तीन दिवसांत ६.२७ कोटींची वीजचोरी पकडली
छत्रपती संभाजीनगर : Mahavitaran Electricity Theft Action – राज्यात वीजचोरी आणि अनधिकृत वीज वापराच्या माध्यमातून महावितरणच्या महसुलाला गळती लावणाऱ्यांविरोधात सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यभरात अवघ्या तीन दिवसांत राबविण्यात आलेल्या विशेष वीजचोरी शोध मोहिमेत तब्बल २५० प्रकरणे उघडकीस आली आहेत. या कारवाईतून तब्बल ६ कोटी २७ लाख रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे धाबे दणाणले असून वीजचोरी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
वीजचोरीमुळे महावितरणचे आर्थिक नुकसान होत असून त्याचा परिणाम अधिकृतपणे वीज वापरणाऱ्या ग्राहकांवरही होतो. ही महसूल गळती रोखण्यासाठी महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागामार्फत भरारी पथकांच्या माध्यमातून राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या चारही प्रादेशिक परिक्षेत्रांमध्ये एकाच वेळी तपासणी करण्यात आली. संशयास्पद वीजजोडण्या, मीटरमधील अनियमितता आणि अनधिकृत वीज वापराच्या प्रकारांची कसून तपासणी करण्यात आली.
या मोहिमेत सर्वाधिक ७३ वीजचोरीची प्रकरणे पुणे प्रादेशिक विभागात उघडकीस आली आहेत. त्याखालोखाल नागपूर विभागात ६८, छत्रपती संभाजीनगर विभागात ५६, तर कोकण विभागात ५३ प्रकरणे आढळली. अशा प्रकारे चारही प्रादेशिक विभागांमध्ये एकूण २५० प्रकरणे उघडकीस आली आहेत. या सर्व प्रकरणांचे मूल्यांकन करण्यात आले असून संबंधित ग्राहकांना वीजचोरीपोटी एकूण ६ कोटी २७ लाख रुपयांची देयके देण्यात आली आहेत.
२४० जणांवर विद्युत कायद्यानुसार कारवाई
वीजचोरीच्या या प्रकरणांमध्ये विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ अन्वये २४० ग्राहकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तर कलम १२६ अंतर्गत अनधिकृत वीज वापराच्या दोन प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. वीजचोरीचे मूल्यांकन आणि संबंधित दंडाची रक्कम निश्चित केल्यानंतर ग्राहकांना देयके बजावण्यात आली आहेत. निर्धारित मुदतीत वीजचोरीचे बिल आणि दंडाची रक्कम जमा न करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांकडे फिर्याद देण्यात येणार आहे. विद्युत कायद्यानुसार वीजचोरीचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, दोषी आढळणाऱ्यांना दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्यांनी अशा प्रकारांपासून दूर राहावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
थकबाकीदारांच्या वीजजोडण्याही रडारवर
दरम्यान, केवळ नवीन वीजचोरीची प्रकरणे शोधण्यापुरतीच ही मोहीम मर्यादित नसून, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या वीजजोडण्यांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर काही ग्राहक अनधिकृतपणे पुन्हा वीजजोडणी करून वीज वापरत असल्याच्या शक्यतेतून अशा जोडण्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळातही वीजचोरीविरोधातील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र तसेच सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांनी ग्राहकांना अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
Read About : Ugc Net December 2026 Exam – यूजीसी नेटचा बिगुल वाजला!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.