे, १६ रिचार्ज शाफ्ट (खर्च : १५.४१ लाख रू.)
बदनापूर तालुका : १५ गावे, १५८ रिचार्ज शाफ्ट (खर्च: १५१.६७ लाख रू.)

भोकरदन तालुका : १२ गावे, ९६ रिचार्ज शाफ्ट (खर्च : ९२.४६ लाख रू.)
मंठा तालुका : १९ गावे, १५८ रिचार्ज शाफ्ट (खर्च : १५२.१० लाख रू.)

Read About : Drought in Maharashtra 2026 – आणखी 13 तालुक्यांत दुष्काळ जाहीर होणार?

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.