Ad Advertisement Ad Advertisement

Book release of Neelam Gorhe – विधान परिषदेत सलग 5 वेळा निवड होणे हा महिला सक्षमीकरणातील महत्त्वाचा टप्पा; राज्यपालांकडून नीलम गोऱ्हेंचा गौरव

नीलम गोऱ्हे यांच्या ‘विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग’ या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन

मुंबई : Book release of Neelam Gorhe – शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत सलग पाच वेळा निवड होणे हा महिला सक्षमीकरणातील महत्त्वाचा टप्पा आहे. सत्ताधारी तसेच विरोधी बाकांवरून आणि उपसभापती म्हणून त्यांनी एकाच सभागृहाचे काम पाहिले, ही उल्लेखनीय बाब असल्याचे कौतुकोद्गार राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी काढले. अन्यायग्रस्त महिला आणि बालकांच्या पाठीशी प्रत्यक्ष उभे राहणे, ही डॉ. गोऱ्हे यांची सार्वजनिक जीवनातील मोलाची कृती असल्याचेही ते म्हणाले.

विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित ‘विधान परिषद कामकाज : माझा सहभाग’ या पुस्तका्च्या चौथ्या खंडाचे प्रकाशन सोमवारी राज्यपालांच्या हस्ते मुंबईतील लोकभवनाच्या जलभूषण सभागृहात झाले. मैत्री पब्लिकेशनतर्फे प्रकाशित या खंडात 2014 ते 2020 या सहा वर्षांत डॉ. गोऱ्हे यांनी विधान परिषदेत मांडलेले प्रश्न, त्यावर शासनाने दिलेली उत्तरे आणि त्यानंतर केलेला पाठपुरावा हा तपशील या पुस्तकात आहे. या प्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, गृह राज्यमंत्री योगेश कदम, विधान परिषदेतील भाजप गटनेते प्रवीण दरेकर, ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी प्रवीण दवणे आणि प्रकाशिका मोहिनी कारंडे उपस्थित होते.

पुस्तकाला सामाजिक संदर्भग्रंथाचे मोल – एकनाथ शिंदे

आपला प्रश्न सभागृहात कुठे मांडला, सरकारने काय उत्तर दिले आणि पुढे प्रत्यक्षात काय झाले, हे नागरिकांना जाणून घ्यायचे असते. डॉ. गोऱ्हे यांच्या पुस्तकात या तिन्ही प्रश्नांची उत्तरे सापडतात, म्हणून या खंडाला सामाजिक संदर्भग्रंथाचे मोल आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पीडित महिलेला भेटून तिचे म्हणणे ऐकणे, पोलीस आणि प्रशासनाशी संपर्क साधणे आणि तिला वैद्यकीय मदत, समुपदेशन तसेच कायदेशीर आधार मिळतो आहे का, हे पाहणे या त्यांच्या कार्यपद्धतीचा शिंदे यांनी विशेष उल्लेख केला. ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यासाठी आणि पीसीपीएनडीटी तसेच एमटीपी कायद्यांसंदर्भातील राज्यस्तरीय कार्यदलाच्या अध्यक्ष म्हणून त्या करत असलेल्या कामाचाही त्यांनी गौरव केला.

नीलम गोऱ्हेंनी अभ्यास आणि शिस्त जपली – राहुल नार्वेकर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी डॉ. गोऱ्हे यांच्यासोबत विधिमंडळात काम करतानाची एक आठवण सांगितली. सभागृहात बोलण्यासाठी त्या उभ्या राहिल्या की, कोणत्या नियमाखाली मुद्दा मांडत आहेत, हे सुरुवातीलाच स्पष्ट करत. उपसभापती म्हणून काम पाहतानाही त्यांनी हाच अभ्यास आणि शिस्त जपली. सभागृहातील गोंधळाकडे माध्यमांचे लक्ष पटकन जाते. त्याच सभागृहात एखाद्या प्रश्नावर सदस्याने केलेली तयारी आणि त्यासाठी घेतलेले परिश्रम मात्र नागरिकांपर्यंत पोहोचतीलच असे नाही. गोऱ्हे यांचा ग्रंथ ही उणीव भरून काढतो, असे नार्वेकरांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, नागरिक अनेकदा आमदारांना त्यांच्या कामाविषयी विचारतात. आमदार सभागृहात नेमके काय काम करतात, हे जनतेला समजावे म्हणून पुस्तक लिहिले. एखाद्या प्रश्नाचे उत्तर त्यांना प्रत्यक्ष कामाच्या नोंदींतून मिळावे, यासाठी हा खंड तयार केला.

महिला आणि बालकांची सुरक्षितता, शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न, आरोग्य, पर्यावरण आणि पुणे परिसरातील स्थानिक प्रश्न यावरील चर्चांसोबतच विधेयके, अर्थसंकल्प आणि पुरवणी मागण्यांवरील कामाचाही त्यात समावेश आहे, असे सांगतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला संधी देत दाखवलेल्या विश्वासाचे स्मरण करून डॉ. गोऱ्हे यांनी विधान परिषदेत बोलण्याची संधी देणारे तत्कालीन सभापती आणि सहकारी सदस्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

Read About : Maharashtra Land Bank Agriculture – 5 वर्षांत जमिनी शेती उत्पादनाखाली आणाव्यात; मंत्री बावनकुळेंचे लँड बँक करणाऱ्यांना आवाहन

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.