Ad Advertisement Ad Advertisement

India vs New Zealand Wellington Test draw-भारताचे स्वप्न भंगले

वेलिंग्टन कसोटी अनिर्णित | न्यूझीलंडच्या मिचेल-फिलिप्सची चिवट खेळी

वेलिंग्टन : India vs New Zealand Wellington Test draw फलंदाजांच्या सामूहिक योगदानाच्या बळावर विक्रमी धावसंख्या उभारणाऱ्या भारताला अखेरीस न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटीत अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले. भारतीय गोलंदाजांनी अंतिम आणि पाचव्या दिवशी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, डॅरिल मिचेल (१८६ चेंडूंत नाबाद ४९ धावा) आणि ग्लेन फिलिप्स (१२६ चेंडूंत नाबाद २६ धावा) यांनी खेळपट्टीवर नांगर टाकला. बेसिन रिझर्व्हच्या निर्जीव खेळपट्टीवर या जोडीने आपल्या बचावात्मक तंत्राचे प्रदर्शन करत ४३ षटकांमध्ये भारतीयांना बळी घेण्यापासून रोखले. पहिल्या डावात ३५२ धावांनी पिछाडीवर असतानाही न्यूझीलंडने कसोटी अनिर्णित राखत भारतीयांच्या आशांवर पाणी फेरले. उभय संघातील अखेरची आणि दुसरी कसोटी २७ नोव्हेंबरपासून क्राईस्टचर्च येथे खेळण्यात येईल.

अंतिम दिवशी मैदानावर दिवसभर जोरदार वारा वाहत होता आणि आकाशात काही प्रमाणात ढग होते, परंतु खेळपट्टीवर अशा कोणत्याही त्रुटी नव्हत्या, ज्यामुळे अत्यंत बचावात्मक दृष्टिकोन स्वीकारणाऱ्या फलंदाजांना कोणतीही अडचण येईल. मर्यादित षटकांच्या प्रकारात फटकेबाजीसाठी ओळखले जाणारे मिचेल आणि फिलिप्स यांनी गरजेच्या वेळी बचावात्मक फलंदाजीचा गुणही दाखवून दिला. मिचेल-फिलिप्स या जोडीने सहाव्या गड्यासाठी २५८ चेंडूंचा सामना करताना ६३ धावांची अभेद्य भागीदारी रचत भारतीय गोलंदाजांना निरुत्तर ठेवले. भारतीय कर्णधार शुभमन गिलने खेळपट्टीवर जम बसलेल्या या जोडीला फोडण्यासाठी गोलंदाजीत वारंवार बदल केले, परंतु त्याचा एकही प्रयोग कामी आला नाही.

यजमान संघाचा बचावात्मक दृष्टिकोन यावरून दिसून येतो की, अंतिम दिवशी त्यांनी ७५ षटकांचा सामना करून केवळ १२० धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने (३४ षटकांत ६४ धावांच्या मोबदल्यात १ बळी) काही वेळा त्यांच्या फलंदाजांना अडचणीत आणले, परंतु इतर भारतीय गोलंदाज त्यांच्यावर फारसा दबाव टाकू शकले नाहीत. मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (२० षटकांत १ बळी/४२ धावा) आणि अंशुल कंबोज (२२ षटकांत १ बळी/४५ धावा) यांनाही प्रभाव दाखवता आला नाही.

न्यूझीलंडने अंतिम दिवसाची सुरुवात २ बाद ११९ धावांवरून केली. पहिल्या सत्रामध्येच त्यांनी आदल्या दिवसाचे नाबाद फलंदाज डेव्हन कॉनवे (१६५ चेंडूंत ६५ धावा) आणि रचिन रवींद्र(१२९ चेंडूंत ३७ धावा) यांना गमावले. कॉनवे-रवींद्र या जोडीने भारतीय वेगवान माऱ्याचा सामना करत तिसऱ्या गड्यासाठी २०२ चेंडूंत ७२ धावा जोडल्या. उपाहारानंतरच्या खेळात टॉम ब्लंडेलच्या (५४ चेंडूंत १५ धावा) स्वरूपात त्यांनी एकमेव फलंदाज गमावला. त्यानंतर मिचेल आणि फिलिप्स यांनी अखेरच्या सत्रामध्ये सावध फलंदाजी करत भारतीयांना बळीसाठी झगडवले. सामन्याचा कोणताही निकाल दिसत नसल्यामुळे अखेरच्या एक तासा अगोदर उभय संघाच्या कर्णधारांनी सहमतीने हस्तांदोलन करत अनिर्णित निकालावर समाधान मानले. यावेळी न्यूझीलंडने ५ बाद २३९ अशी मजल मारली होती.

डब्ल्यूटीच्या अंतिम फेरीची वाटचाल कठीण

अनिर्णित निकालामुळे भारताच्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशांना धक्का बसला, कारण त्यांची गुणांची टक्केवारी ५१.५२ वरून ५० पर्यंत घसरली, मात्र तरीही ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहेत. न्यूझीलंडही ६६.६७ गुणांच्या टक्केवारीसह दुसऱ्यावरून तिसऱ्या स्थानावर घसरला. दक्षिण आफ्रिका ७५ गुणांच्या टक्केवारीसह गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे, तर ऑस्ट्रेलिया ६९.२३ गुणांच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला.

लाळवरील बंदी उठवा-गिल

कर्णधार शुभमन गिलने लाळवरील बंदी उठवण्याची मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडे (आयसीसी) केली आहे. तसेच कूकाबुरा चेंडू लवकरच नरम होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गिल या संदर्भात पुढे म्हणतो,’आपण कोविडच्या काळापासून खूप पुढे आलो आहोत. चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करता येणार नाही, असा एक नियम होता. आता त्याला सात-आठ वर्षे झाली आहेत. मात्र, त्यानंतर अद्यापही लाळेला परवानगी का देत नाहीत हे मला माहीत नाही.’ तो पुढे आणखी म्हणाला, ‘मला वाटते पहिला चेंडू २५-३० षटकांनंतर खूपच नरम झाला. मला वाटतं, त्यांनी (न्यूझीलंडने) सुद्धा तक्रार केली होती.’

Read About : Henry Nicholls Century Against India- न्यूझीलंडची 5 गडी गमावून 243 धावांपर्यंत मजल

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.