बनावट दस्त बनवून देणाऱ्या वर्ध्याच्या साथीदारासह दोघे जेरबंद : इसाऱ्याच्या १.४० कोटींपैकी आगळेच्या खात्यात ६० लाखांचे कमिशन; १० कोटींचा डाव फसला
छत्रपती संभाजीनगर : Sagar Agale Land Scam सहदुय्यम निबंधक कार्यालयातील ४७ वर्षांपूर्वीच्या अभिलेखांत फेरफार करून ३० कोटींहून अधिक किमतीच्या जमिनी लाटणाऱ्या टोळीचे गुन्हेगारी कनेक्शन उघड झाले आहे. सोशल मीडियावर ‘गरीब फाउंडेशन’च्या नावाने हवा करत तरुणांचा गराडा अन् मोठ्या वाहनांच्या ताफ्यात मिरवणाऱ्या कुख्यात सागर राम आगळे (३५, रा. केंब्रिज, सुंदरवाडी) याच्यासह प्रतीक कोहळे (३१, रा. वर्धा) या दोघांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. सागर आगळेने या कथित व्यवहारापोटी सुमारे ६० लाख रुपये कमिशन घेतले असून फेब्रुवारी ते मार्चपासून तो पैसे घेत असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या गुन्ह्यात आधी अटक बाप-लेक मोहन राठोड (७०) आणि नितीन राठोड (३६, रा. जाधववाडी) यांच्यासह चारही आरोपींना न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सोमवारी (दि. २३) दिली. आरोपी नितीन राठोड आणि सागर आगळे हे दोघे मित्र आहेत. खंड बुकात १९७९ चे बनावट दस्त (क्र. ६०२७ ते ६०३०) घुसवल्यानंतर नितीनने जमिनी तीन-चार जणांना विकण्यासाठी आगळेला सोबत घेतले.
दोघेही निबंधक कार्यालयात अनेकदा एकत्र गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. नितीनने शिंदे नामक व्यक्तीकडून १० एकर जमिनीच्या इसारपावतीपोटी १ कोटी ४० लाख रुपये उकळले. त्यातून तब्बल ६० लाख रुपये कमिशन आगळेच्या बँक खात्यात वळवल्याचे तपासात स्पष्ट झाले. फेब्रुवारीपासून हे व्यवहार सुरू होते. जमिनीचा फेर लागताच पुढे १० कोटी रुपये उकळण्याचा त्यांचा डाव होता; मात्र गुन्हा दाखल झाल्याने मनसुबे उधळले गेले.
७ लाखांत बनावट दस्त; ‘घरच्या भेद्यां’चा शोध
मूळ नोंदींशी शाई व हस्ताक्षर न जुळणारे बनावट शिक्के-स्वाक्षऱ्यांचे दस्त बनवून देण्यासाठी प्रतीक कोहळेने ७ लाख कमिशन घेतले. त्याने हे दस्त कोणाकडून तयार करून घेतले आणि निबंधक कार्यालयातून टोळीला कोणी मदत केली, याचा तपास सुरू आहे.
खून, लूटमारीचे गुन्हे; अनेक प्रकरणात चौकशी?
आगळे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर खून, लूटमार व हाणामारीचे ७ ते ८ गंभीर गुन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी सिडकोत भररस्त्यात झालेल्या तरुणाच्या हत्याप्रकरणातही तो चौकशीच्या फेऱ्यात आला होता. या टोळीने आणखी काही जमिनी बळकावल्या का, याचा शोध सुरू आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सिटी चौक ठाण्यातील हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला असून, निरीक्षक कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक गंभीरराव तपास करत आहेत
अधिकाऱ्याला धमकी देणारे गुंड कोण होते?
२९ सप्टेंबर रोजी आरोपी मोहन राठोडने ६ ते ८ गुंड घेऊन प्रभारी सहदुय्यम निबंधक कृष्णा खताळ यांना कार्यालयात जाऊन तुम्ही संभाजीनगरमध्ये एकटे राहता, बघून घेऊ अशी धमकी दिली होती. त्या गुंडांमध्ये सागर आगळे किंवा त्याचीच टोळी होती का, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.
बड्या बिल्डर्सची नावे गुलदस्त्यात का?
पूर्वीच्या तपासात दोन बड्या बांधकाम व्यावसायिकांसोबत साडेचार कोटींचा ‘अॅग्रीमेंट टू सेल’ झाल्याची माहिती समोर आली होती. आता शिंदे यांचे नाव आले; पण उरलेले बडे बिल्डर आणि व्यवहारातील इतर मध्यस्थ कोण, याचाही गुन्हे शाखा तपास करीत आहे.
निबंधक कार्यालयातील ‘इनसाइडर’ कोण?
डिसेंबर १९७९ च्या मूळ खंड बुकात, सूची क्र. २ आणि अंगठे पुस्तकाशिवाय थेट चार बनावट दस्त घुसवणे कार्यालयातील कर्मचारी किंवा अधिकाऱ्याच्या मदतीशिवाय अशक्य आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये नितीन व सागर कार्यालयात नेमके कोणाच्या टेबलवर जात होते, यातून मोठे रॅकेट उघड होऊ शकते. त्यामुळे निबंधक कार्यालय पुन्हा पोलिसांच्या रडारवर आले आहे.
हे आहेत चार बनावट दस्त
- दस्त ४ (मिटमिटा) : सादतुन्नीसा बेगम मा. फारुकी यांच्या नावावरून वसंत नरसिंग चव्हाण यांच्या नावे गट क्र. १५४ मधील २.८५ हेक्टर जमीन दाखवण्यात आली.
- दस्त १ (पोखरी) : बळवंत कुलकर्णी यांच्या नावावरून मोहन दगडू राठोड यांच्या नावे गट क्र. ६६ मधील ५.९९ हेक्टर जमीन दाखवण्यात आली.
- दस्त २ (दावरवाडी) : माधव किसन राऊत यांच्या नावावरून किसन हाबु पवार यांच्या नावे गट क्र. ५१५ मधील १.२० हेक्टर जमीन दाखविली.
- दस्त ३ (गेवराई) : छगन उदाराम राठोड यांच्या नावावरून गोपीनाथ हरिदास चव्हाण यांच्या नावे गट क्र. ३४ मधील २.८ हेक्टर जमीन दाखविली आहे.
Read About: Mohammad Mazeen Fraud Case – महिलांचे शोषण करणाऱ्या माझीनला दुबईत पाकिस्तानीचा गंडा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.