Ad Advertisement Ad Advertisement

Children’s Bank of India Fake Notes – ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या नोटा देऊन व्यापाऱ्याला 40 लाखांचा गंडा

गुजरातच्या अहमदाबाद शहरातील घटना, दोन भामटे गजाआड

अहमदाबाद : Children’s Bank of India Fake Notes – गुजरातमध्ये भामट्यांनी एका व्यापाऱ्याला तब्बल ४० लाख रुपयांना फसवले. या व्यापाऱ्याला ५०० रुपयांच्या नोटांचे आठ बंडल देण्यात आले. प्रत्येक बंडलमध्ये ५ लाख रुपये असल्याचे सांगितले गेले, पण नोटांवर चक्क चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असे छापलेले होते. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

दिल्लीचा २३ वर्षीय राहुल सिंह ठाकूर आणि राजस्थानमधील बिकानेरचा ३० वर्षीय मालचंद शर्मा यांना गुरुवारी (१९ नोव्हेंबर) अहमदाबादमध्ये एका पेट्रोल पंपाजवळ पकडण्यात आले. तक्रारदाराच्या कुटुंबाच्या मदतीने पोलिसांनी सापळा रचला होता. घाटलोडिया पोलीस ठाण्यातील एफआयआरनुसार, मंगळवारी ही फसवणूक उघडकीस आली. गांधीनगरचे व्यापारी राईकेन पटेल यांचे मामा रोहितकुमार पटेल यांची उंझा येथे ट्रेडिंग फर्म आहे. नागपूरच्या एका व्यापाऱ्याकडून त्यांना ४० लाख रुपये यायचे होते. ही रक्कम पोहोचवण्यासाठी एका ऑनलाइन ‘अंगडिया’ फर्मची मदत घेतली गेली. (अंगडिया ही गुजरातमधील पारंपरिक सेवा आहे. ती रोख रक्कम एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचवते आणि पैसे पाठवण्याचेही काम करते.) या फर्मच्या वतीने व्यापाऱ्याच्या प्रतिनिधींना आठ बंडल देण्यात आले. नंतर तपासल्यावर सर्व नोटा बनावट असल्याचे समजले.

असे अडकवले जाळ्यात

फसवणुकीनंतर कुटुंबाने गप्प न बसता आरोपींना पकडण्याचे ठरवले. अहमदाबादमध्ये पुन्हा रोख रक्कम पोहोचवण्याची योजना आखली गेली. पोलिसांच्या मदतीने रचलेल्या या सापळ्यामागे टोळीतील लोकांना ओळखून रंगेहाथ पकडण्याचा हेतू होता. तक्रारदाराच्या वडिलांना व्हॉट्सॲपवर पैसे पोहोचल्याचा संदेश आला. त्यानंतर राहुल आणि मालचंद बॅग घेऊन पारसनगर पेट्रोल पंपावर आले. त्यांनी राईकेन व त्यांच्या वडिलांना नोटांचे गठ्ठे दाखवायला सुरुवात करताच पोलिसांनी दोघांना जागेवरच पकडले.

बॅगमध्ये १,६६६ बनावट नोटा

झडतीत राहुलच्या बॅगमध्ये बनावट नोटांचे १७ बंडल सापडले. त्यात एकूण १,६६६ नोटा होत्या. त्यांवरही चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया व इतर मजकूर छापलेला होता.

Read About:Varsha Turkar Murder Case – मित्राच्या पत्नीनेच दिली १३ लाखांची सुपारी
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.