Ad Advertisement Ad Advertisement

Schools Property Tax Refund 2026- शाळांकडून वसूल केलेला कोट्यवधींचा मालमत्ता कर व्याजासह परत करा!

शिक्षण संस्था महामंडळाचा महानगरपालिकांना थेट इशारा
बेकायदा वसुलीविरोधात आरपारच्या लढ्याची तयारी

छत्रपती संभाजीनगर : Schools Property Tax Refund – शाळा चालवायच्या की महानगरपालिकांचा कर भरण्यासाठी निधी उभा करायचा? असा संतप्त सवाल उपस्थित करत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने राज्यातील महानगरपालिकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अनुदानित आणि धर्मादाय तत्त्वावर चालणाऱ्या शैक्षणिक संस्थांकडून वर्षानुवर्षे वसूल केलेला कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर आता व्याजासह परत करा, अशी थेट मागणी महामंडळाने केली आहे. केवळ यापुढील करमाफी पुरेशी नसून, आजवर झालेल्या कथित बेकायदा वसुलीचा हिशेबही द्यावा लागेल, असा पवित्रा संस्थाचालकांनी घेतला आहे.

राज्य शासनाने २० नोव्हेंबर २०२६ रोजी शासन निर्णय काढून शैक्षणिक संस्थांना मालमत्ता करातून दिलासा दिला आहे. मात्र, या निर्णयामुळे आधीच वसूल केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कराचे काय, हा महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे संबंधित महानगरपालिकांनी वसूल केलेली रक्कम व्याजासह परत करावी किंवा आगामी करामध्ये समायोजित करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने पत्रकार परिषदेत केली.

यावेळी माजी आ. विजय गव्हाणे, एम. के.देशमुख, वाल्मिक सुरासे, मनोज पाटील, एस. पी. जवळकर उपस्थित होते. महामंडळाचे सरकार्यवाह विजय गव्हाणे यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम १३२ (१) (ब) नुसार सार्वजनिक धर्मादाय प्रयोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या इमारती आणि जमिनींना सामान्य करातून सूट देण्याची तरतूद आहे. कायद्यात स्पष्टपणे करमाफीची तरतूद असतानाही अनेक महानगरपालिकांनी शैक्षणिक संस्थांकडून मालमत्ता कराची सक्तीने वसुली केली. एवढेच नव्हे, तर कर भरण्यासाठी नोटिसा बजावणे, शाळांना सील ठोकणे आणि जप्तीच्या कारवाईच्या धमक्या देण्याचे प्रकारही घडल्याचा आरोप महामंडळाने केला आहे.

२०२२ मध्ये विधानसभेतील लक्षवेधी सूचनेदरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कायद्यातील करमाफीच्या तरतुदीचा उल्लेख केला होता. तरीदेखील अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्थांकडून कर वसुली सुरूच राहिल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे संस्थाचालकांना आर्थिक आणि प्रशासकीय त्रास सहन करावा लागला. या विरोधात महामंडळाने न्यायालयीन तसेच आंदोलनात्मक लढा दिला.

नगरपरिषद, नगरपंचायतींनाही करमाफी द्या!


महामंडळाचा लढा केवळ महानगरपालिकांपुरता मर्यादित राहणार नाही. नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांनाही करमाफीचा लाभ मिळावा, यासाठी राज्य शासनाने तातडीने कायद्यात सुधारणा करावी किंवा स्वतंत्र अध्यादेश काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आगामी नागपूर अधिवेशनात शिक्षण संस्था प्रतिनिधी आणि शिक्षक आमदारांची बैठक घेऊन हा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन करमाफीच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली जाणार आहे.

शैक्षणिक संस्थांना दिलेली करमाफी केवळ कागदावर राहता कामा नये. भविष्यात कोणत्याही महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेने बेकायदा पद्धतीने मालमत्ता कराची वसुली केल्यास त्याविरोधात न्यायालयीन लढा उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही महामंडळाने दिला आहे.

Read About : Integrated Cancer Care Project – कर्करोगाचे निदान, उपचार आणि पाठपुरावा आता एकाच साखळीत, जिल्ह्यात 12 महिन्यांचा विशेष प्रकल्प
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.