पोलीस आयुक्तांनी केली पाहणी : सायंकाळी ५ पासूनच गस्त वाढणार
छत्रपती संभाजीनगर : Samruddhi Mahamarg Dial 112 Police Patrolling वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक हिम्मत राठोड यांच्या शासकीय वाहनावर समृद्धी महामार्गावर सावंगी शिवारात दगडफेक झाली होती. घटनेनंतर वेळेत डायल ११२ पोलिसांची मदत मिळाली नसल्याचे वृत्त समोर आल्यावर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गंभीर दखल घेत थेट समृद्धीवर पाहणी केली. तेथील नियंत्रण कक्षाला भेट देत माहिती घेतली. त्यानंतर हर्सूल ठाण्याचे एक अन् दौलताबाद ठाण्याचे एक, अशी दोन डायल ११२ ची वाहने समृद्धीवर २४ फिरतील आणि चोरी, लुटमारीच्या अनुषंगाने सायंकाळी ५ वाजेपासूनच पथके दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत दोन सत्रांत गस्त घालतील, अशा सुचना केल्या.
गुरुवारी (दि. १९) सायंकाळी ६.०५ वाजता सावंगी परिसरातील चॅनेल क्रमांक ४२६ येथे वाशिमच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या शासकीय वाहनावर अज्ञाताने दगडफेक केली. यात समोरील काच फुटली. वाहनात कार्यालय अधीक्षक हिम्मत राठोड यांच्यासह पाच जण होते. घाबरलेल्या चालकाने वाहन तीन किलोमीटर पुढे नेऊन थांबवले आणि ११२वर संपर्क साधला. तीन वेळा फोन करूनही दोन तास डायल ११२ चे पोलीस आले नसल्याचा आरोप त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, महामार्ग पोलीस त्यांच्या मदतीला गेले होते, असे चौकशीत समोर आले.
त्यामुळे पोलीस मदत मिळाली नाही, असे म्हणता येणार नाही. महामार्ग असो की डायल ११२ घटनास्थळी पोलीस आले होते, हे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे तक्रारदाराच्या आरोपात तथ्य नसल्याचेही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त पंकज अतुलकर, शशिकांत सातव, शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, रत्नाकर नवले, ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे, फुलंब्रीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक सोनाली पाईकराव, शहर गुन्हे शाखा निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस निरीक्षक अतुल येरमे, स्वाती केदार, ग्रामीणचे वाहतूक निरीक्षक आनंद झोटे, व महामार्ग पोलीस उपनिरीक्षक लहासे उपस्थित होते.
दगड तीन किलोमीटर गाडीवर कसा राहिला?
वाहनावर दगड आदळल्यानंतर ते तीन किलोमीटर पुढे गेले, तरी दगड गाडीवर राहिलाच कसा आणि नेमका कुठे अडकला होता, असा प्रश्न पोलीस आयुक्तांनी उपस्थित केला. त्यांनी दगडफेकीचे व वाहन थांबवलेले ठिकाण तपासून घटनाक्रमाची पडताळणी केली. दरम्यान, हा दगड कारच्या वायफरमध्ये अडकला होता, असे सांगितले जाते. पण, ते तांत्रिकदृष्ट्या बरोबर नाही, असेही पोलीस अधिकारी सांगत आहेत.
समृद्धीवरील प्रत्येक घटना ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना कळवा : आयुक्त
- डायल ११२ च्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीत महामार्ग पोलिसांची मदत मिळाल्याचे स्वत: तक्रारदाराने डायल ११२ च्या अंमलदारांना सांगितले. त्यामुळे डायल ११२ चे अंमलदार घटनास्थळी गेले नसल्याचे समोर आले.
- फोनवरून तक्रारदारांना हर्सूल ठाण्यात तक्रार देण्यासाठी येण्यास सुचवले होते; मात्र तक्रारदार ना हर्सूल ठाण्यात गेले ना फुलंब्री ठाण्यात. ते सरळ पुण्याला गेल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या दिवशीही याबाबत तक्रार दिलेली नव्हती.
- यापुढे समृद्धी महामार्गावर नियमितपणे डायल ११२चे एक वाहन राहील. तसेच सायंकाळी ५ ते रात्री ११ आणि रात्री ११ ते सकाळपर्यंत अशी दोन पथके गस्त घालतील, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या.
- यापुढे समृद्धीवरील प्रत्येक घटना समृद्धीच्या नियंत्रण कक्षातून प्रभारी अधिकाऱ्यांना कळवावी, अशी सुचना पोलीस आयुक्तांनी केली आहे.
Read About : Sambhajinagar Drug Trafficking – मांजावर संक्रांत येताच ड्रग्ज पेडलर बनलेल्या पतंग विक्रेत्याला बेड्या!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.