Ad Advertisement Ad Advertisement

Delhi Police Station Knife Attack : दिल्लीतील पोलीस ठाण्यातच 9 पोलिसांवर चाकूहल्ला; समुपदेशनासाठी बोलावलेल्या तरुणाला अटक

दुचाकी हिसकावून पळाल्यानंतर चितली कब्र परिसरात चकमक, पोलिसांच्या गोळीबारात दोन्ही पायांना दुखापत

नवी दिल्ली : Delhi Police Station Knife Attack कौटुंबिक वादावर समुपदेशनासाठी पोलीस ठाण्यात बोलावलेल्या ३० वर्षीय तरुणाने पोलिसांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दिल्लीतील जामा मशिद पोलीस ठाण्यात घडली. नबील असे आरोपीचे नाव असून, या हल्ल्यात सुरुवातीला पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर पळून जाताना दुचाकी हिसकावून त्याने चितली कब्र परिसरात पुन्हा पोलिसांवर हल्ला केला. या संपूर्ण घटनेत नऊ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, नबीलची आई आणि बहिणीने कौटुंबिक वादातून त्रास दिला जात असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर सोमवारी दुपारी सुमारे २.३० वाजता त्याला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. खिशात लपवून आणलेल्या चाकूने त्याने उपनिरीक्षक अजय यांच्यासह कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. उपनिरीक्षक अजय आणि अरविंद यांच्यासह पाच जण जखमी झाले. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुचाकी हिसकावून पळाला; पुन्हा पोलिसांवर वार

पोलीस ठाण्यातून पळाल्यानंतर नबीलने एका नागरिकाची दुचाकी बळजबरीने घेतली. पोलिसांच्या पथकाने चितली कब्र परिसरात त्याचा माग काढला. अटक करण्याचा प्रयत्न होताच त्याने पुन्हा चाकूने हल्ला केला. यात विशेष पथकाचे चार कर्मचारी जखमी झाले.

पोलिसांचा गोळीबार

स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी आठ गोळ्या झाडल्या. त्यापैकी सहा गोळ्या नबीलच्या कमरेखाली, दोन्ही पायांमध्ये लागल्या. त्याला ताब्यात घेऊन लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे.

दहशतवादी संबंधांचा तपास; ठोस कारण अद्याप अस्पष्ट

या प्रकरणात पोलीस ठाण्यातील हल्ला, दुचाकी हिसकावणे आणि दुसऱ्या हल्ल्याबाबत स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आरोपीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर गुप्तचर विभाग आणि इतर यंत्रणा संयुक्त चौकशी करणार आहेत. त्याचा डिजिटल व्यवहार, गुगल सर्च हिस्ट्री आणि संभाव्य बाह्य संबंध तपासले जात आहेत. मात्र, आतापर्यंत कोणताही दहशतवादी संबंध किंवा ठोस हेतू समोर आलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध २०२२ मध्येही धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. पुढील तपास सुरू आहे.

Read About : Hinjewadi IT Engineer Murder : प्रियकराकडून 27 वर्षीय प्रेयसीची हत्या; रात्रभर मृतदेहाशेजारी बसला!
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.