Ad Advertisement Ad Advertisement

Manipur Toxic Liquor Case : मणिपूरमध्ये विषारी दारू प्रकरणात 13 जणांचा मृत्यू, 300 रुग्णालयात

नुंगपान आणि आसपासच्या गावांमध्ये गंभीर परिस्थिती, भेसळयुक्त दारूच्या स्रोताचा शोध घेण्यासाठी तपास सुरू

इंफाळ : Manipur Toxic Liquor Case मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने शनिवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला असून, या दुर्घटनेतील मृतांची एकूण संख्या आता १३ वर पोहोचली आहे. १८ नोव्हेंबरपासून आतापर्यंत सुमारे ३०० जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या घटनेतील बाधित नागरिक प्रामुख्याने डोंगराळ चंदेल जिल्ह्यातील नुंगपान गाव, चकपिकरोंग गाव आणि आसपासच्या परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्यावर इंफाळमधील सरकारी जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (जेएनआयएमएस), रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (आरआयएमएस) तसेच दोन खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुंगपान गावातील ५० वर्षीय ह्रांगबुंग बेरुवंग अनल यांचा १८ नोव्हेंबरच्या रात्री राहत्या घरी सर्वप्रथम मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवार आणि शुक्रवारी चंदेल जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आणखी १२ जणांचा बळी गेला. रुग्णालयात नेत असताना किंवा स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी) आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये (सीएचसी) या रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने चंदेल जिल्हा प्रशासनाने सात मुद्द्यांची नियमावली जारी केली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत नागरिकांनी स्थानिक पातळीवर तयार केलेली किंवा संशयास्पद ठिकाणांहून येणारी दारू पिऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दारू प्यायल्यानंतर उलट्या, पोटदुखी, डोकेदुखी, चक्कर येणे, धूसर दिसणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असा इशाराही देण्यात आला आहे. 

या मृत्यूंमागील नेमके कारण शोधण्यासाठी वैद्यकीय आणि वैज्ञानिक तपासणी सुरू आहे. चंदेलचे पोलिस अधीक्षक धर्मेंद्र कुमार यांनी उपायुक्त मामोनी डोले यांना सादर केलेल्या अहवालात, पीडितांनी प्यायलेली भेसळयुक्त दारू शेजारील काकचिंग जिल्ह्यातील सुग्नू येथून खरेदी केल्याचे नमूद केले आहे. म्यानमारच्या खुल्या सीमेला लागून असलेला हा डोंगराळ भाग कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. 

Read About : Hemant Sapkal Death Case : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी नरबळी? इंदूरमधील तरुणाच्या मृत्यूने खळबळ!
E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.