Ad Advertisement Ad Advertisement

Maharashtra Land Bank Agriculture – 5 वर्षांत जमिनी शेती उत्पादनाखाली आणाव्यात; मंत्री बावनकुळेंचे लँड बँक करणाऱ्यांना आवाहन

शेतकऱ्यांची जमीन कुळ कायद्यांतर्गत शासनाच्या व्यवस्थापनाखाली जाणार नाही

मुंबई : Maharashtra Land Bank Agriculture – सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी कुळ कायद्यांतर्गत शासनाच्या व्यवस्थापनाखाली जाणार नाहीत. मात्र, शेतकऱ्यांकडून शेतजमिनी खरेदी करून लँड बँक तयार करणाऱ्या आणि त्या जमिनी पडीक ठेवणाऱ्या मोठ्या जमीनधारकांनी पुढील तीन ते पाच वर्षांत त्या जमिनी शेती उत्पादनाखाली आणाव्यात, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

1948च्या कुळ कायद्यातील कलम 65चा संदर्भ देताना आपल्या बोलण्याची गल्लत केली गेली किंवा काही लोकांनी गैरसमज निर्माण केला, असे स्पष्ट करत सर्वसामान्य शेतकऱ्यांची एक इंचही जमिनी सरकार जमा होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. सोमवारी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे संरक्षण करणे आणि त्यांचे हक्क अबाधित ठेवणे ही महसूल विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही सर्वसामान्य शेतकऱ्याने आपल्या जमिनीबाबत संभ्रम बाळगू नये, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या जमिनी अबाधित

बावनकुळे म्हणाले की, राज्याच्या 1948च्या कुळ कायद्यातील कलम 65 नुसार तीन वर्षे जमीन पडीक ठेवल्यास ती शासनाच्या व्यवस्थापनाखाली येण्यासंदर्भातील तरतुदीचा आपण उल्लेख केला होता. मात्र, याचा अर्थ सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार जमा करणार असा अजिबात नाही. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा किंवा विदर्भातील जो मूळ शेतकरी स्वतःची जमीन कसतो, अशा शेतकऱ्यांची कोणतीही जमीन कुळ कायद्यांतर्गत शासनाच्या व्यवस्थापनाखाली जाणार नाही.

जीडीपी वाढविण्याची आवश्यकता

काही मोठ्या व्यक्तींनी शेतकऱ्यांकडून 50, 100, 200 एकर शेतीच्या जमिनी खरेदी करून लँड बँक तयार केली आहे. या जमिनींवर फार्महाऊस उभारण्यात आले आहेत; मात्र प्रत्यक्ष शेती केली जात नाही. मोठ्या प्रमाणावर शेतीच्या जमिनी पडीक ठेवणे राज्याला परवडणारे नाही. राज्याचे आणि देशाचे सकल उत्पन्न (जीडीपी) वाढवायचे असेल, तसेच कृषी उत्पादन वाढवायचे असेल, तर उपलब्ध शेतीच्या जमिनी उत्पादनाखाली आणणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जमिनीवर लागवड सुरू करा

ज्यांनी मोठ्या प्रमाणावर शेतीच्या जमिनी खरेदी केल्या आहेत, त्यांनी आतापर्यंत शेती केली नसेल तरी चालेल; परंतु पुढील तीन ते पाच वर्षांत या जमिनींवर काही ना काही लागवड सुरू करावी, अशी आपली सूचना आणि विनंती आहे. फार्महाऊस बांधले असेल, जमीन खरेदी केली असेल तर त्याला हरकत नाही; मात्र शेतीच्या जमिनी पडीक ठेवू नका, असे आवाहन आपण केले असल्याचे त्यांनी सांगितले.

या जमिनींवर चारा लागवड, बांबू लागवड किंवा अन्य कृषी पिकांची लागवड करता येऊ शकते. चांगला पाऊस झाल्यास अशा जमिनींचा शेतीसाठी उपयोग करून कृषी उत्पादन वाढविता येईल. त्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read About : Employability-oriented courses – अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम आता ‘संत रोहिदास’ नावाने ओळखला जाणार; मंत्री लोढांची माहिती

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.