Ad Advertisement Ad Advertisement

Latur Police Station Death Case : लातूरमध्ये पोलीस ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रकरणाचा तपास CID कडे

लातूरच्या किनगाव पोलीस ठाण्यात 21 वर्षीय अमित चव्हाणचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी आत्महत्या म्हटलं, तर नातेवाईकांनी व्यक्त केला घातपाताचा संशय.

Latur Police Station Death Case : लातूरमध्ये एका 21 वर्षीय तरुणाचा चक्क पोलीस ठाण्यातच मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे! एका प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या तरुणाचा पोलीस ठाण्यात असतानाच मृत्यू झाला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे या घटनेने आता वेगळंच वळण घेतलं असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास CID कडे सोपवण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात असलेल्या किनगाव पोलीस ठाण्यात ही धक्कादायक घटना घडली. अमित रमेश चव्हाण असं मृत तरुणाचं नाव असून, तो अहमदपूर तालुक्यातील मरशिवणी गावचा रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अमितला ताब्यात घेतलं होतं.

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचं पथक अहिल्यानगर येथे गेलं होतं. तिथून अमितला ताब्यात घेऊन पोलीस पथक किनगाव पोलीस ठाण्यात आलं. मात्र, पोलीस ठाण्यात आणल्यानंतर काही वेळातच पहाटेच्या सुमारास अमितचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. प्राथमिक माहितीनुसार, पोलीस ठाण्यातील एका खोलीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलीस ठाण्यात तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचे गंभीर आरोप

अमितच्या मृत्यूची बातमी त्याच्या कुटुंबीयांना समजताच नातेवाईकांनी किनगाव पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. मात्र, अमितने आत्महत्या केली नसून त्याच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

विशेष म्हणजे, पोलीस ठाण्यासारख्या सुरक्षित ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाचा मृत्यू झालाच कसा, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अमितच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची होती? तो ज्या खोलीत होता, तिथे पोलिसांची देखरेख होती का? ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी त्यावेळी कुठे होते? असे अनेक प्रश्न नातेवाईकांकडून उपस्थित केले जात आहेत.

या घटनेनंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत संताप व्यक्त केला. अमितच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी आणि या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मृत्यू प्रकरणाचा तपास CID कडे

दरम्यान, या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन लातूरचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्यासाठी अमितच्या मृतदेहाचं लातूरमध्ये इन-कॅमेरा पोस्टमॉर्टेम करण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे मृत्यूशी संबंधित महत्त्वाचे वैद्यकीय पुरावे समोर येण्यास मदत होणार आहे.

विशेष म्हणजे, नातेवाईकांनी व्यक्त केलेला संशय आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेता या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता CID अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं, अमितचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला आणि या घटनेला कोण जबाबदार आहे, याचा तपास CID कडून केला जाणार आहे.

अनेक प्रश्न अनुत्तरित; CID तपासाकडे लक्ष

एकीकडे पोलिसांकडून आत्महत्येची प्राथमिक माहिती दिली जात असताना दुसरीकडे नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे आता पोस्टमॉर्टेम अहवाल आणि CID तपासातून या प्रकरणातील सत्य समोर येण्याची अपेक्षा आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या व्यक्तीच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाची असते. त्यामुळे पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं महत्त्वाचं आहे. आता CID तपासात नेमकं काय समोर येतं आणि अमितच्या मृत्यूचं खरं कारण काय होतं, याकडे संपूर्ण लातूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. अवघ्या 21 वर्षांचं वय…

आयुष्याची सुरुवात होण्याआधीच अमितचा असा दुर्दैवी शेवट झाला. एका कुटुंबाने आपला मुलगा गमावला आहे. कारण एखाद्या तरुणाचा पोलीस ठाण्यात मृत्यू होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची होती आणि पहाटेच्या त्या काही तासांत काय घडलं, याचा खुलासा होणं गरजेचं आहे. केवळ आत्महत्या की घातपात, एवढ्यापुरताच हा तपास मर्यादित न राहता, या घटनेला जबाबदार असलेल्या प्रत्येकाची भूमिका तपासली जाणं महत्त्वाचं आहे. आता या संपूर्ण प्रकरणात CID च्या तपासातून कोणते धक्कादायक खुलासे होतात? पोस्टमॉर्टेम अहवालात नेमकं काय समोर येतं? आणि अमितच्या मृत्यूमागचं खरं कारण काय असतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read About : Pune Doctor Job Scam : सरकारी नोकरीच्या आमिषाने 11 डॉक्टरांची फसवणूक? प्रत्येकी 10 लाखांचा आरोप!
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.