Ad Advertisement Ad Advertisement

Giant Baobab Trees – 5 महाकाय बाओबाब झाडे वाचवण्याची धडपड

दक्षिण आफ्रिका : बेकायदा उपटून जॉर्जियाला नेताना वन विभागाने पकडली

केपटाऊन : Giant Baobab Trees – जगातील अनेक देशांत रोज झाडांची कत्तल सुरू असताना, दक्षिण आफ्रिकेत मात्र पाच महाकाय झाडे वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी जीवाचे रान करत आहेत. बेकायदेशीरपणे उपटून जॉर्जियाला पाठवली जाणारी ही बाओबाब झाडे मोठ्या प्रयत्नांनंतर बुधवारी पुन्हा लावण्यासाठी टिम्बावती अभयारण्यात आणली गेली. प्रत्येक झाडाचे वजन १९ ते २९ टन आहे. तिथे लावून त्यांना केबलने आधार दिला जाईल.

पर्यावरण विभागाने १७ जुलैला ही झाडे अडवली, कारण निर्यातदाराकडे त्यांना काढण्याचे, वाहून नेण्याचे आणि निर्यात करण्याचे परवाने नव्हते. तेव्हापासून ती डर्बनमधील गोदामात पडून होती. निर्यातदाराने नंतर मागील तारखेची परवानगी मागितली, पण सरकारने ती नाकारली. झाडे जॉर्जियाला जाणार होती, याला विभागाने दुजोरा दिला, पण खरेदीदाराचे नाव सांगितले नाही. झाडे पाठवणाऱ्या कंपनीचा मालक सप्टेंबरमध्ये न्यायालयात हजर झाला. खटला जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.

चार वर्षांपूर्वी केनियातूनही आठ बाओबाब झाडे जॉर्जियाचे माजी पंतप्रधान, अब्जाधीश बिद्झिना इवानिश्विली यांच्या उद्यानासाठी नेली गेली. पर्यावरणवाद्यांनी त्याला ‘जैविक चोरी’ म्हटले. निर्यात आधी थांबली, पण नंतर परवानगी मिळाली. तज्ज्ञांच्या मते अशी निर्यात फार दुर्मिळ आहे, कारण ही झाडे उपटणे, वाहून नेणे आणि पुन्हा रुजवणे अतिशय कठीण आहे.

लवकर पुन्हा लावली तर झाडे वाचतील

बाओबाब फाउंडेशनच्या सारा व्हेंटर म्हणतात, झाडे लवकर लावली तर वाचण्याची चांगली शक्यता आहे. मे ते ऑक्टोबर हिवाळ्यात झाडे निष्क्रिय असतात. नोव्हेंबरमध्ये वसंत सुरू होताच नवी पाने फुटण्यासाठी झाडे पाणी वापरतात, म्हणून लगेच मातीत लावावी लागतील. झाडांची मुळे उथळ असल्याने ती खोल लावावी लागत नाहीत आणि पटकन वाढतात.

महाकाय आकारामुळे बचाव मोहिमेला उशीर

एवढ्या महाकाय झाडांची वाहतूक अवघड असल्याने बचाव मोहिमेला उशीर झाला. ही झाडे अवजड मालासाठीच्या खास ट्रकमधून आणावी लागली. टिम्बावती अभयारण्याने झाडे चढवणे, वाहतूक आणि पुन्हा लावणे यांचा खर्च उचलला. हत्तींनी नुकसान करू नये म्हणून विजेच्या कुंपणाचे संरक्षण असेल. झाडे २०० ते ३०० वर्षांची आहेत. बाओबाब हजार वर्षे जगतात, म्हणून त्यांच्याकडे अजून अनेक शतके आहेत.

स्वत:च एक परिसंस्था

बाओबाब म्हणजे स्वत:च एक परिसंस्था आहे, असे केनियाच्या वांबुई इप्पोलितो म्हणतात. वटवाघळे, पोपट, धनेश पक्षी त्याच्या ढोल्यांत राहतात आणि हत्ती, माकडे, रानडुक्कर त्याची फळे खातात. आफ्रिकेत हे झाड पवित्र मानले जाते. दक्षिण आफ्रिकेच्या कायद्यानुसार बाओबाब संरक्षित आहे. त्याला तोडण्यासाठी किंवा हलवण्यासाठी परवाना लागतो.

Read About : Drought in Maharashtra – राज्यात आता 310 तालुके दुष्काळी; हातकणंगले आणि गडहिंग्लजचा नव्याने समावेश
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.