Ad Advertisement Ad Advertisement

Climate Change Science : अदृश्य ऊर्जेचा खेळ : हवामान बदलाचे विज्ञान

Climate Change Science : आपण हवामान बदलाबद्दल बोलतो तेव्हा वाढते तापमान, वितळणारे हिमनग, समुद्राची वाढती पातळी, अनियमित पाऊस आणि तीव्र उष्णतेच्या लाटा या गोष्टी प्रामुख्याने समोर येतात. मात्र, या दृश्य बदलांमागे वातावरणात सतत सुरू असलेल्या अनेक अदृश्य प्रक्रिया कार्यरत असतात. हवेत मिसळलेले विविध वायू, तरंगणारे सूक्ष्मकण, ढग आणि पृथ्वीवर येणाऱ्या व पृथ्वीवरून अंतराळात परत जाणाऱ्या ऊर्जेचे प्रवाह हे हवामान व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत. या घटकांमधील संतुलन बदलले की पृथ्वीच्या तापमानात आणि हवामानाच्या स्वरूपात दीर्घकालीन बदल घडू लागतात, त्यामुळे हवामान बदल समजून घेण्यासाठी केवळ तापमानाकडे नव्हे, तर त्यामागील अदृश्य भौतिक प्रक्रियांकडे पाहणे आवश्यक आहे.

पृथ्वीच्या हवामान व्यवस्थेचा प्रमुख ऊर्जास्रोत सूर्य आहे. सूर्यापासून येणारी ऊर्जा प्रामुख्याने दृश्य प्रकाश आणि इतर लघुतरंगलांबीच्या प्रारणांच्या स्वरूपात पृथ्वीपर्यंत पोहोचते. या ऊर्जेचा काही भाग ढग, वातावरणातील कण, हिमप्रदेश आणि इतर उजळ पृष्ठभागांकडून परावर्तित होऊन अंतराळात परत जातो. उर्वरित ऊर्जा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण शोषून घेतात. तापलेली पृथ्वी ही ऊर्जा अवरक्त प्रारणाच्या स्वरूपात पुन्हा बाहेर उत्सर्जित करते. याला पृथ्वीचे ऊर्जा-संतुलन म्हणतात. दीर्घकाळ हे संतुलन टिकले तर पृथ्वीचे सरासरी तापमान तुलनेने स्थिर राहते. मात्र, बाहेर जाणाऱ्या ऊर्जेपेक्षा आत येणारी किंवा पृथ्वीच्या प्रणालीत साठणारी ऊर्जा अधिक झाली तर तापमान वाढू लागते.

या प्रक्रियेत हरितगृह वायूंची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कार्बन डाय ऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि जलबाष्प यांसारखे वायू पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून उत्सर्जित होणाऱ्या अवरक्त प्रारणाचा काही भाग शोषून घेतात आणि पुन्हा सर्व दिशांना उत्सर्जित करतात. त्यातील काही ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे परत येते. या नैसर्गिक प्रक्रियेला हरितगृह परिणाम म्हणतात. हा परिणाम नसता तर पृथ्वीचे सरासरी तापमान आजच्या तुलनेत खूपच कमी असते आणि सध्याचे जीवनसृष्टीस अनुकूल वातावरण निर्माण झाले नसते, त्यामुळे हरितगृह परिणाम स्वत:हून हानिकारक नाही; मात्र मानवी क्रियांमुळे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढल्याने त्याची तीव्रता वाढत आहे.

औद्योगिकीकरण, जीवाश्म इंधनांचे ज्वलन, जंगलतोड, वाहतूक, ऊर्जा निर्मिती आणि शेती यामधून मोठ्या प्र्रमाणात हरितगृह वायू वातावरणात सोडले जातात. कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू जाळल्यामुळे कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढते. पशुपालन, भातशेती आणि कचऱ्याच्या विघटनातून मिथेन बाहेर पडतो. रासायनिक खतांच्या वापरातून नायट्रस ऑक्साइडचे उत्सर्जन होते. या वायूंचे वातावरणातील प्रमाण वाढल्याने पृथ्वीवरून बाहेर जाणाऱ्या उष्णतेचा काही भाग अधिक प्रमाणात अडवला जातो. परिणामी पृथ्वीच्या ऊर्जा-संतुलनात बदल होतो आणि तापमानवाढीला चालना मिळते. परंतु, हवामान बदलाच्या या समीकरणात केवळ वायूच नाहीत, तर वातावरणात तरंगणारे अतिसूक्ष्म घन किंवा द्रव कणही महत्त्वाचे आहेत. या कणांना वायुकणिकीय पदार्थ किंवा एरोसोल म्हणतात. धूळ, समुद्री मिठाचे कण, ज्वालामुखीमधून बाहेर पडणारे पदार्थ, जंगलातील आगीचा धूर, औद्योगिक प्रदूषण आणि वाहनांमधून निर्माण होणारे कण हे त्याचे स्रोत आहेत. हे कण सूर्यप्रकाशाचे विखुरण, परावर्तन किंवा शोषण करू शकतात, त्यामुळे त्यांचा हवामानावर होणारा परिणाम त्यांच्या आकारमानावर, रंगावर, रासायनिक रचनेवर आणि वातावरणातील स्थानावर अवलंबून असतो.

काही एरोसोल सूर्यप्रकाश परावर्तित करून पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचणारी ऊर्जा कमी करतात, त्यामुळे वातावरण थंड होण्यास मदत होऊ शकते. सल्फेटचे कण याचे एक उदाहरण आहेत. याउलट काळा कार्बन किंवा काजळी यासारखे गडद कण सूर्यप्रकाश शोषून वातावरण तापवू शकतात. हिम आणि बर्फावर काळ्या कार्बनचे कण साचल्यास त्या पृष्ठभागाचा परावर्तनशील गुणधर्म कमी होतो. परिणामी अधिक सूर्यप्रकाश शोषला जातो आणि बर्फ वितळण्याची प्रक्रिया वेगवान होऊ शकते. अशा प्रकारे सर्व सूक्ष्मकणांचा हवामानावर एकसारखा परिणाम होत नाही.
ढगांचाही पृथ्वीच्या ऊर्जा-संतुलनात महत्त्वाचा सहभाग असतो. ढग सूर्यप्रकाशाचा काही भाग परावर्तित करून पृथ्वीला थंड ठेवण्यास मदत करतात; परंतु ते पृथ्वीवरून बाहेर जाणारे अवरक्त प्रारण शोषून पुन्हा उत्सर्जितही करतात, त्यामुळे काही परिस्थितींमध्ये ढग थंडावा निर्माण करतात, तर काही परिस्थितींमध्ये उष्णता टिकवून ठेवतात. ढगांची उंची, जाडी, पाण्याचे थेंब, बर्फाचे स्फटिक आणि त्यांचे प्रमाण यावर त्यांचा एकूण परिणाम अवलंबून असतो. एरोसोल कण ढगांच्या थेंबांच्या निर्मितीवर आणि त्यांच्या वैशिष्ट्यांवरही परिणाम करू शकतात, त्यामुळे वातावरणातील सूक्ष्मकण आणि ढग यांचा परस्परसंबंध हवामान संशोधनातील गुंतागुंतीचा विषय आहे.

हवामान बदलाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील ऊर्जा केवळ वातावरणात साठत नाही. महासागर पृथ्वीच्या अतिरिक्त उष्णतेचा मोठा भाग शोषून घेतात; त्यामुळे समुद्राचे तापमान वाढते, पाण्याचे प्रसरण होते आणि समुद्रपातळीत वाढ होण्यास हातभार लागतो. समुद्रातील उष्णतेमुळे प्रवाह, बाष्पीभवन आणि पर्जन्यचक्रावरही परिणाम होतो. वातावरण आणि महासागर यांच्यातील हा ऊर्जेचा सततचा विनिमय हवामानातील बदलांचे स्वरूप आणि गती ठरवतो.

याशिवाय काही बदल मूळ तापमानवाढीला अधिक गती देतात. उदाहरणार्थ, तापमान वाढल्यामुळे हिम आणि बर्फ वितळतात. बर्फाचा पांढरा पृष्ठभाग सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणात परावर्तित करतो; त्याऐवजी उघडी पडणारी जमीन किंवा समुद्र अधिक ऊर्जा शोषून घेतात, त्यामुळे तापमान आणखी वाढू शकते. याला सकारात्मक अभिप्रत्यय प्रक्रिया म्हणतात. अशा प्रक्रिया हवामान व्यवस्थेतील बदल अधिक गुंतागुंतीचे बनवतात.

आज उपग्रह निरीक्षणे, समुद्रातील तापमान मापन, वातावरणातील वायूंचे विश्लेषण आणि संगणकीय हवामान प्रारूपांच्या साहाय्याने या अदृश्य प्रक्रियांचा अभ्यास केला जात आहे. वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण, एरोसोलचे वितरण, ढगांचे स्वरूप आणि पृथ्वीच्या ऊर्जा-संतुलनातील बदल मोजून वैज्ञानिक हवामान बदलाची कारणे आणि भविष्यातील परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करतात.

हवामान बदल म्हणजे केवळ पृथ्वी गरम होण्याची घटना नाही; तो पृथ्वीच्या संपूर्ण ऊर्जा व्यवस्थेत घडणारा बदल आहे. वातावरणातील अदृश्य वायू, तरंगणारे सूक्ष्मकण, ढग, महासागर आणि सूर्यापासून येणारी ऊर्जा यांच्यातील संतुलनावर पृथ्वीचे हवामान अवलंबून आहे. या घटकांमधील सूक्ष्म बदलही दीर्घकाळात मोठे पर्यावरणीय परिणाम घडवू शकतात, म्हणूनच हवामान बदलाचे खरे विज्ञान समजून घेण्यासाठी आपल्याला केवळ डोळ्यांना दिसणाऱ्या उष्णतेकडे नव्हे, तर त्या उष्णतेमागील अदृश्य वायू, कण आणि ऊर्जा प्रवाहांकडेही पाहावे लागेल. कारण पृथ्वीचे भविष्य ठरवणारा हा अदृश्य ऊर्जेचा खेळ सतत सुरू आहे.

सुजाता बाबर
sumiba_r@yahoo.com

Read About : Gravitational Waves : अंतराळाची अदृश्य कंपने: गुरुत्वाकर्षण तरंग
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.