राज्यभरात सुमार 2.84 लाख प्रगणक आणि पर्यवेक्षक तैनात
मुंबई : Census 2027 – जनगणना 2027च्या दुसऱ्या टप्प्याला राज्यात पुढील वर्षी जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात 10 ते 24 जानेवारी 2027 या कालावधीत नागरिकांना ऑनलाइन स्वयंगणना पोर्टलद्वारे स्वत:ची माहिती नोंदवता येणार आहे. त्यानंतर 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन लोकसंख्या गणना करणार आहेत.
जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रधान जनगणना अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय परिषद अलीकडेच सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या आभासी उपस्थितीत झाले. जनगणनेच्या माध्यमातून संकलित होणारी माहिती पुढील नियोजन आणि विविध विकासकामांसाठी महत्त्वपूर्ण असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश राजेश अग्रवाल यांनी दिले.
बेघर लोकांची गणना
राज्यातील निर्धारित कार्यक्रमानुसार 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्री बेघर लोकांची गणना करण्यात येईल, तर 1 ते 5 मार्च या कालावधीत पुनरावलोकन फेरी होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांची लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक आणि आर्थिक माहिती संकलित करण्यासाठी ४० प्रश्न असलेली डिजिटल प्रश्नावली वापरण्यात येणार आहे. यामध्ये नाव, कुटुंबप्रमुखाशी असलेले नाते, लिंग, वय, वैवाहिक स्थिती, धर्म, जात, दिव्यांगत्व, मातृभाषा, शिक्षण, व्यवसाय, रोजगार आणि स्थलांतर यासंबंधी माहितीचा समावेश असल्याचे प्रधान सचिव आणि राज्य नोडल अधिकारी रणजित सिंग देओल यांनी सांगितले.
अचूक माहितीचे संकलन आवश्यक
केंद्र सरकारच्या संयुक्त सचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी जनगणनेतील माहिती अचूकपणे संकलित करण्याचे महत्त्व विशद केले. जनगणनेतील त्रुटींचा परिणाम मतदारसंघ पुनर्रचना, वैधानिक आरक्षण तसेच आगामी दशकातील लोकसंख्याविषयक मूलभूत आकडेवारीवर होऊ शकतो. त्यामुळे राज्यभरात तैनात करण्यात येणाऱ्या सुमारे 2.84 लाख प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी प्रत्येक व्यक्तीची नोंद होईल, याची दक्षता घ्यावी, असे डॉ. डांगे यांनी सांगितले.
शहरी भागातील आव्हाने
अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी शहरी भागातील जनगणनेदरम्यान येणाऱ्या आव्हानांकडे लक्ष वेधले. महाराष्ट्राच्या लोकसंख्येतील सुमारे 50 टक्के लोकसंख्या शहरी भागात राहत असल्याने स्थलांतर, नागरिकांची सततची ये-जा, दाट वस्ती आणि शहरांचा विस्तार यांचा विचार करून नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
Read About : Bank of Maharashtra Crop Loan – शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कर्जवाटप शिबिरांचे आयोजन
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.