Ad Advertisement Ad Advertisement

Arabian Plate Tectonic Cracks – इराणच्या भूगर्भात टेक्टॉनिक प्लेटला 2 महाकाय भेगा

चीनमधील संशोधकांना ६९ भूकंप निरीक्षण केंद्रांच्या नोंदींतून दोन भेगांचे संकेत; झाग्रोस पर्वतरांगा आणि मकरान क्षेत्रातील भूगर्भीय हालचालींचा अभ्यास

नवी दिल्ली : Arabian Plate Tectonic Cracks पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील भूगर्भीय हालचालींचा अभ्यास करताना चीनमधील वैज्ञानिकांना इराणच्या आग्नेय भागाखाली एक महत्त्वपूर्ण शोध लागला आहे. येथे पृथ्वीच्या अरबी टेक्टॉनिक प्लेटमध्ये (भूगर्भीय स्तर) दोन मोठ्या भेगा निर्माण झाल्याचे संशोधनातून समोर आले आहे. या भेगा खडकांच्या घनतेतील फरक आणि प्लेटच्या हालचालींमुळे तयार होत आहेत.
हा अभ्यास ‘नेचर जिओसायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. चिनी विज्ञान अकादमीच्या संशोधकांच्या मते, या प्लेटचा एक भाग प्राचीन निओ-टेथिस महासागराचा अवशेष असलेल्या महासागरीय भूस्तराचा आहे. त्यातील जड आणि पातळ बेसॉल्ट खडक शेजारच्या प्लेटखाली सरकत आहेत. दुसरीकडे, जाड पण तुलनेने कमी घनतेचा खंडीय भूस्तर खाली जाण्यास प्रतिकार करतो आणि पर्वतरांगांच्या निर्मितीला हातभार लावतो. या परस्परविरोधी हालचालींमुळे प्लेटमध्ये भेगा पडत आहेत.

६९ केंद्रांच्या मदतीने शोध

संशोधकांनी ६९ भूकंप निरीक्षण केंद्रांच्या नेटवर्कचा वापर केला. मार्च २०१७ ते सप्टेंबर २०१८ या काळातील नोंदींमध्ये दोन भेगांचे संकेत आढळले. एक भेग झाग्रोस पर्वतरांगा आणि मकरान क्षेत्र यांच्या संगमाजवळ आडवी आहे, तर दुसरी लहान उभी भेग मकरान खंदकाजवळ आहे.

महासागरीय आणि खंडीय भूस्तरातील फरक

मकरान भागातील महासागरीय भूस्तर किमान ४५० किलोमीटर खोलीपर्यंत खाली गेला आहे, तर पश्चिम झाग्रोसमधील खंडीय भूस्तराची खोली सुमारे ३०० किलोमीटरपर्यंत आहे. या फरकामुळे भूस्तराचा काही भाग फाटून वेगळा होत असल्याचे संशोधकांचे मत आहे.
या भेगा लाखो वर्षांपासून विकसित होत असून भविष्यात त्या एकमेकांना जोडल्या जाऊ शकतात. महासागर नाहीसे होऊन खंडांची टक्कर कशी घडते, याची दुर्मीळ झलक या शोधातून मिळते. मात्र, या प्रक्रियेला किती काळ लागेल, याबाबत निश्चित कालमर्यादा सांगता येत नाही.

Read About : Early Bedtime for Prediabetes – प्री-डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी रात्री लवकर झोपा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.