Ad Advertisement Ad Advertisement

Sleep and Brain Health : मधुमेह, हृदयरुग्णांसाठी चांगली झोप ठरते मेंदूची ढाल; 4 लाखांहून अधिक लोकांच्या अभ्यासातून निष्कर्ष

चांगली झोप घेणाऱ्यांमध्ये स्मरणशक्ती, मेंदूच्या रचनेशी संबंधित चांगले निष्कर्ष

नवी दिल्ली : Sleep and Brain Health मधुमेह, हृदयरोग किंवा स्ट्रोकचा त्रास असलेल्या व्यक्तींनी झोपेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. चांगली आणि पुरेशी झोप घेतल्यास या आजारांचा मेंदूवर होणारा नकारात्मक परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. अशा रुग्णांमध्ये चांगली झोप घेणाऱ्यांची विचारक्षमता आणि मेंदूचे आकारमान तुलनेने चांगले असल्याचे संशोधकांना आढळले.

स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टट्यिूटसह विविध संस्थांतील संशोधकांनी हा अभ्यास केला. त्याचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशन’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ब्रिटनमधील यूके बायोबँकच्या चार लाखांहून अधिक मध्यमवयीन आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. त्यापैकी ५४ हजारांहून अधिक जणांना किमान एक हृदयविकाराशी किंवा चयापचयाशी संबंधित आजार होता.

झोपेचा मेंदूच्या कार्यक्षमतेशी संबंध

संशोधकांनी झोपेचा कालावधी, शरीराचे जैविक घड्याळ, निद्रानाश, घोरणे आणि दिवसा झोप येणे या पाच घटकांच्या आधारे झोपेची गुणवत्ता तपासली. सुमारे ३५ हजार सहभागींचे एमआरआय स्कॅनही उपलब्ध होते. चांगली झोप घेणाऱ्या रुग्णांची सामान्य आकलनक्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता आणि माहिती प्रक्रिया करण्याचा वेग तुलनेने अधिक असल्याचे दिसले. त्यांच्या मेंदूचे एकूण आकारमान तसेच ग्रे आणि व्हाइट मॅटरचे प्रमाणही अधिक होते.

मधुमेही रुग्णांसाठी विशेष महत्त्व

कॅरोलिन्स्का इन्स्टट्यिूटच्या संशोधक अबिगेल डोव्ह यांच्या मते, हृदयविकार, टाइप-२ मधुमेह आणि स्ट्रोक हे मेंदूच्या आरोग्याला धोका निर्माण करणारे महत्त्वाचे घटक आहेत. अशा परिस्थितीत झोप सुधारल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेला आधार मिळू शकतो.
मात्र, हा अभ्यास झोप आणि मेंदूच्या आरोग्यातील संबंध दर्शवतो; चांगली झोप आजारांचे परिणाम पूर्णपणे रोखते, असे सिद्ध करत नाही. तरीही नियमित आणि गुणवत्तापूर्ण झोप ही मेंदूचे आरोग्य जपण्यासाठी सहज साध्य करता येणारी महत्त्वाची सवय ठरू शकते.

Read About: Arabian Plate Tectonic Cracks – इराणच्या भूगर्भात टेक्टॉनिक प्लेटला 2 महाकाय भेगा

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.