Ad Advertisement Ad Advertisement

Maharashtra Suspends Microfinance Loan – मायक्रो फायनान्सच्या कर्जवसुलीला आठ महिने स्थगिती : बावनकुळे

बोअरवेल आणि टँकरच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

नागपूर : Maharashtra Suspends Microfinance Loan मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा झाली असून, त्यांनीही आठ महिने वसुली करणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र, मायक्रो फायनान्सच्या नावाखाली काही ठिकाणी अवैध सावकारी सुरू झाली आहे. अशा प्रकारे वसुली करणाऱ्यांविरोधात सरकार कठोर भूमिका घेणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही यासंदर्भात माझी भेट घेतली होती, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपुरात माध्यमांशी बोलताना सांगितले.

महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मायक्रो फायनान्स कंपन्यांनी पुढील आठ महिने कर्जवसुली करू नये, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. पंचायत स्तरापासून ते प्रशासनातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या बैठका घेऊन आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. १५ डिसेंबरपर्यंत बोअरवेल खोदण्यावरील बंदी उठवण्यात आली असताना काही बोअरवेल व्यावसायिक ७० हजार रुपयांच्या कामासाठी एक लाख २० हजार रुपये मागत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून बोअरवेलचे दर ७० हजार रुपयांच्या पुढे जाऊ नयेत, असे स्पष्ट केले आहे. टँकरचालकांनीही नागरिकांकडून अवाजवी पैसे आकारू नयेत. अशा तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

पडिक जमीन हस्तांतरणासंदर्भात आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असे महसूलमंत्री म्हणाले. मूळ शेतकरी स्वत:ची जमीन कसत असेल, तर त्याच्या जमिनीला कोणताही धोका नाही. मात्र, शेतकऱ्यांकडून ५० ते १०० एकर किंवा त्यापेक्षा अधिक जमीन खरेदी करून त्यावर केवळ फार्म हाऊस उभारणाऱ्या आणि जमीन पडिक ठेवणाऱ्या मोठ्या जमीनधारकांनी पुढील तीन ते पाच वर्षांत या जमिनी शेती उत्पादनाखाली आणाव्यात, अशी आमची भूमिका आहे, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले.

रोहित पवारांनी चर्चेसाठी यावे

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रोहित पवार यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यापेक्षा सरकारशी चर्चा करावी. दुष्काळ निवारण समितीचा अध्यक्ष या नात्याने माझे दालन त्यांच्यासाठी खुले आहे. येत्या बुधवारी यासंदर्भात बैठकही आहे. त्यांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सकारात्मक निर्णय घेण्यास सरकार तयार आहे. सरकारने प्रश्न ऐकले नाहीत किंवा मदत केली नाही, तर मोर्चा काढण्याचा त्यांना अधिकार आहे. मात्र, केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मोर्चे काढण्याऐवजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करावी, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करून संपवले जीवन

अमरावती : दोन फायनान्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवार, २२ नोव्हेंबर रोजी रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अमोल मुरलीधर काळे (४०, रा. सातेगाव, अंजनगाव सुर्जी) असे मृताचे नाव आहे, तर सुनील पेलने, कुणाल इंगळे, सुहास डायगव्हाणे व राजेंद्र चालके अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सुनील व कुणाल हे स्पंदना स्फूर्ती फायनान्स कंपनीच्या अंजनगाव सुर्जी शाखेत, तर सुहास व राजेंद्र हे महेंद्रा होम फायनान्स कंपनीच्या परतवाडा येथील शाखेत कार्यरत आहेत. अमोल काळे यांनी स्पंदना स्फूर्ती फायनान्स व महेंद्रा होम फायनान्स या दोन कंपनीकडून कर्जाची उचल घेतली होती.

दरम्यान, दोन्ही फायनान्स कंपनीचे कर्मचारी सुनील, कुणाल, सुहास व राजेंद्र हे चौघे अमोल काळे यांना वारंवार कॉल करून थकीत कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा लावत होते. त्यांच्यासोबत बोलताना अपशब्द वापरत होते. या त्रासाला कंटाळून अमोल काळे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी मृत अमोल काळे यांच्या पत्नीने रहिमापूर ठाण्यात तक्रार दाखल केली. आपल्या पतीच्या आत्महत्येस फायनान्स कंपनीचे हे चार कर्मचारीच कारणीभूत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले. तक्रारीवरून पोलिसांनी या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

रहिमापूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून दोन फायनान्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

  • प्रशांत देशमुख, ठाणेदार, रहिमापूर

Read About : Maharashtra Wage Rules – राज्यात ‘महाराष्ट्र वेतन नियम, 2026’ लागू

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.