Ad Advertisement Ad Advertisement

Mba Cet New Exam Pattern 2027 – 28- एमबीए प्रवेशासाठी आता नवा परीक्षा पॅटर्न

२०० ऐवजी आता १५० प्रश्न
२०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून नवी पद्धत लागू

छत्रपती संभाजीनगर : Mba Cet New Exam Pattern – महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या एमबीए आणि एमएमएस सीईटी परीक्षेच्या स्वरूपात महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून ही परीक्षा नव्या पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यानुसार, आतापर्यंत २०० प्रश्नांची आणि २०० गुणांची असलेली परीक्षा आता १५० प्रश्नांची आणि १५० गुणांची होणार आहे. तसेच परीक्षेचा कालावधीही १५० मिनिटांवरून कमी करून १२० मिनिटे करण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना कमी वेळेत अधिक प्रश्न अचूकपणे सोडवण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

सीईटी कक्षाने जाहीर केलेल्या नव्या परीक्षा पद्धतीनुसार, प्रत्येक प्रश्नाला एक गुण दिला जाणार असून, चुकीच्या उत्तरासाठी कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत. म्हणजेच परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगची पद्धत पूर्वीप्रमाणेच लागू राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवताना योग्य पर्याय निवडण्याबरोबरच उपलब्ध वेळेचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रश्नांची संख्या आणि वेळ दोन्ही कमी झाल्यामुळे परीक्षेतील वेग, अचूकता आणि संकल्पनांची स्पष्टता यांना अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे.

नवीन परीक्षा पद्धतीनुसार प्रश्नपत्रिका चार विभागांमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये लॉजिकल रिझनिंग या विभागातून सर्वाधिक ६० प्रश्न विचारले जाणार आहेत. ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग विभागासाठी १० प्रश्न असतील. कॉन्टिटेटिव्ह ॲप्टिट्यूड विभागातून ४० प्रश्न, तर व्हर्बल ॲबिलिटी आणि रिडिंग कॉम्प्रेहेन्शन या विभागातून ४० प्रश्न विचारले जाणार आहेत. अशा प्रकारे एकूण १५० प्रश्नांची प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली आहे.

ऑनलाइन परीक्षा, इंग्रजी माध्यम अनिवार्य

नव्या नियमानुसार ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन संगणकाधारित पद्धतीने घेतली जाणार आहे. संपूर्ण प्रश्नपत्रिका इंग्रजी माध्यमातून असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतील प्रश्न समजून घेण्याचा आणि त्यांचे आकलन करून योग्य उत्तर निवडण्याचा सराव करावा लागणार आहे. विशेषत: व्हर्बल ॲबिलिटी आणि रिडिंग कॉम्प्रेहेन्शन या विभागासाठी इंग्रजी वाचनाचा नियमित सराव महत्त्वाचा ठरणार आहे.

पीजीडीएम, पीजीसीएमचाही प्रवेश परीक्षेत समावेश

यंदाच्या बदलांमधील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम) आणि पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट (पीजीसीएम) या दोन अभ्यासक्रमांचाही सीईटी परीक्षेत समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी प्रामुख्याने एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जात होती. मात्र, आता या दोन नवीन अभ्यासक्रमांनाही प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आल्याने व्यवस्थापन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या संधींचा विस्तार होणार आहे. विशेष म्हणजे, एमबीए, एमएमएस, पीजीडीएम आणि पीजीसीएम या चारही अभ्यासक्रमांसाठी समान परीक्षा स्वरूप, अभ्यासक्रम आणि गुणांकन पद्धती लागू राहणार आहे.

Read About : Ugc Net December 2026 Exam – यूजीसी नेटचा बिगुल वाजला!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.