अंगणवाड्यांमध्ये ७८ टक्के, शाळांमध्ये ५४ टक्के उद्दिष्टपूर्ती!
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ४ लाख ४७ हजारांहून अधिक बालकांची आरोग्य तपासणी पूर्ण
छत्रपती संभाजीनगर : Child Health Screening – बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि लहान वयातच उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार करता यावेत, यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची (आरबीएसके) प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत अंगणवाड्या आणि शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, अंगणवाडीतील बालकांच्या तपासणीत ७८ टक्के, तर शालेय विद्यार्थ्यांच्या तपासणीत ५४ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे. या मोहिमेमुळे बालकांमधील जन्मजात व्यंग, विविध आजार, पोषणविषयक कमतरता, विकासात्मक विलंब आणि अपंगत्व यांसारख्या समस्या लवकर निदर्शनास येण्यास मदत होत आहे. त्यामुळे वेळेत उपचार मिळून बालकांचे आरोग्य आणि भविष्य अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून केला जात आहे.
जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी पहिल्या टप्प्यात १ लाख ८६ हजार ३९२ बालकांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ४४ हजार ७३९ बालकांची तपासणी पूर्ण झाली आहे. म्हणजेच ७८ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात ऑक्टोबर २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत पुन्हा १ लाख ८६ हजार ३९२ बालकांच्या तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. या टप्प्यात आतापर्यंत ५ हजार ७६७ बालकांची तपासणी झाली असून, २४ नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात ३६४ बालकांची तपासणी करण्यात आली.
दुसरीकडे, जिल्ह्यातील ६ ते १८ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी ५ लाख ५७ हजार ३७० विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ३ लाख ३ हजार २०५ विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झाली असून, ५४ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. २४ नोव्हेंबर रोजी एका दिवसात ५९८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
वेळीच निदान, उपचाराला प्राधान्य
बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने केवळ आजारांवर उपचार करण्यापेक्षा संभाव्य समस्या सुरुवातीलाच ओळखणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने आरबीएसके पथकांकडून अंगणवाड्या आणि शाळांमध्ये जाऊन नियमित तपासणी केली जात आहे. तपासणीदरम्यान आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या बालकांना आवश्यकतेनुसार पुढील तपासण्या, उपचार आणि संदर्भ सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विशेषत: जन्मजात व्यंग, पोषणाच्या समस्या आणि विकासात्मक विलंब असलेल्या बालकांना वेळेत आरोग्यसेवा मिळावी, यावर भर दिला जात आहे. बालकांच्या आरोग्य तपासणीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आरबीएसके पथकांना मोहिमेला अधिक गती देण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिले आहे.
Read About : Maharashtra Caste Validity Certificate Online 2026 Big Relief! – जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.