ऑस्ट्रेलियात लवकरच मानवी चाचण्या
गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया) : Acne Vaccine – मुरुमे म्हणजेच पिंपल्स ८५ टक्के किशोरवयीन मुलामुलींना होतात. काहींना ती मोठेपणीही राहतात. कुणाला अधूनमधून एखाददुसरा पिंपल येतो तर कुणाला वर्षानुवर्षे वेदनादायक सूज, चट्टे आणि त्यामुळे येणारा न्यूनगंड याचा त्रास सोसावा लागतो. लस या त्रासापासून वाचवू शकेल का? आपण लसीकडे साधारणपणे संसर्गजन्य आजार रोखणारे साधन म्हणून पाहतो. पण शास्त्रज्ञ आता मुरुमांसाठीही लस तयार करत आहेत.
त्वचेवरील केसांची मुळे (केसकूप) आणि त्यांना जोडलेल्या तेलग्रंथी यांना सूज येणारा विकार म्हणजे मुरमे. याला एक जिवाणू कारणीभूत ठरतो, त्याचे नाव क्युटिबॅक्टेरियम अॅक्नेस (सी. अॅक्नेस). तो निरोगी त्वचेवरही राहतो. पण त्याचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळी प्रथिने तयार करतात आणि त्यांचा त्वचेवर वेगवेगळा परिणाम होतो.
मुरूमे कशी तयार होतात..
त्वचेवरील छिद्र मृत त्वचापेशी आणि तेल यांच्या मिश्रणाने बंद होते. जणू कुकरचे झाकण लावले आहे. हार्मोन्समुळे तेलनिर्मीती वाढते. अडकलेले तेल आणि मृत पेशी आत साचत जातात आणि केसकूप फुगते. अशा वातावरणात सी. अॅक्नेस जिवाणू झपाट्याने वाढतात. ते काही पदार्थ तयार करतात, जे केसकुपाला त्रासदायक ठरतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती प्रतिसाद देते आणि जळजळ, म्हणजे लालसरपणा व सूज येते. यामुळे केसकुपाची भिंत कमकुवत होते. कधी ती फुटते आणि मग आतील घटक आजूबाजूच्या त्वचेत पसरतात. त्यामुळे जळजळ आणखी वाढते आणि नेहमीचा लाल, ठसठसणारा पिंपल तयार होतो. हे सगळ्यांच्या बाबतीत सारखेच घडत नाही. हार्मोन्स आणि आनुवंशिकता यांचा मुरुमे येण्याच्या प्रवृत्तीवर परिणाम होतो. मुरुमे बहुतेक चेहऱ्यावर येतात. पण छाती, खांदे आणि पाठीचा वरचा भाग यावरही ते येऊ शकतात, कारण तिथे तेलग्रंथी जास्त असतात.
सध्याचे उपचार
सौम्य ते मध्यम मुरुमे त्वचेवर लावायच्या औषधांनी सुधारतात. यात विशेषत: बेंझॉईल पेरॉक्साईड आणि रेटिनॉइड्स वापरली जातात. जास्त चिवट किंवा सूज असलेल्या मुरुमांसाठी अँटिबायोटिक क्रीम किंवा गोळ्या लागू शकतात. गंभीर मुरुमांवर आयसोट्रेटिनॉइन (रेटिनॉइडचा एक प्रकार) या तोंडाने घ्यायच्या औषधाचा चांगला परिणाम होतो. मात्र ही औषधे रोज वापरावी लागतात आणि त्यांचे दुष्परिणाम होऊ शकतात. दीर्घकाळ नियंत्रण देणारी लस आली, तर ती अनेकांना आवडेल. शिवाय अँटिबायोटक्सिचा वापर कमी झाल्यास अँटिबायोटिक प्रतिरोधाची (औषधे निष्प्रभ होण्याची) समस्या कमी होण्यास मदत होईल.
मुरुमांची लस कशी काम करू शकते?
२०१८ मधील एका अभ्यासात सीएएमपी२ या जिवाणू-प्रथिनाला लक्ष्य केले गेले. हे प्रथिन जळजळीला कारणीभूत ठरते. उंदरांमध्ये आणि शरीराबाहेर तपासलेल्या मानवी मुरुमांच्या ऊतींमध्ये यामुळे जळजळ कमी झाल्याचे दिसले. २०२३ मधील अभ्यासात एचवायएलए या एन्झाइमला लक्ष्य करणारी लस वापरली गेली. सी. अॅक्नेस हे एन्झाइम तयार करतो आणि ते दाह वाढवते. या लसीमुळे उंदरांमध्ये मुरुमांसारखा दाह कमी झाला. अशी प्रथिने लक्ष्य केल्यास सी. अॅक्नेसमुळे केसकुपात होणारा दाह कमी होऊ शकतो आणि मुरुमांचे घाव कमी तयार होऊ शकतात. मात्र या दोन्ही अभ्यासांतून लसीमुळे माणसांमधील मुरुमे बरी होतात, हे सिद्ध होत नाही.
सनोफीचा प्रयत्न
सनोफी ही औषध कंपनी सीएएमपी२ ला लक्ष्य करणाऱ्या मुरुमांच्या लसीवर संशोधन करत आहे. ही लस एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित आहे. या तंत्रात शरीराला तात्पुरत्या सूचना दिल्या जातात. त्यानुसार शरीरातील पेशी ठरावीक प्रथिने तयार करतात. रोगप्रतिकारशक्ती ती प्रथिने ओळखायला शिकते आणि नंतर त्यांना निष्प्रभ करते. उदाहरणार्थ, कोविडच्या एमआरएनए लसींनी शरीराला सार्स-कोव्ह-२ विषाणू (कोविड करणारा विषाणू) ओळखायला आणि त्याच्याविरुद्ध लढायला शिकवले. मुरुमांच्या बाबतीत मात्र मुरुमे वाढवणाऱ्या जिवाणू-प्रथिनांचा सामना करणे हा उद्देश आहे.
माणसांवरील चाचण्यांचे काय?
सनोफीच्या दोन चाचण्यांसाठी सध्या १८ ते ४५ वयोगटातील प्रौढांची भरती सुरू आहे. या चाचण्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांच्या (फेज १ आणि २) आहेत. पहिल्या चाचणीत मध्यम ते गंभीर मुरुमे असलेले ८०० जण घेतले जाणार आहेत. त्यात लसीचे वेगवेगळे डोस आणि दोन किंवा तीन इंजेक्शनांचे वेळापत्रक तपासले जाईल. दुसऱ्या चाचणीसाठी सौम्य मुरुमे असलेले २२८ जण हवे आहेत. त्यांना दोन इंजेक्शने दिली जातील. या चाचण्यांत लस सुरक्षित आहे का, ती कोणता रोगप्रतिकारक प्रतिसाद निर्माण करते आणि मुरुमांची समस्या सुटते का, हे पाहिले जाईल. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहभागी लोकांना आधीपासूनच मुरुमे आहेत. म्हणजे मुरुमे होऊ नयेत यासाठी ही लस आहे का, हे या चाचण्यांत तपासले जात नाही. आधीच असलेल्या मुरुमांवर उपचार म्हणून ती किती उपयोगी आहे, हेच तपासले जात आहे.
तांत्रिक आव्हाने मोठी
जिवाणूंना नष्ट न करता, ते तयार करत असलेल्या दाह वाढवणाऱ्या प्रथिनांना लक्ष्य करूनही मुरुमांत खरी सुधारणा होते, हे संशोधकांना सिद्ध करावे लागेल. मुरुमांवर हार्मोन्स आणि इतर घटकांचाही परिणाम होत असल्याने हे सोपे नाही. लस अल्पकाळात आणि दीर्घकाळात सुरक्षित आहे का, याचे फायदे किती काळ टिकतात आणि बूस्टर डोस लागतील का, हेही ठरवावे लागेल. लसीमुळे त्वचेवरील सूक्ष्मजीवांचा नैसर्गिक समतोल बदलतो का, म्हणजेच तो टिकून राहतो का, हेही तपासावे लागेल.
Read About : Vitamin C and Cancer Risk – व्हिटॅमिन सीमुळे कर्करोगाशी संबंधित रसायने तयार होण्याची प्रक्रिया मंदावते?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.