Ad Advertisement Ad Advertisement

Hinjewadi IT Engineer Murder : प्रियकराकडून 27 वर्षीय प्रेयसीची हत्या; रात्रभर मृतदेहाशेजारी बसला!

पुण्यातील हिंजवडीमध्ये प्रेमसंबंधातून धक्कादायक घटना; दुसऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून वाद, 27 वर्षीय कोमल डहाकेचा मृत्यू, प्रियकर शुभम काळबांडे पोलिसांच्या अटकेत.

Hinjewadi IT Engineer Murder : पुण्यातील हिंजवडी परिसरात IT इंजिनिअर हत्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.पुण्यातील हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधाचा अत्यंत धक्कादायक शेवट झाल्याची घटना समोर आली आहे. दोघेही उच्चशिक्षित, दोघेही नामांकित IT कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणारे आणि अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधात असलेले… इतकंच नाही, तर दोघांच्याही कुटुंबीयांची त्यांच्या लग्नालाही संमती होती. मात्र, याच नात्यात निर्माण झालेल्या संशयातून झालेल्या वादाचा शेवट एका तरुणीच्या मृत्यूने झाला. पुण्यातील हिंजवडीमध्ये 27 वर्षीय IT इंजिनिअर कोमल डहाके हिची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शुभम ज्ञानेश्वर काळबांडे याला अटक केली आहे.

कोण होती कोमल डहाके?

कोमल राजेंद्र डहाके ही मूळची वर्धा जिल्ह्यातील रहिवासी होती. ती पुण्यातील हिंजवडी परिसरातील एका नामांकित IT कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. तर आरोपी शुभम काळबांडे हादेखील एका नामांकित IT कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, कोमल आणि शुभम यांची काही वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमसंबंधात झालं. दोघेही हिंजवडी परिसरात नोकरी करत असल्याने एकाच भागात राहत होते. कोमल साखरेवस्ती परिसरातील प्रिस्टीन PG मध्ये राहत होती. त्यांच्या प्रेमसंबंधांची माहिती दोन्ही कुटुंबीयांना होती. विशेष म्हणजे, दोघांच्या लग्नालाही कुटुंबीयांची संमती होती.

दुसऱ्या तरुणीच्या संशयातून वारंवार वाद

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात वाद निर्माण होऊ लागले होते. शुभमचे दुसऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय कोमलला होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडणं होत असल्याची माहिती समोर आली आहे. हाच संशय पुढे इतका वाढला की, त्यातून या नात्याचा भयानक शेवट झाला.

हिंजवडीतील PG मध्ये नेमकं काय घडलं?

22 नोव्हेंबरच्या रात्री कोमल आणि शुभम दोघेही एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते कोमल राहत असलेल्या साखरेवस्ती परिसरातील प्रिस्टीन PG मध्ये परतले. मात्र, तिथे पुन्हा जुन्याच कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक स्वरूपात असलेला हा वाद पुढे अधिकच चिघळला.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मध्यरात्रीनंतर संतापलेल्या शुभमने कोमलला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच तिला जोरात धक्के दिले. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कोमलचा मृत्यू झाला.

रात्रभर मृतदेहाशेजारी बसून राहिला प्रियकर

या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, कोमलचा मृत्यू झाल्यानंतरही शुभम रात्रभर तिच्या मृतदेहाशेजारीच बसून होता. दुसरीकडे, कोमलचा फोन बंद येत असल्याने तिच्या कुटुंबीयांना चिंता वाटू लागली होती. त्यामुळे तिच्या आईने पुण्यात राहणाऱ्या भाच्याला कोमलची चौकशी करण्यासाठी PG वर पाठवलं.

सोमवारी सकाळी कोमलचा भाचा PG मध्ये पोहोचला आणि त्याने दरवाजा ठोठावला. त्यावेळी शुभमनेच दरवाजा उघडला. आत कोमलला उठवण्याचा प्रयत्न केला असता ती कोणताही प्रतिसाद देत नव्हती. त्यानंतर ती मृतावस्थेत असल्याचं समोर आलं.

दरम्यान, काही वृत्तांनुसार, सकाळी साडेसहाच्या सुमारास शुभमने स्वतः पोलिसांना फोन करून ॲम्ब्युलन्स पाठवण्याची मागणी केली होती.

तपासादरम्यान कोमलच्या मृत्यूमागे तिचा प्रियकर शुभम असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. उच्चशिक्षित आणि लग्नासाठी कुटुंबीयांची संमती असलेल्या या दोघांच्या प्रेमसंबंधाचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेमुळे हिंजवडी परिसरातील IT क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण-तरुणींमध्येही चर्चेला उधाण आलं आहे. सोशल मीडियावरून सुरू झालेली मैत्री, अनेक वर्षांचं प्रेम आणि लग्नापर्यंत पोहोचलेलं नातं… पण त्याच नात्यात निर्माण झालेला संशय एका तरुणीच्या आयुष्याचा शेवट करेल, याची कल्पनाही कुणी केली नसेल.

विशेष म्हणजे, दोघांच्याही कुटुंबीयांना त्यांच्या लग्नाला संमती होती. तरीही एका वादातून इतकी टोकाची घटना घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नेमका वाद कशामुळे आणि कोणत्या परिस्थितीत वाढला? या घटनेमागे आणखी काही कारणं होती का? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

एका बाजूला कोमलच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर दुसरीकडे या घटनेने पुन्हा एकदा नात्यांमधील संशय, राग आणि हिंसक वर्तनाचे गंभीर परिणाम समोर आणले आहेत. पोलिसांच्या पुढील तपासातून या संपूर्ण प्रकरणातील आणखी तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

Read About : Chikalthana Newborn Baby Death : कचऱ्यात फेकलेल्या नवजात मुलीचा दुर्दैवी मृत्यू!
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.