Ad Advertisement Ad Advertisement

Samruddhi Expressway Bus Accident – चालकाला डुलकी; समृद्धीवर ट्रॅव्हल्स उलटून दोन ठार, 30 जमखी

पुलाला धडकल्याने खासगी बस चक्काचूर : प्रवाशांचा मध्यरात्री मदतीसाठी टाहो

छत्रपती संभाजीनगर : Samruddhi Expressway Bus Accident समृद्धी महामार्गावर चालकाला अचानक डुलकी लागल्याने नागपूरहून मुंबईकडे जाणारी ट्रॅव्हल्स पुलाला धडकली. या भीषण अपघातानंतर ट्रॅव्हल्स उलटून चक्काचूर झाली. यात दोन ठार तर ३० प्रवासी जखमी झाले. नायगाव शिवारात (ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) चॅनेल क्र. ४२६ जवळ सोमवारी (दि. २३) मध्यरात्री १.१० वाजता हा अपघात झाला. यावेळी सर्व प्रवासी झोपेत असल्याने प्रचंड भेदरले. मदतीसाठी त्यांनी एकच टाहो फोडला. १५ ते २० मिनिटांत पोलिसांची मदत पोहोचली. त्यांनी सर्व प्रवाशांना बाहेर काढून घाटीत दाखल केले.

रघुनंदन दत्ता सांगडे (वय २७, रा. पश्चिम मुंबई) आणि विनोद उत्तम जाधव (रा. घोसगाव, ता. आर्णी, जि. यवतमाळ), अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात रघुनंदनची आई तर विनोदची पत्नी आणि दोन मुलीही जखमी झाल्या आहेत. चाणक्य ट्रॅव्हल्सची (एमपी-४१, झेडएच-९९५५) बस ३८ प्रवाशांना घेऊन नागपूर-वाशिम मार्गे मुंबईकडे निघाली होती. सावंगी-नायगाव शिवारातील चॅनेल क्रमांक ४२६ जवळ चालक प्रवीण शिवाजी राजेकर (रा. मुंगळा, ता. मालेगाव, जि. वाशिम) याला झोपेची डुलकी लागली.

त्यामुळे बसवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि ती पुलाच्या कठड्यावर जोरात आदळून महामार्गावरच पलटी झाली. पुलाशेजारीच खोल खाई असल्याने कठडा तोडून बस खाली कोसळली असती, तर मृतांचा आकडा मोठा असता; मात्र बस पुलावरच अडकल्याने इतर प्रवाशांचे प्राण वाचले. मात्र, या अपघातात ट्रॅव्हल्स चक्काचूर झाली आहे. समोरील चाके निखळून पडली. सर्व काचा फुटल्या. ट्रॅव्हल्सची अवस्था पाहिल्यावर भीषण अपघाताची प्रचिती येते.

केबिनमध्ये कोंबले १० प्रवासी

ट्रॅव्हल्समध्ये ५५ प्रवासी बसतात. मात्र, चालक आणि क्लिनर हे रस्त्यात जास्तीचे प्रवासी घेऊन त्यांना केबिनमध्ये बसवतात. या चालकाने तब्बल १० प्रवासी के बिनमध्ये कोंबले होते. त्यांच्याकडून यवतमाळ, अर्णी, मांगूळ आदी ठिकाणाहून बसवून कल्याण, भिवंडी, ठाणे, मुंबई येथे सोडण्यासाठी ७०० ते ८०० रुपये तिकिट घेतल्याचे प्रवाशांनी सांगितले. केबिनमध्ये इतके जास्त प्रवासी कोंबणे हेदेखील अपघाताचे एक कारण असू शकते.

चालक तीन तासांपासून सलग चालवित होता बस

नागपूरहून निघालेली बस अंदाजे ५ वाजेच्या सुमारास यवतमाळला होती. तेथील प्रवासी घेऊन रात्री १० ते सव्वादहा वाजता मालेगाव (जि. वाशिम) तालुक्यातील एका ढाब्यावर जेवणासाठी बस थांबविली होती. तेथे २० मिनिटे थांबल्यानंतर प्रवीण राजेकर हा सलग तीन तासांपासून बस चालवित होता. मध्यरात्री १.१० वाजेच्या सुमारास त्याला डुलकी लागताच हा अपघात झाला, असे प्रवाशांनी सांगितले.

कुटुंबाचा पोषणकर्ता गेला, नातेवाईकांचा घाटीत टाहो

रघुनंदन सांगडे हा त्याची आई छाया आणि भाचा आदित्य सावद यांच्यासह प्रवासी करीत होता. ते मांगूळ येथून बसमध्ये बसले होते. छाया आणि त्यांचा नातू आदित्य हे मागे सीट धरून बसले तर रघुनंदन हा केबिनमध्ये होता. या अपघातात रघुनंदनचा मृत्यू झाला. चार वर्षांपूर्वी त्याचा भाऊ कृष्णाचे निधन झालेले आहे. दोन्ही मुले गेल्याने वृद्धापकाळात छाया यांच्यावर मोठा आघात झाला. कुटुंबाचा पोषणकर्ताच गेल्याने नातेवाईकांनी घाटीत एकच टोहो फोडला. या अपघातामुळे अख्खे कुटुंब उघड्यावर पडले आहे.

महामार्ग पोलीस अन् ग्रामीण पोलिसांची तातडीच मदत

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसोबतच उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे, फुलंब्री पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक डॉ. सोनाली पाईकराव, उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, राम बारहाते, अंमलदार लालचंद नागलोत, अंकुश बागल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. या प्रकरणी चालक प्रवीण राजेकर याच्याविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

सर्व जखमींवर घाटीत उपचार

अर्जुन पंडित खडसे (खडी, ता. पुसद), करण खडसे (पुसद, जि. यवतमाळ), फारुख मोहम्मद अजीज (वसंतनगर, पुसद), देवानंद नथ्थुसिंग राठोड (माळोणी, ता. आर्णी), शिवानी ऊर्फ शिवनेरी अंकुश राठोड व नंदिनी राठोड (आर्णी, जि. यवतमाळ), गयबाई मासोळकर (पोफाळी, ता. उमरखेड), केशव दाभाडे, लीला दाभाडे व कुणाल दाभाडे (अंजूर, भिवंडी), रेखा अतुल लोने, खुशी लोने, सुरक्षिता लोने व ओम लोने (सर्व रा. वसई, जि. पालघर), रमेश दत्तात्रय ढोबळे, निलेश ढोबळे, उद्धव बोडकर व शरद पाईकराव (सर्व रा. ठाणे), कृष्णा बोधनकर (मुलुंड, मुंबई), प्रसिद्ध वाकुळे (मुंबई), अरुणा बोधलकर (कल्याण), वंदना ताकले (छत्रपती संभाजीनगर), वैभव होळकर (दिग्रस), भूरन विनायक व वंदना राठोड (यवतमाळ), सुमित व विशाल सिरसाठ (वाशिम) आणि अनुराधा परदेशी, आरती बोधनकर, दिव्या जाधव, अजय वाघू भामुळकर (पातोडा, जि. हिंगोली), शुभम सुरेश वंजारी (कवडापूर तांडा, ता. पुसद), केशव मुकुंद दाभाडे (अंजूर, भिवंडी), अन्नपूर्णा पंडित खडसे (हुंडी, ता. पुसद), दत्ता सुभाष जाधव (सावंगी, ता. पुसद), छाया दत्ता सांगडे (पश्चिम मुंबई), वंदना विनोद जाधव व जयकुमार संजय खंडारे (दोघे रा. पुसद).

Read About: Mohammad Mazeen Fraud Case – महिलांचे शोषण करणाऱ्या माझीनला दुबईत पाकिस्तानीचा गंडाआरोपीला दुबईतून भारतात आणले

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.