Elon Musk Cybertruck Failure : सायबर ट्रक या वाहनाचं उत्पादन एलॉन मस्क यांनी बंद केलं आहे, त्याची गोष्ट.
सायबर ट्रक म्हणजे सामान घेऊन जाता येईल अशी कार. पिकअप म्हणतात ना तसं वाहन. टेक्सासमध्ये ऑस्टिन या गावात सायबर ट्रकचा कारखाना २०१९ साली एलॉन मस्क यांनी सुरू केला. ते दर वर्षी २.५ लाख वाहनांचं उत्पादन करणार होते. ८० हजार डॉलर्सच्या आसपास त्याची किंमत असणार होती.
२०२४ साली ३९ हजार सायबर ट्रक विकले गेले. २०२५ साली २० हजार आणि २०२६ साली १२ हजार ट्रक विकले गेले. उत्पादन सुरू झाल्यापासूनचा विक्रीचा नेमका आकडा आहे ७०,७८८. तीन वर्षात ७.५ लाख वाहनं बाजारात खपावी अशी अपेक्षा होती. दोनएक अब्ज डॉलर्सचा तोटा झाला. मस्क यांची कंपनी नेमके आकडे देत नाही. किती गुंतवले, नेमके किती मिळाले, गुंतवणूक कशाकशावर झाली, खर्च कशाकशावर झाला याचे आकडे मस्क सांगत नाहीत. बाजारात उपलब्ध असणाऱ्या आकड्यांवरून हिशोब लावायचा. बराच तोटा झाला. हा तोटा ज्यांनी मोठ्या आशेनं या कंपनीत पैसे गुंतवले होते त्यांचाही झाला. अनेकांच्या पेन्शनची रक्कमही नफा मिळेल या आशेनं या कंपन्यांत गुंतवलेली होती.
सायबर ट्रक ही सांस्कृतिक क्रांती आहे असं मस्क म्हणाले होते. बाजारात मर्सिडीझ, बीएमडब्लू, बीवायडी, पोर्श इत्यादी धनिकांनी वापराव्या अशा कार होत्या. त्याच किमतीत एक विक्षिप्त कार आपल्याला विकायची आहे असं मस्क म्हणाले. धनिकांच्या कल्पनेला धक्का देण्यासाठी या कारचं डिझाईन तयार करण्यात आलं होतं. कारला तीव्र कंगोरे होते. सायफाय चित्रपटात परग्रहावरून पृथ्वीवरच्या लोकांचा नाश करायला येणाऱ्या वाहनांच्या रुपाशी सायबर ट्रकचं रूप मिळतं जुळतं होतं. कारचा पत्रा पोलादी होता आणि पोलादीच दिसावा असं त्याचं रुप होतं, सारं काही कुरूप.
अमेरिकेत मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या असतात. अमेरिकन लोक त्यांना डंपस्टर म्हणतात. सायबर ट्रक त्या कचरा कुंडीसारखा होता.
लॉस एंजेलिसमध्ये कारचं उद्घाटन झालं. प्रकाश झोत, हिंदी फिल्ममध्ये रोमँटिक दृश्यात हिरो-हिरोइनच्या सभोवताली असतं तसं धुकं स्टेजवर होतं. कार स्टेजवर आल्यावर कारच्या काचेवर पोलादी गोळे आदळण्यात आले. कार बुलेट प्रुफ आहे असं त्यांना दाखवायचं होतं. काचा फुटल्या. दुसरी कार आली, तिच्यावर गोळे फेकले, काचा फुटल्या. मस्क डगमगले नाहीत.
म्हणाले, ‘अजून सुधारणेला वाव आहे.’ आपल्याला भविष्यात रणगाडा तयार करायचा आहे, त्याची तयारी आपण करत आहोत असं मस्क म्हणाले. प्रेक्षक चमकले, पण बोलणार कोण?
आपण जगावेगळे धनिक आहोत अशी हौस असणाऱ्या लोकांनी सायबर ट्रक खरेदी केला. एक माणूस या शक्तिवान कारची ताकद दाखवायची म्हणून पत्रकारांना बोलावून घेऊन समुद्राकाठच्या वाळूत गेला. गाडी अडकली. ॲक्सिलरेटरवर पाय दाबला, गाडी हलेना, बंद पडली.
टोचनवाली क्रेन आणून कार बाहेर काढावी लागली. ॲक्सिलरेटरच्या या दोषामुळं अपघात होऊ शकतात. कार पुढल्या कारवर आदळू शकते. एका कारला अशा खटाटोपात आग लागली. कंपनीनं चार हजार ट्रक ग्राहकांकडून परत मागवले, दोष दुरुस्त करण्यासाठी. कार पार्क करणं फार कष्टाचं असे. सायबर ट्रक पार करताना घडलेल्या कॉमेडी फिल्मसारख्या गोष्टींची रील्स लोकांनी सोशल मीडियावर टाकली. मस्क रागावले. उत्पादन तयार होताना चुका राहून जातात, विरोधक भांडवल करत आहेत असा आरोप मस्क यांनी केला. कार खपवण्यासाठी मस्कनी डोनाल्ड ट्रम्प यांना हाताशी धरलं. एक मोठी सभा भरवली, लोकं गोळा केले, त्यात ट्रम्पना बोलावलं. ट्रम्पचं स्वागत करत असताना मस्कनी एक हात उंचावला. तो हिटलरच्या नाझी सॅल्यूटसारखा होता. जर्मनीतले लोक वैतागले. सायबर ट्रक खरेदी करू नका अशी मोहीम जर्मनीत लोकांनी चालवली. ट्रम्प जर्मनीवरच वैतागले.
सायबर ट्रकचं डिझाईन कुरूप होतं. सायबर ट्रक आणि टेस्ला कार, दोन्ही विकण्यासाठी मस्कनी केलेली मोहीमही कुरूप होती. त्यांनी ट्रम्पना हाताशी धरलं. ट्रम्पच्या पार्टीचे उमेदवार निवडण्यासाठी अब्ज अब्ज डॉलर्स खर्च केले. लोकांना हे पसंत नव्हतं. लोकांनी कारच्या शोरूमसमोर निदर्शनं केली. सरकारी खर्च कपात करणारं एक अजब खातं ट्रम्पनी निर्माण केलं, त्याच्या प्रमुखपदी एलॉन मस्कना नेमलं. खर्चाची कपात म्हणजे करवत चालवणं अशी गावंढळ कल्पना करून मस्कनी मंचावर करवत चालवून दाखवली. हिंदीमध्ये फूहड असा शब्द आहे, त्यातला प्रकार.
एके दिवशी ट्रम्पनी एक लाल रंगाची टेस्ला कार खरेदी केली. व्हाईट हाऊससमोर उभी केली. ‘एक ग्रेट कार मी माझ्या खिशातल्या पैशानं विकत घेतलीय, व्हाईट हाऊसमध्ये मी ती ठेवणार आहे. व्हाईट हाऊसमधले कर्मचारी ती वापरणार आहेत’ असं ट्रम्पनी कॅमेऱ्यासमोर जगाला सांगितलं. मस्कचे हात गगनाला टेकले. ट्रम्पना आपणच मोठं केलंय असं म्हणू लागले, ट्रम्पच्या धोरणांवर टीका करू लागले. परिणाम? एके दिवशी ती लाल कार व्हाईट हाऊसमधून नाहीशी झाली. कुठं गेली, तिचं काय झालं? पत्ता नाही. मुळात त्या कारचे पैसे ट्रम्प यांच्या खात्यातून गेले होते की नाही हेही कळत नाही. ट्रम्पना प्रश्न विचारायचे नसतात.
टेस्लाचा खप कोसळला. सायबर ट्रक बंद पडला. अब्जांचा तोटा. ट्रिलियनचा खेळ करणाऱ्यांना अब्ज म्हणजे काहीच नाही. मस्कचं काय जातंय? त्यांची प्रतिमा आहे, त्यांच्याकडं पैसे आहेत. ते मार्केटचा खेळ करू शकतात. ते नवी कंपनी काढतील, नवा प्रॉडक्ट काढतील. लोक येड्यासारखे त्यातही पैसे गुंतवतील.
मोठी माणसं. त्यांचं काय बॉ.
निळू दामले
damlenilkanth@gmail.com
Read About : NVIDIA CEO Succession : एआय क्रांतीला ओहोटी की स्पर्धक कंपन्यांना ‘अच्छे दिन’?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.