Ad Advertisement Ad Advertisement

AI Industry Power Concentration : एआय क्षेत्रातील सर्वात मोठा धोका तंत्रज्ञानाचा नव्हे, तर भांडवल आणि सत्तेच्या केंद्रीकरणाचा!

नीती आयोगाच्या प्रतिष्ठित फेलो देवजानी घोष यांनी सिलिकॉन व्हॅलीतील वर्तुळाकार निधी प्रवाह, मोजक्या कंपन्यांचे वाढते वर्चस्व आणि पारदर्शकतेच्या अभावावर व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : AI Industry Power Concentration कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) उद्योगातील सर्वात मोठा धोका हा तंत्रज्ञानाचा नसून, काही मोजक्याच कंपन्यांकडे एकवटलेला पैसा, सत्ता आणि वर्तुळाकार निधी (सर्क्युलर फंडिंग) प्रवाहाचा आहे, असा गंभीर इशारा नीती आयोगाच्या प्रतिष्ठित फेलो देवजानी घोष यांनी दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी सिलिकॉन व्हॅलीतील एआय परिसंस्थेच्या कार्यपद्धतीवर परखड भाष्य केले असून, यामुळे उद्योगाची स्पर्धात्मकता आणि लवचिकता धोक्यात येऊ शकते, असे म्हटले आहे. घोष यांनी आपल्या पोस्टमधून एआय उद्योगातील तीन मोठ्या चिंतांकडे लक्ष वेधले आहे.

सत्ता आणि अहंकाराचे केंद्रीकरण

काही मोजक्याच कंपन्या आणि व्यक्तींकडे अफाट प्रभाव एकवटला आहे. जेव्हा यशाचे रूपांतर ‘आपण कधीच चुकू शकत नाही’ या भ्रमात होते, तेव्हा व्यवस्थेतील नियंत्रण आणि समतोल कमकुवत होतो, असे त्या म्हणाल्या.

वर्तुळाकार निधी प्रवाह

सध्याच्या एआय बाजारपेठेत एकच कंपनी जणू ‘एआयची बँक’ बनत चालली आहे. जेव्हा त्याच ठराविक कंपन्या एकमेकांना निधी देतात, एकमेकांकडून खरेदी करतात आणि एकमेकांच्या उत्पादनांना प्रमाणित करतात, तेव्हा ही वाढ वास्तविक बाजारपेठेतील मागणीमुळे आहे की केवळ अंतर्गत निधीच्या फिरवाफिरवीमुळे, हे ओळखणे कठीण होते. हा थेट फसवणुकीचा प्रकार नसला, तरी कोणत्याही मजबूत उद्योगाचा हा पाया असू शकत नाही, असेही घोष म्हणाल्या.

विकेन्द्रीकरण आणि पारदर्शकतेची गरज

सिलिकॉन व्हॅलीने आपली एआय परिसंस्था विकसित करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. स्वतंत्र नवोपक्रम, भांडवलाचे विविध स्रोत आणि अधिक पारदर्शकतेद्वारे एक स्पर्धात्मक वातावरण तयार व्हायला हवे. एआय क्षेत्रातील नेतृत्व हे मोठ्या कंपन्यांच्या आकारावरून नव्हे, तर संपूर्ण परिसंस्थेच्या सामर्थ्यावरून मोजले गेले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

धोरणकर्त्यांमध्येही वाढती चिंता

देवजानी घोष यांच्या या इशाऱ्याला जागतिक पातळीवरूनही दुजोरा मिळत आहे. गुरुवारी येल विद्यापीठात बोलताना अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर मायकेल एस. बार यांनीही असाच सूर आळवला. काही मोजक्या एआय कंपन्यांच्या वर्चस्वामुळे या तंत्रज्ञानाचा सर्व आर्थिक फायदा त्यांच्याच पदरात पडेल आणि लहान व्यवसाय व कामगारांच्या संधी हिरावल्या जातील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मोठ्या कंपन्यांच्या अफाट गुंतवणूक क्षमतेपुढे लहान उद्योगांना स्पर्धा करणे कठीण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Read About : Cabinet meeting – पालघरमध्ये प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायालयाची होणार स्थापना; मंत्रिमंडाचा निर्णय
E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.