Ad Advertisement Ad Advertisement

Fake Gold Hallmark Scam : चकाकते, ते सारे सोने नव्हे!

Fake Gold Hallmark Scam : बाजारात मिळणारी कोणतीही वस्तू निर्भेळ, शुद्ध आणि विश्वासार्ह असेल यावरचा ग्राहकांचा विश्वास दिवसेंदिवस कमी होत असताना महाराष्ट्रात ग्राहकाच्या सुरक्षिततेविषयी सुरू झालेल्या मोहिमेचे कौतुक ओसंडून वाहात असले तरी अशा मोहिमा बाजारपेठांवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यात किती यशस्वी ठरतील याविषयीच्या शंका मात्र पुरत्या पुसल्या गेलेल्या नाही.

राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने आरोग्यास अपायकारक ठरू शकणाऱ्या उत्पादनांच्या नाड्या आवळण्याची मोहीम सुरू करून सुरक्षित महाराष्ट्राचा नारा दिला आणि ज्या उत्पादनांकडे ग्राहक मोठ्या विश्वासाने पाहत होता, त्यापैकी अनेक उत्पादनांच्या शुद्धतेचे पितळ उघडे पडत गेले. त्यामुळे बाजारपेठांच्या विश्वासार्हतेवरील अगोदरच्या शंका अधिकच गडद होत गेल्या आहेत. ही विश्वासार्हता जपण्याची आणि ग्राहकास शुद्धतेची हमी देण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणाच बेजबाबदार असतील, तर या शंका बळावत गेल्यास आश्चर्य वाटू नये. केवळ अन्नपदार्थ किंवा खाद्यपदार्थांच्या शुद्धतेवर उमटणाऱ्या शंका आता सोन्यासारख्या महागड्या धातूच्या शुद्धतेवरही उमटू लागल्या आहेत आणि ज्या यंत्रणांच्या हमीवर विश्वास ठेवावा, त्या यंत्रणाच या शंका वाढविण्यास हातभार लावण्यास कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोन्याच्या शुद्धतेची हमी देण्यासाठी भारतीय मानक ब्युरोचे काही नियम आहेत. मात्र, याचे पालन होते किंवा नाही याची खात्री करण्याबाबत भारतीय मानक ब्युरोकडूनच दुर्लक्ष होत असल्याची गंभीर बाब भारताच्या महालेखाकारांच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. ही बाब एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेची हमी देणाऱ्या ‘बीआयएस’ चिन्हाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याची बाबदेखील उघडकीस आली असून, ग्राहकांनी ज्या विश्वासाने सोन्याच्या शुद्धतेची खात्री बाळगावी त्या विश्वासालाच तडा जात आहे. शुद्धतेची हमी देणारे हे चिन्हच बनावट असेल तर शुद्धतेचे शिक्के मारून बाजारात विकला जाणारा चकाकणारा प्रत्येक दागिना म्हणजे सोने नव्हे असे म्हणावे लागेल.

‘चकाकते ते सारे सोने नसते’ ही समजूत पुसण्यासाठी भारतीय मानक ब्युरोने सोन्याच्या शुद्धतेची हमी देणारे बीआयएस चिन्ह दागिन्यांवर उमटविण्याचा आग्रह धरला असला, तरी त्या चिन्हाचाच गैरवापर होत असल्याचे महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर येथे काही ठिकाणी केल्या गेलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. ग्राहकांचा बाजारपेठांवरील विश्वास लयास जाण्यासाठी याहून मोठा विश्वासघात कोणता असू शकतो, हा प्रश्न यामुळे गडद झाला आहे.

भारतीय संस्कृतीत सोने ही केवळ धातू किंवा गुंतवणुकीची वस्तू नाही, तर ती घराची प्रतिष्ठा, सण-उत्सवांचे वैभव आणि सुख-दु:खाच्या क्षणांमधील भावनिक गुंतवणूक आहे. मंगलकार्यांपासून ते संकटसमयीच्या मदतीपर्यंत सोन्याने प्रत्येक भारतीय कुटुंबाला एक भावनिक आधार दिला आहे. मात्र, अलीकडच्या काळात बाजारपेठेतील वस्तूंच्या शुद्धतेविषयी संशय व्यक्त होत असतानाच, आता थेट सोन्याच्या शुद्धतेची हमी देणारी यंत्रणाच धोक्यात आल्याचे चित्र समोर येत आहे. भारतीय मानक ब्युरो आणि हॉलमार्क यंत्रणेच्या कथित दुर्लक्षामुळे सोन्याच्या व्यवहारांमधील विश्वासार्हतेला तडा गेला असून, हा केवळ आर्थिक फसवणुकीचा नव्हे तर एका सांस्कृतिक विश्वासाचा घात ठरू पाहत आहे.

सोन्याविषयीचा भारतीयांचा ओढा जगजाहीर आहे. कठीण काळात सोने तारण ठेवून संकट दूर करता येते, हा सर्वसामान्य माणसाचा पिढ्यानपिढ्यांचा अनुभव आहे. परंतु, जेव्हा शुद्धतेची हमी देणारे ‘हॉलमार्क’च शंकेच्या घेऱ्यात येते, तेव्हा सामान्य ग्राहकाने कुणावर विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न निर्माण होतो. हॉलमार्क करणाऱ्या काही संस्था किंवा यंत्रणा आर्थिक लालसेपोटी ग्राहकांच्या विश्वासाशी खेळत असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या प्रकारांतून सिद्ध झाले आहे. निकृष्ट किंवा कमी दर्जाच्या सोन्याला अधिक शुद्धतेचा बनावट शिक्का मिळणे, ही अत्यंत गंभीर बाब असून ‘भारतीय मानक ब्युरो’च्या कार्यपद्धतीतील ढिसाळपणा आणि प्रभावी नियंत्रणाचा अभाव हे याचे प्रमुख कारण ठरत आहे. देशभरात हॉलमार्क केंद्रांची संख्या वेगाने वाढली खरी, परंतु त्यांच्या कामावर वचक ठेवण्यासाठी ज्या कठोर यंत्रणेची आवश्यकता होती, ती कुचकामी ठरली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई न होणे आणि तपासणी मोहिमांमध्ये सातत्य नसणे, यामुळे भ्रष्ट घटकांना मोकळे रान मिळाले आहे.

‘हॉलमार्क आहे म्हणजे सोने अस्सल असणारच’ या भाबड्या विश्वासाने सोने खरेदी करण्याच्या मानसिकतेचा सर्वाधिक फटका मध्यमवर्ग आणि ग्रामीण भागातील भोळ्या जनतेला बसतो. आपल्याकडे असलेले सोने शुद्ध नसून आपली फसवणूक झाली आहे असे जेव्हा ग्राहकास कळते, तेव्हा ते केवळ आर्थिक नुकसान नसते, तर त्यांच्या श्रमाचा आणि भावनांचा विश्वासघात असतो. अशा प्रकारामुळे भारतीय सोन्याच्या बाजारपेठेची जागतिक पातळीवरील प्रतिमा मलीन होत असून, दागिने उद्योगाशी जोडलेल्या प्रामाणिक सुवर्णकारांवरही संकट ओढवले आहे. सोने व्यापाराची विश्वासार्हता पणाला लावणाऱ्या या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी आता तात्काळ कठोर पावले उचलली गेली पाहिजेत. त्यासाठी भारतीय मानक ब्युरोने आपल्या यंत्रणेचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. नियम मोडणाऱ्या हॉलमार्क केंद्रांना वेशीवर टांगून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि फसवणूक झाल्यास ग्राहकास त्वरित दाद मागता येईल अशा रीतीने शुद्धता तपासणीचे मार्ग अधिक सुलभ आणि पारदर्शक केले पाहिजेत. कारण सोने हा केवळ चकाकत्या धातूचा तुकडा नसून तो भारतीयांच्या श्रमाचा, घामाच्या कमाईचा आणि सांस्कृतिक विश्वासाचा आरसा आहे.

Read About : Gadchiroli Development : गडचिरोलीचा नवा सूर्योदय!
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.