Ad Advertisement Ad Advertisement

AI Political Control : सत्ताधीशांच्या ताब्यात एआय

AI Political Control : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकीत जबरदस्त हार स्वीकारावी लागली आहे, तरी त्यांची जगाचे नेतृत्व करण्याची आणि पर्यायाने शांततेचा नोबेल पुरस्कार पटकावण्याची हौस काही संपली नाही. याच प्रयत्नात ते आपण जगाचे नेतृत्व करण्याचा आव आणत आहेत.

नुकतीच त्यांनी एपेक परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेचे पारंपरिक प्रतिस्पर्धी समजले जाणारे चीन आणि रशिया या देशांच्या प्रमुखांची भेट घेतली. ही भेट चीनमध्ये झाली. चीनचे नेते शी जिनपिंग आणि रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी एकत्र येणे ही जागतिक स्तरावर महत्त्वाची घडामोड होती. अर्थात, तीन स्वकेंद्रित स्वार्थी नेतृत्वे एकत्र आल्यावर जगाच्या भलाईसाठी किंवा सध्या सुरू असलेली युद्धे बंद होतील अशी अपेक्षा करणे चुकीचेच होते आणि तसेच झाले.

हे नेते भेटले, पण त्यातून काहीही दीर्घकालीन निर्णय घेतले गेले नाहीत. खरं तर हे तीन देश आज जगावर राज्य करत आहेत. वस्तूंचे उत्पादन, आर्थिक सत्ता आणि तांत्रिक विकास या सगळ्या आघाडींवर या देशांनी जगाला वेठीस धरले आहे. वारंवार माघार घ्यावी लागली तरी ट्रम्प महाशयांना आपल्या तऱ्हेवाईक स्वभावानुसार ‘आली लहर आणि केला कहर’ असे निर्णय जाहीर करण्याची सवय आहे. आपल्या स्वार्थी राजकारणापेक्षा या तिघांनी जर एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काही महत्त्वाचे निर्णय घेतले असते, बेलगाम कंपन्यांना वेसण घातली असती तर त्याचा फायदा जगाला मिळाला असता.

इराण युद्धात रशिया इराणला करत असलेली मदत आणि युक्रेनबरोबरचे रशियाचे उघडउघड युद्ध या दोन्ही गोष्टींत रशिया किती युद्धखोर आहे याचा प्रत्यय आपल्याला रोज येत आहे. या शस्त्रस्पर्धेत रशिया एआयचा वापर जोरदार पद्धतीने करत आहे. चीन अतिशय आतल्या गाठीचा आहे. एक चर्चा अशी आहे की, एआयच्या विकासात चीन आता अमेरिकेच्याही पुढे गेला आहे. दोन हुकूमशाह्या आणि एक लोकशाही यांच्या एआय स्पर्धेत जगाला अमेरिकेकडून खूप अपेक्षा आहेत. अधिकृतरित्या जरी ट्रम्प लोकशाही देशाचा प्रमुख असले तरी त्यांची वृत्ती एखाद्या हुकूमशहासारखीच आहे आणि याच लालसेतून त्यांनी एआय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व प्रमुख कंपन्यांशी संधान बांधले आहे. त्यांचे हे संबंध काही लपून राहिले नाहीत आणि याचा फायदा एआय क्षेत्रातले बादशाह उचलत आहेत.

एनव्हिडिया कंपनीतले हेरगिरी प्रकरणच घ्या. एआयच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या ॲडव्हान्सड् चिप्सचे उत्पादन एनव्हिडिया कंपनी करते. या चिप्स चीनला उपलब्ध केल्या जाऊ नयेत असे स्पष्ट निर्देश एनव्हिडियाला असताना ॲलिस हुआँग या बाईंच्या मेगास्पीड नावाच्या कंपनीला एनव्हिडियाने उपलब्ध केल्या. काही आठवड्यांपूर्वी न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राने मोठा भांडाफोड केला. ॲलिस हुआँग या बाईंचे एनव्हिडियाचे प्रमुख जेन्सन हुआँग यांच्याशी अनैतिक संबंध होते. त्यातून या चिप्स एनव्हिडियाने मेगास्पीडला दिल्या. प्रत्यक्षात या बाई चीनसाठी हेरगिरी करत होत्या आणि हे अफेअर म्हणजे चीनने लावलेला एक हनिट्रॅप किंवा सापळा होता. याची जाणीव अमेरिकन गुप्तहेर खात्याला झाली आणि त्यांनी याची चौकशी सुरू केली.

एवढे सगळे झाल्यावर जेन्सन हुआँग यांना एनव्हिडियाचे प्रमुखपद सोडावे लागले. जगातल्या सर्वांत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या कंपनीचे शेअर्स रातोरात कोसळले. हुआँगना पुन्हा कंपनीत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या. या सगळ्यांत ट्रम्प महाशयांनी अपेक्षेप्रमाणे कोणतेही गंभीर धोरण स्वीकारले नाही. उलट, ‘हा भला इसम आहे आणि अशा गोष्टी होत असतात’ अशी त्याची भलावण केली. इतकेच नाही तर या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी असताना पुतिन आणि जिनपिंग यांची गळाभेट घेतली.

आपण राष्ट्रप्रमुख झाल्यानंतर आपल्या देशाप्रती आपल्या जबाबदाऱ्या आहेत, आपल्या देशाच्या सार्वंगीण भल्यासाठी आपण काम केले पाहिजे, देशाच्या शत्रूंशी मुकाबला केला पाहिजे, या कोणत्याही गोष्टी न मानणारा हा उद्योगपती आहे. त्याला कोणतेही नैतिक अधिष्ठान नाही. येत्या निवडणुकांनंतर वेगळा राष्ट्राध्यक्ष आल्यावर कदाचित अमेरिका सुटकेचा निश्वास सोडेल, पण तोपर्यंत अमेरिकेवर अवलंबून असलेले आपल्यासारखे देशही या घडामोडींकडे काळजीपूर्वक बघत आहेत.

मानवी राजकारण आणि स्वार्थी नेतृत्वाच्या पलीकडे विज्ञानाचा विकास सुरूच आहे. ॲंथ्रोपिक कंपनीचा क्लॉड हा चॅटबॉट जगभरात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. या क्लॉडचे एक वेगळे रूप आहे, जे कंपनीने सामान्यांना उपलब्ध करून दिले नाही. मात्र, याचा वापर कंपनीत काम करणारे संशोधक आणि शास्त्रज्ञ करू शकतात. या शास्त्रज्ञांनी गेल्या काही महिन्यांत कित्येक दशके ज्या गणितीय प्रश्नांवर उपाय शोधता आला नाही, अशा अनेक प्रश्नांचा छडा लावला आहे.

गणितात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मूलसंख्यांच्या बाबतीत १७० वर्षांपूर्वी बर्नार्ड रीमन यांनी प्रस्तुत केलेल्या एका अनुत्तरित कोड्याला रीमन हायपोथिसीस म्हटले जाते. आजपर्यंत याचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नांत गणिती जग होते. लिवांट अल्पोझे हा ॲंथ्रोपिकमध्ये काम करणारा एक गणितज्ज्ञ आहे. त्याने एआयच्या मदतीने आपल्याला या प्रश्नाचा ‘पुरावा’ किंवा उपाय सापडला आहे असा दावा नुकताच केला. त्याने शोधलेला उपाय खरा आहे की नाही याचा शोध त्या क्षेत्रातले जाणकार लवकरच घेतील, पण असे प्रयोग गेल्या काही काळात वाढले आहेत.

अनेक दशके ज्या प्रश्नांची उत्तरे मानवाला सापडली नाहीत त्याची उत्तरे आता मिळत आहेत. ज्या वैद्यकीय समस्यांनी माणसाला वेढले आहे, त्या समस्यांवर उत्तरे लवकरच मिळतील अशी आशा एआयमुळे निर्माण झाली आहे. आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास हवा आहे तो माणसाचे कुतूहल आणि माणसाला उपयोगी पडणाऱ्या गोष्टींच्या विकासासाठी. शस्त्रास्त्र स्पर्धेसाठी उत्सुक असलेल्या हुकूमशहांच्या हातचे खेळणे कृत्रिम बुद्धिमत्ता झाली तर ती एक शोकांतिका ठरेल.

भक्ती चपळगावकर
bhalwankarb@gmail.com

Read About : Gravitational Waves : अंतराळाची अदृश्य कंपने: गुरुत्वाकर्षण तरंग
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.