२४ नोव्हेंबरला गेटी गॅलेक्सीमध्ये साधणार संवाद, २७ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत होणार प्रदर्शित
मुंबई : Emraan Hashmi Gunmaaster G9 – अभिनेता इमरान हाश्मी आपल्या आगामी ‘गनमास्टर जी ९’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खास तयारी करत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो मुंबईतील चाहत्यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहे. वांद्रे येथील प्रसिद्ध गेटी गॅलेक्सी चित्रपटगृहात मंगळवारी, २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता तो चाहत्यांशी संवाद साधणार आहे. यासोबतच चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगची तारीखही त्याने जाहीर केली आहे. इमरान हाश्मीने सोमवारी, २३ नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमधून त्याने चाहत्यांना गेटी गॅलेक्सी येथे येण्याचे निमंत्रण दिले. या भेटीत चाहत्यांना इमरानला प्रत्यक्ष भेटण्याची आणि त्याच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
ॲडव्हान्स बुकिंग २४ नोव्हेंबरपासून
‘गनमास्टर जी९’च्या ॲडव्हान्स बुकिंगला २४ नोव्हेंबरपासून देशभरात सुरुवात होणार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांना आता तिकिटे आधीच बुक करता येणार आहेत. इमरानच्या भेटीची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर उत्साह व्यक्त केला आहे. अनेक जण गेटी गॅलेक्सी येथे जाण्याची तयारी करत आहेत.
२० वर्षांनंतर पुन्हा एकत्र आली टीम
‘गनमास्टर जी९’चे दिग्दर्शन आदित्य दत्त यांनी केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने इमरान हाश्मी, आदित्य दत्त आणि संगीतकार हिमेश रेशमिया पुन्हा एकत्र आले आहेत. यापूर्वी २००५ मध्ये ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटासाठी त्यांनी एकत्र काम केले होते. आता दोन दशकांहून अधिक काळानंतर ही टीम ॲक्शनपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात जेनेलिया देशमुख आणि अपारशक्ती खुराना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दीपक मुकुट आणि हुनर मुकुट यांनी सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे संगीत हिमेश रेशमिया यांनी दिले आहे.
२७ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत दाखल होणार
‘गनमास्टर जी’ हा ॲक्शनपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी इमरान हाश्मीची चाहत्यांशी होणारी भेट आणि ॲडव्हान्स बुकिंगची सुरुवात यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनला वेग आला आहे. आता प्रेक्षकांना या चित्रपटातून इमरानचा कोणता नवा ॲक्शन अवतार पाहायला मिळतो, याची उत्सुकता आहे.
Read About: Siddhant Chaturvedi Kala Series – कोळसा आणि गुन्हेगारीच्या साम्राज्यात सत्तेचा थरार
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.