Ad Advertisement Ad Advertisement

Integrated Cancer Care Project – कर्करोगाचे निदान, उपचार आणि पाठपुरावा आता एकाच साखळीत, जिल्ह्यात 12 महिन्यांचा विशेष प्रकल्प

तिशीनंतर कर्करोग तपासणीला प्राधान्य
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १२ महिन्यांचा विशेष प्रकल्प

छत्रपती संभाजीनगर :Integrated Cancer Care Project – कर्करोगाचे वाढते आव्हान लक्षात घेता रुग्णांना वेळेत निदान आणि दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. स्तनाचा कर्करोग, गर्भाशयमुखाचा कर्करोग आणि मुखाच्या कर्करोगाचे लवकर निदान करून रुग्णांना उपचारांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘एकात्मिक कर्करोग सेवा वितरण मॉडेल’ हा १२ महिन्यांचा प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे कर्करोग तपासणीपासून निदान, पुढील संदर्भ सेवा आणि प्रत्यक्ष उपचार सुरू होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अधिक सक्षम होणार आहे. विशेष म्हणजे, ३० वर्षांवरील पात्र नागरिकांची कर्करोग तपासणी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये स्तनांची वैद्यकीय तपासणी, गर्भाशयमुखाची दृश्य तपासणी आणि मुखाच्या कर्करोगाची तपासणी यांचा समावेश असेल. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर अनेकदा रुग्णांना पुढील तपासण्या आणि उपचारांसाठी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी प्रकल्पांतर्गत एकात्मिक रुग्ण मागोवा प्रणाली विकसित केली जाणार आहे.

बायोप्सी, एफएनएसी, इमेजिंग आणि हिस्टोपॅथॉलॉजी यांसारख्या निदान सुविधांना बळकटी दिली जाणार आहे. तसेच प्रगत कर्करोग उपचार केंद्रांशी समन्वय साधून रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. उपचार सुरू झाल्यानंतरही रुग्णांचा नियमित पाठपुरावा केला जाणार असून, उपचार अर्धवट सोडण्याचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. कर्करोगाबाबत समाजात असलेली भीती, गैरसमज आणि सामाजिक संकोच दूर करण्यासाठी जनजागृतीही केली जाणार आहे. गृहआधारित पॅलिएटिव्ह केअर सेवांचाही या उपक्रमात समावेश आहे.

श्वेतपत्रिका तयार करणार

या १२ महिन्यांच्या प्रकल्पातून मिळणारे अनुभव आणि निष्कर्ष यांच्या आधारे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग कार्यक्रम अधिक सक्षम करण्यासाठी धोरणात्मक टिपण आणि श्वेतपत्रिका तयार केली जाणार आहे. त्यातून या मॉडेलचा राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्यासाठी शिफारशी मांडण्यात येणार आहेत. कर्करोगाविरुद्धच्या लढाईत सर्वसामान्य नागरिकांना अधिक सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळेल.
डॉ. दयानंद मोतीपवळे (अतिरिक्त सहायक आरोग्य उपसंचालक)

लवकर तपासणी आणि जनजागृतीवर भर

हा प्रकल्प जिल्ह्यातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. उपक्रमामुळे कर्करोगाचे लवकर निदान, रुग्णांची वेळेत नोंदणी आणि उपचारांदरम्यान सातत्यपूर्ण पाठपुरावा हे महत्वाचे ठरेल. ‘तिशीचा पल्ला, तपासणी व सल्ला’ अभियानांतर्गत अधिकाधिक नागरिकांपर्यंत तपासणी सेवा पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
डॉ. अभय धानोरकर (जिल्हा आरोग्य अधिकारी)

Read About : Ugc Net December 2026 Exam – यूजीसी नेटचा बिगुल वाजला!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.