मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक
मुंबई : Places of Pilgrimage in Kolhapur – कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाची श्रद्धास्थाने असलेल्या श्री क्षेत्र बाहुबली आणि श्री क्षेत्र कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत या दोन्ही तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यातील एकूण 18 कोटी 20 लाख 64 हजार रुपयांच्या प्रस्तावित कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
विधान भवन येथील कॅबिनेट हॉल येथे बुधवारी झालेल्या बैठकीला नगरविकास राज्यमंत्री तथा कोल्हापूरच्या पालकमंत्री माधुरी मिसाळ, आमदार डॉ. अशोकराव माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, वित्त विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे, ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते. तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी विजय राठोड आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जसमिन सहभागी झाल्या होत्या.
श्री क्षेत्र बाहुबलीसाठी 9 कोटी
कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे कसबा कुंभोज येथील श्री क्षेत्र बाहुबलीच्या विकासासाठी 9 कोटी रुपयांच्या आराखड्यातील कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये तीर्थक्षेत्र परिसरात पाथवे तयार करणे, शाळेच्या प्रांगणात पेव्हिंग ब्लॉक बसविणे आणि काँक्रिटीकरण करणे, भाविकांसाठी बसण्याकरिता बाकड्यांची व्यवस्था करणे, प्रशासकीय कार्यालयासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, अंतर्गत रस्त्यांच्या बाजूने सोलर स्ट्रीट लाइट उभारणे आदी कामांचा समावेश आहे. तसेच माईन कुंडी ते मुख्य मंदिराला जोडणाऱ्या अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकामही करण्यात येणार आहे. या सुविधांमुळे तीर्थक्षेत्र परिसरातील अंतर्गत वाहतूक आणि भाविकांची ये-जा अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
श्री क्षेत्र कुंथुगिरीसाठी 9 कोटी 20 लाखांहून अधिक निधी
हातकणंगले तालुक्यातील मौजे आळते येथील श्री क्षेत्र कुंथुगिरी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 9 कोटी 20 लाख 64 हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, वाहनतळाचे काँक्रिटीकरण, उर्वरित संरक्षण भिंतीचे बांधकाम आदी कामे करण्यात येणार आहेत. याशिवाय तीन हजार व्यक्तींची क्षमता असलेली आरसीसी सत्संग भवन इमारत उभारण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे श्री क्षेत्र बाहुबली आणि श्री क्षेत्र कुंथुगिरी येथे येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असून, तीर्थक्षेत्र परिसराचा नियोजनबद्ध विकास होण्यास मदत होईल.
Read About : Fake Land Sale Deeds – चार खोट्या खरेदीखताद्वारे तब्बल 31 एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.