Ad Advertisement Ad Advertisement

Drought in Maharashtra – राज्यात आता 310 तालुके दुष्काळी; हातकणंगले आणि गडहिंग्लजचा नव्याने समावेश

आणखी 13 तालुक्यांच्या शिफारशींबाबत सर्वेक्षण करण्याच्या सूचना

मुंबई : Drought in Maharashtra – राज्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या 310 पोहोचली आहे. विक्रमगड, वाडा, दिंडोरी आणि चिपळूण या सोबतच हातकणंगले आणि गडहिंग्लज या तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आल्याचे महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी सांगितले. आणखी 13 तालुक्यांच्या शिफारशींबाबत सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

फायनान्स कंपनीचा तगादा नको

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्स कंपन्या किंवा बँकांकडून तगादा लावून वेठीस धरले जात असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल न उचलता स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस, जिल्हाधिकारी किंवा प्रशासनाकडे तक्रार करावी. दुष्काळ काळात कोणतीही फायनान्स कंपनी तगादा लावणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

अपूर्ण नळ योजनांसाठी 488 कोटी

राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ज्या नळ योजनांचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि तिथे टँकर सुरू करावे लागत असल्यास, अशा अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी 400 कोटी रुपये आणि 10 ते 20 टक्के किंवा 5 ते 10 टक्के काम शिल्लक असलेल्या योजनांसाठी 88 रुपये, असे एकूण 488 कोटी रुपये पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले आहेत.
वीज कनेक्शनअभावी रखडलेल्या राज्यातील सुमारे 400 ते 500 नळ योजनांना डीपीसी निधीतून वीज जोडणी दिली जाईल. तसेच, वीज बिल थकल्याने कनेक्शन कापलेल्या योजनांचे मागील बिल थकीत ठेवून केवळ चालू बिल घेत तात्काळ वीज जोडणी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आर्थिक मर्यादा वाढविल्या

राज्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय स्तरावर टंचाई निवारणार्थ उपाययोजना तातडीने आणि अधिक परिणामकारकरित्या राबविण्यात याव्यात यासाठी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या आर्थिक मर्यादा वाढविण्याबाबत जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना अधिकार देण्यात आले असून याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे.

15 हजार गावे समृद्ध करण्याचे उद्दिष्ट

राज्यातील घटती भूजल पातळी लक्षात घेऊन ‘कमी पैशात जास्त जलसंधारण’ या भूमिकेतून मृत बंधारे आणि जुने तलाव पुनर्जीवित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील 4 ते 5 हजार मृत बंधारे, गाव तलाव, साठवण तलाव, मालगुजारी तलाव, जलसंपदा आणि धारणाचे तलाव, ग्रामपंचायतीचे तलाव तसेच शिवकालीन बंधारे दुरुस्त करून जिवंत केले जातील. पावसाळ्यातील थेंब न् थेंब पाणी गावात, शेतात, तलावात आणि नाल्यात साठवून पुढील तीन वर्षांत 15 हजार गावे समृद्ध करण्याचे नियोजन आहे. याकरता पाच सचिवांची समिती एसओपी आणि आराखडा तयार करणार असून डिसेंबरच्या बजेटमध्ये या योजनेला मूर्त रूप देत सुमारे 5 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली.

Read About : Drought in Maharashtra – राज्यात 34 लाख भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मेपर्यंत पूर्ण करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.