अल निनोमुळे उत्पादना घट होण्याची शक्यता, खाद्यतेलाचा साठाही संकटात
नवी दिल्ली : El Nino Impact on Food Prices – अल निनोचा फटका आता थेट सामान्यांच्या स्वयंपाकघराला बसणार का? भात, साखर आणि खाद्यतेलाच्या बाजारात आगामी काळात चिंता वाढण्याची शक्यता आहे. अल निनोमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल हवामानाचा परिणाम जागतिक शेती आणि अन्नपुरवठ्यावर होऊ शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने आपल्या ताज्या ‘फूड आउटलुक’ अहवालात याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.
चार वर्षांनंतर तांदूळ उत्पादनात घट?
जगभरात गेल्या चार वर्षांपासून तांदूळ उत्पादनात वाढ होत होती. मात्र, २०२६-२७ या हंगामात उत्पादन घटण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा कमी होणारा नफा आणि अल निनोमुळे बदलणारे हवामान ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. उत्पादन जागतिक मागणीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज असला तरी आधीच्या साठ्यामुळे तांदळाची उपलब्धता काही प्रमाणात टिकून राहू शकते.
साखर आणि खाद्यतेलाची चिंता
जागतिक बाजारात साखरेचे उत्पादनही घटण्याची शक्यता आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यास साखरेच्या किमती वाढण्याचा दबाव निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे, तेलबियांचे उत्पादन विक्रमी होण्याचा अंदाज असूनही खाद्यतेलाचा साठा कमी होऊ शकतो. जैवइंधन निर्मितीसाठी वनस्पती तेलांची वाढती मागणी हे त्यामागील प्रमुख कारण आहे.
माशांच्या उत्पादनावरही परिणाम
अल निनोमुळे पेरूमधील अँचोव्ही माशांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांमधील मासेमारी ३.४ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. मात्र, जलचर पालन क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे.
गहू आणि दुधाबाबत दिलासा
तांदूळ आणि साखरेच्या तुलनेत गहू व मका उत्पादनाचे चित्र समाधानकारक आहे. जागतिक धान्यसाठ्यात १.८ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेच, दूध उत्पादनात १.८ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
एकूणच, हवामानातील बदलाचा परिणाम आता शेतापासून बाजारपेठेपर्यंत पोहोचत आहे. भात, साखर आणि खाद्यतेलाच्या उपलब्धतेवर निर्माण होणारा दबाव भविष्यात ग्राहकांच्या खिशालाही चटका देऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात जागतिक अन्नबाजाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read About : Anthropic IPO Employees – अँथ्रोपिकच्या आयपीओमुळे कर्मचाऱ्यांचे नशीब पालटले
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.