हप्ते थकवणाऱ्यांचे प्रमाण विक्रमी, महागड्या गाड्या, व्याजदर आणि इंधनदरांचा फटका, थकबाकी ६.३ टक्क्यांवर
वॉशिंग्टन डीसी : US Auto Loan Delinquency – अमेरिकेत वाहन खरेदी करणे सामान्य नागरिकांसाठी दिवसेंदिवस महागडे ठरत आहे. वाहनांच्या वाढलेल्या किमती, कर्जावरील चढे व्याजदर, महागलेले पेट्रोल आणि विम्याचे वाढते हप्ते यामुळे कर्जदारांचे आर्थिक गणित बिघडले आहे. परिणामी, वाहन कर्जाचे हप्ते थकवणाऱ्यांचे प्रमाण विक्रमी पातळीवर पोहोचल्याचे ‘फिच रेटिंग्ज’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अहवालानुसार, ऑक्टोबर २०२६ मध्ये कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या सबप्राइम कर्जदारांच्या वाहन कर्जांचे ६० दिवसांपेक्षा अधिक काळ थकीत राहण्याचे प्रमाण ६.३ टक्क्यांवर पोहोचले. हे प्रमाण जागतिक आर्थिक मंदीच्या काळातील आणि कोरोना महामारीपूर्वीच्या पातळीपेक्षाही अधिक आहे. याउलट, चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या प्राइम कर्जदारांमध्ये थकबाकीचे प्रमाण सुमारे ०.५ टक्के आहे.
वाहनांच्या किमती आणि व्याजदरांचा फटका
‘केली ब्लू बुक’च्या आकडेवारीनुसार, महामारीनंतर अमेरिकेत नवीन वाहनांच्या सरासरी किमतीत ३५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. पूर्वी ३७ हजार डॉलरमध्ये मिळणाऱ्या प्रवेशस्तरावरील वाहनांची किंमत आता ५० हजार डॉलरच्या पुढे गेली आहे. त्यातच सबप्राइम ग्राहकांना नवीन कार कर्जावर १३ ते १५ टक्के, तर जुन्या कारसाठी १९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज द्यावे लागत आहे.
पेट्रोल आणि विम्याचाही वाढता भार
अमेरिका-इराण संघर्षामुळे पेट्रोलचे दर फेब्रुवारी २०२६ मधील प्रति गॅलन २.९० डॉलरवरून वाढून ४.२७ डॉलरवर पोहोचले आहेत. तसेच, सुटे भाग महागल्याने आणि वाहनांमधील आधुनिक तंत्रज्ञानामुळे गेल्या पाच वर्षांत विम्याच्या हप्त्यांत जवळपास ५० टक्क्यांची वाढ झाली आहे.
दीर्घ मुदतीच्या कर्जामुळे वित्तीय संस्थांची चिंता
मासिक हप्ता कमी ठेवण्यासाठी कर्जाचा कालावधी वाढवला जात आहे. ऑक्टोबर २०२६ पर्यंत एकतृतीयांशहून अधिक वाहन कर्जे ७२ महिने किंवा त्याहून अधिक मुदतीची होती. कमी डाउन पेमेंट आणि दीर्घ मुदतीमुळे कर्जाची परतफेड सुरू असतानाच वाहनाचे बाजारमूल्य कमी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे कर्जदाराने हप्ते थकवल्यास बँका आणि वित्तीय संस्थांचे नुकसान होऊ शकते, असा इशारा फिचने दिला आहे.
Read About: Nakshatrawadi Daytime House Burglary – नक्षत्रवाडीत दिवसा फोडली 2 घरे; साडेतीन तोळे दागिने लंपास
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.