ऑगस्टमध्ये ११६ दशलक्ष डॉलर्सची मेमरी चिप निर्यात; संपूर्ण २०२५ च्या तुलनेत एका महिन्यात २.७ पट अधिक निर्यात
नवी दिल्ली : India Memory Chip Exports देशांतर्गत उत्पादनात झालेल्या मोठ्या वाढीमुळे भारताची मेमरी चिप निर्यात ऑगस्ट २०२६ मध्ये ११६ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १,००० कोटी रुपये) या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारताने केवळ ऑगस्ट महिन्यातच सुमारे ३३ लाख मेमरी चिप्सची निर्यात केली, जी संपूर्ण २०२५ या वर्षातील एकूण निर्यातीच्या तुलनेत २.७ पटीने अधिक आहे.
गेल्या दशकभरापासून भारताची वार्षिक मेमरी चिप निर्यात कधीही ४५ दशलक्ष डॉलर्सच्या पुढे गेली नव्हती; मात्र गुजरातच्या साणंद सेमीकंडक्टर क्लस्टरमध्ये नवीन प्रकल्प सुरू झाल्याने हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी व्यावसायिक उत्पादन सुरू करून भारतात बनवलेले पहिले मेमरी मॉड्यूल डेलला पाठवले. ३१ मार्च रोजी केन्स सेमीकॉन आणि ४ जुलै रोजी सीजी सेमीमध्येही उत्पादन सुरू झाले.
निर्यातीचा चढता आलेख
सीमाशुल्क (कस्टम) आकडेवारीनुसार, जानेवारीत १० दशलक्ष डॉलर्स असलेली निर्यात मार्चमध्ये १६ दशलक्ष, जूनमध्ये ३२ दशलक्ष आणि ऑगस्टमध्ये थेट ११६ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली. ऑगस्टमध्ये जवळपास सर्व निर्यात सिंगापूर आणि मलेशिया या देशांना झाली. यासोबतच सॉलिड-स्टेट ड्राइव्हची निर्यातही जानेवारीतील ८ दशलक्ष डॉलर्सवरून ऑगस्टमध्ये ११२ दशलक्ष डॉलर्सवर गेली. २०२६ च्या पहिल्या आठ महिन्यांत भारताने एकूण २१९ दशलक्ष डॉलर्सच्या मेमरी चिप्स निर्यात केल्या, ज्या २०२५ च्या एकूण निर्यातीच्या पाचपट आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचीही मोठी झेप
सप्टेंबर आणि ऑक्टोबरची चिप-स्तरीय आकडेवारी अद्याप येणे बाकी असले तरी, एकूण इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीने मोठी आघाडी घेतली आहे. सप्टेंबरमध्ये ही निर्यात ७०.४ टक्क्यांच्या वाढीसह ५.३१ अब्ज डॉलर्स, तर ऑक्टोबरमध्ये ६२.७ टक्क्यांच्या वाढीसह ६.६४ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.