डार्क वेबवर कथितपणे ४ हजार अग्निवीरांचा डेटा अपलोड करून सुमारे ४७ हजार रुपयांची मागणी; भरती पोर्टल हॅक झाले होते का, याचा तपास सुरू
नवी दिल्ली : Agniveer Data Leak Investigation सुमारे दोन महिन्यांपूर्वी दिल्लीत तपास यंत्रणांनी एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाची चौकशी केली. त्याच्यावर ‘डार्क वेब’वर डेटा विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे, अशी माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या मुलाने काही फाईल्स ‘डार्क वेब’वर अपलोड केल्या होत्या आणि तो त्या बदल्यात पैसे मिळवण्यासाठी खरेदीदारांच्या शोधात होता. मात्र, कोणताही व्यवहार पूर्ण होण्याआधीच तपास यंत्रणांनी त्याला पकडले.
४००० अग्निवीरांचा डेटा असल्याची जाहिरात
‘डार्क वेब’वर त्याने आपल्याकडे ४००० अग्निवीरांचा डेटा असल्याची जाहिरीत करून डेटाची किंमत सुमारे ४७ हजार रुपये (५०० डॉलर्स) ठेवली होती. त्याने हा डेटा एआयचा वापर करून मिळविला असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
‘अग्निवीर’ भरती पोर्टल हॅक केले?
तपास यंत्रणांना संशय आहे की, जप्त केलेला डेटा ‘अग्निवीर’ किंवा ‘अग्निवीर’ भरती प्रक्रियेशी संबंधित असू शकतो. मात्र, या फाईल्स नेमक्या कशा आहेत, याचा तपास अजूनही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अल्पवयीन मुलाने ‘अग्निवीर’ भरती पोर्टल हॅक करून हा डेटा मिळवला होता का, याचीही तपासाचा एक भाग म्हणून पडताळणी केली जात आहे.
झटपट पैसा कमावणे हाच उद्देश
झटपट पैसे कमावणे हा या मुलाचा मुख्य उद्देश असावा, असा संशय तपासकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दिल्ली पोलिसांनी या मुलाकडून सर्व डेटा हस्तगत केला असून त्याची सत्यता पडताळण्यात येत आहे. पोलिसांनी पडताळणीसाठी अग्निवीरांचा डेटा मिळवण्यासाठी प्गृहमंत्रालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. संशयिताची प्राथमिक चौकशी करून त्याला त्याच्या कुटुंबीयांकडे देण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाकडून योजनेत सुधारणा
केंद्रीय मंत्रिमंडळाने या महिन्याच्या सुरुवातीला या योजनेत सुधारणा केली आहे. चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, गुणवत्तेच्या आधारावर २५ टक्के अग्निवीरांना नियमित सशस्त्र दलात समाविष्ट केले जाईल. उर्वरित ७५ टक्के अग्निवीरांसाठी, स्वेच्छेवर आधारित आणखी दोन वर्षांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्याची तरतूद सुधारित योजनेत करण्यात आली आहे. सहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर, जे उमेदवार पुढे काम करण्यास इच्छुक असतील, त्यांना विहित निवड निकषांच्या अधीन राहून नियमित भरतीसाठी विचारात घेतले जाईल.
‘अग्निपथ’ योजना केंद्र सरकारने जून २०२२ मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत लष्कर, नौदल आणि हवाई दलात चार वर्षांच्या कालावधीसाठी भरती केली जाते. या योजनेद्वारे भरती झालेल्यांना ‘अग्निवीर’ म्हटले जाते; त्यांना लष्करी प्रशिक्षण दिले जाते आणि त्यानंतर संबंधित दलांमध्ये तैनात केले जाते. मूळ आराखड्यानुसार, अग्निवीरांच्या प्रत्येक तुकडीपैकी २५ टक्क्यांपर्यंतचे अग्निवीर हे त्यांच्या गुणवत्तेच्या आणि सशस्त्र दलांच्या संघटनात्मक गरजांच्या आधारावर, सशस्त्र दलांच्या नियमित संवर्गात भरती होण्यास पात्र ठरतात. उर्वरित ७५ टक्के अग्निवीरांना त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सेवा सोडावी लागते.
Read About : Hemant Sapkal Death Case : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी नरबळी? इंदूरमधील तरुणाच्या मृत्यूने खळबळ!
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.