Ad Advertisement Ad Advertisement

Beed Drought Relief Distribution – दुष्काळ निधीचे वितरण सुरू, 309 कोटींची मदत खात्यावर जमा

६ लाख १८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष मदत जमा

बीड Beed Drought Relief Distribution : दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या शेतकरी बांधवांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या मदत योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, जिल्ह्याने मदत वितरणाच्या प्रक्रियेत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. २० नोव्हेंबर रोजी पर्यंत जिल्ह्यातील एकूण ६ लाख २१ हजार ३७६ शेतकऱ्यांना मदतीसाठी मंजुरी मिळाली असून, त्यापैकी ६ लाख १८ हजार २१८ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष मदत जमा झाली आहे. या माध्यमातून एकूण ३०९ कोटी ११ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे.

पात्र शेतकऱ्यांना अग्रिम स्वरूपात ५ हजार रुपये मदत देण्याच्या योजनेतून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.तालुकानिहाय आकडेवारी पाहता गेवराई तालुक्यात सर्वाधिक ९५ हजार ३४६ शेतकऱ्यांना मंजुरी मिळाली असून , त्यापैकी ९५ हजार ०८४ शेतकऱ्यांना ४७ कोटी ५४ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत . बीड तालुक्यात ८५ हजार २३८ शेतकऱ्यांना मंजुरी मिळाली असून, ८५ हजार ००७ शेतकऱ्यांच्या खात्यात ४२ कोटी ५० लाख रुपये जमा झाले आहेत.

आष्टी तालुक्यात ७८ हजार २८५ मंजूर लाभार्थ्यांपैकी ७८ हजार २५३ शेतकऱ्यांना ३९ कोटी १३ लाख रुपये मिळाले आहेत. केज तालुक्यात ७३ हजार ४४४ मंजूर शेतकऱ्यांपैकी ७२ हजार ६४३ लाभार्थ्यांना ३६ कोटी ३२ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत . या आकडेवारीतून जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे. अंबाजोगाई तालुक्यात ५२ हजार ०८३ शेतकऱ्यांना मंजुरी मिळाली असून, ५२ हजार ०१२ शेतकऱ्यांना २६ कोटी १ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

माजलगाव तालुक्यात ५२ हजार ६८५ मंजूर लाभार्थ्यांपैकी ५१ हजार ६५० शेतकऱ्यांच्या खात्यात २५ कोटी ८३ लाख रुपये जमा झाले आहेत. परळी तालुक्यात ४७ हजार ४५४ मंजूर शेतकऱ्यांपैकी ४७ हजार १९१ शेतकऱ्यांना २३ कोटी ६० लाख रुपये मिळाले आहेत. पाटोदा तालुक्यात ४० हजार ०५४ मंजूर लाभार्थ्यांपैकी ४० हजार ००९ शेतकऱ्यांना २० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. शिरूर कासार तालुक्यात ४० हजार ५२३ मंजूर लाभार्थ्यांपैकी ४० हजार ४०० शेतकऱ्यांना २० कोटी २० लाख रुपये, धारूर तालुक्यात ३२ हजार ७७४ मंजूर लाभार्थ्यांपैकी ३२ हजार ५१७ शेतकऱ्यांना १६ कोटी २६ लाख रुपये, तर वडवणी तालुक्यात २३ हजार ४९० मंजूर लाभार्थ्यांपैकी २३ हजार ४५२ शेतकऱ्यांना ११ कोटी ७३ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

प्रशासनाकडून समन्वित प्रयत्न सुरू
जिल्ह्यातील मदत वितरणाची प्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शक व्हावी, पात्र लाभार्थ्यांपर्यंत मदत वेळेत पोहोचावी आणि तांत्रिक अडचणींमुळे कोणताही शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून समन्वित प्रयत्न सुरू आहेत. अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी विविध कामांचा आढावा घेत आहेत. क्षेत्रीय महसूल यंत्रणेच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या नोंदींची पडताळणी, मंजूर प्रकरणांचे वितरण पूर्ण करणे, बँक खात्यांशी संबंधित त्रुटी दूर करणे आणि प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करण्यावर भर दिला जात आहे.
- चंद्रकांत शेळके, तहसीलदार,बीड
पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याला प्राधान्य

दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांमध्ये आर्थिक मदतीसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, जलसंधारणाच्या कामांना चालना देणे आणि लोकसहभागातून पाणीटंचाईवर मात करणे या बाबींनाही महत्त्व देण्यात येत आहे.तसेच शासनाच्या आर्थिक मदतीचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि त्याचवेळी पाणीटंचाई निवारणासाठी स्थानिक स्तरावर उपाययोजना करणे या दोन्ही बाबी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

नागरिकांमध्ये आशेचे वातावरण

बीड जिल्ह्यातील दुष्काळी मदत वितरणाची सद्यस्थिती, लोकसहभागातून सुरू असलेले पाणीपुरवठ्याचे उपक्रम आणि महसूल प्रशासनाकडून होत असलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण होत आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचविणे, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणे आणि पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना गती देणे यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. शासन, प्रशासन आणि समाजाच्या एकत्रित प्रयत्नांनी दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी सकारात्मक वाटचाल सुरू आहे .

Read About: Sleep and Brain Health : मधुमेह, हृदयरुग्णांसाठी चांगली झोप ठरते मेंदूची ढाल; 4 लाखांहून अधिक लोकांच्या अभ्यासातून निष्कर्ष

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.