पृथ्वीवरील दुर्मीळ उल्कापातजन्य विवरांपैकी एकमेव सरोवर
नागपूर : Lonar Lake Geological Heritage Site बुलढाणा जिल्ह्यातील आणि उल्कापातामुळे तयार झालेल्या विवरात निर्माण झालेल्या लोणार सरोवराचा प्रतिष्ठित अशा ‘तिसऱ्या १०० आययूजीएस भूवैज्ञानिक वारसास्थळां’च्या यादीत समावेश करण्यात आला आहे. इंटरनॅशनल युनियन ऑफ जिऑलॉजिकल सायन्सेस (आययूजीएस) ही संस्था भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये, प्रक्रिया आणि शोध यांची उत्कृष्ट उदाहरणे असलेल्या तसेच विशेष वैज्ञानिक महत्त्व असलेल्या स्थळांना ‘भूवैज्ञानिक वारसास्थळ’ म्हणून मान्यता देते, अशी माहिती प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दिली आहे.
बेसॉल्ट खडकांमध्ये तयार झालेल्या पृथ्वीवरील दुर्मीळ उल्कापातजन्य विवरांपैकी एक असल्याने लोणार सरोवराला विशेष महत्त्व आहे. बेसॉल्ट खडकांच्या पृष्ठभागावर अतिवेगाने झालेल्या उल्कापातामुळे तयार झालेल्या पृथ्वीवरील ज्ञात पाच विवरांपैकी हे एक मानले जाते.
उल्कापातामुळे निर्मितीचे पुरावे
या विवराच्या मध्यभागी खारट आणि अल्कधर्मी पाण्याचे सरोवर आहे. त्यामुळे येथे एक वेगळे भूवैज्ञानिक आणि पर्यावरणीय वैशिष्ट्य निर्माण झाले आहे. विवराचा गोलाकार आकार, त्याची खोली आणि व्यास यांचे प्रमाण, आतील उतारांवर दिसणारे उघडे बेसॉल्ट लाव्हाचे थर, तुकडे झालेल्या खडकांचे जमिनीखालील थर, बाहेरच्या दिशेने झुकलेले मूळ खडकांचे थर, ढिगारे तसेच तुटलेल्या खडकांचे तुकडे आणि स्यूव्हाइट यांचा समावेश असलेले मोठ्या प्रमाणावर बाहेर फेकलेले खडकांचे साठे, हे सर्व पुरावे या विवराची निर्मिती उल्कापातामुळे झाल्याचे स्पष्ट करतात, असे निवेदनात म्हटले आहे.
जगातील ४७ देशांमध्ये समावेश
तिसऱ्या १०० भूवैज्ञानिक वारसास्थळांचा जगातील ४७ देशांमध्ये समावेश आहे. यामध्ये आफ्रिकेतील ११, अमेरिकेतील २२, आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील २२, मध्य पूर्वेतील ६, युरोपमधील ३४, अंटार्क्टिकामधील २ आणि आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रातील ३ स्थळांचा समावेश आहे. जपानमधील माऊंट फुजी, नॉर्वेतील फ्योईस, अमेरिकेतील सॅन अँड्रियास फॉल्ट, अर्जेटिनामधील माऊंट अकोंकाग्वा आणि फिलिपाइन्समधील चॉकलेट हिल्स यांसारख्या जगप्रसिद्ध भूवैज्ञानिक स्थळांचाही पृथ्वीवरील या अनोख्या भूवैज्ञानिक आश्चर्याच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
विवराची वैशिष्ट्ये
- १२ हजार वर्षे जुने व्यास १.८८ किलोमीटर
- दख्खन ट्रॅप्स या बेसॉल्ट खडकांच्या थरांच्या मध्यभागी वसलेले विवर
Read About : Maharashtra dam water levels 2026 – धरणांतील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत 26 टक्क्यांची घट
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.