Ad Advertisement Ad Advertisement

Maharashtra Caste Validity Certificate Online 2026 Big Relief! – जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन!

अर्जासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही, सुनावणीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, ६० दिवसांत निर्णय घेण्याचे शासनाचे निर्देश, शैक्षणिक प्रयोजनासाठी १०० रुपये, नोकरी व इतर प्रयोजनांसाठी १ हजार रुपये शुल्क

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Caste Validity Certificate – राज्यातील विद्यार्थ्यांसह नागरिकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे जात प्रमाणपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून, अर्ज दाखल करण्यापासून ते आवश्यक कागदपत्रे सादर करणे आणि प्रमाणपत्र मिळविण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया डिजिटल माध्यमातून पूर्ण करता येणार आहेत. यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी करून मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या सहकार्याने आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांच्या तांत्रिक मदतीने ‘कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी इन्फॉर्मेशन सिस्टीम’ (सीसीव्हीआयएस) ही नवीन डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे अर्जदारांना वारंवार पडताळणी समितीच्या कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइन पाहता येणार असून, मंजूर झालेले जात वैधता प्रमाणपत्र ई-मेल आणि व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहे.

नवीन नियमानुसार जात वैधता प्रमाणपत्रासाठी केवळ ऑनलाइन प्रणालीद्वारेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अन्य मार्गाने सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, दस्तऐवजी पुरावे आणि शपथपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. मूळ किंवा प्रमाणित कागदपत्रांच्या वाचनीय प्रती अपलोड करणे बंधनकारक असेल. ऑनलाइन अर्ज आणि कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांची प्रिंटआउट काढून समितीच्या कार्यालयात जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही. अर्जदाराच्या आधार क्रमांकाशी ही प्रणाली जोडण्यात आली असल्याने एकाच व्यक्तीला एकच अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे अर्ज भरताना आणि कागदपत्रे अपलोड करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जात नोंद आणि रहिवासाचे पुरावे आवश्यक

अर्जदाराला नियम १६ नुसार विहित केलेल्या पुराव्यांपैकी जातीच्या नोंदीसंबंधी आणि मानीव दिनांकापूर्वीच्या रहिवासासंबंधी प्रत्येकी किमान एक दस्तऐवजी पुरावा सादर करावा लागेल. संबंधित पुरावा उपलब्ध नसल्यास स्वयंघोषणापत्र सादर करता येईल. मात्र, आवश्यकतेनुसार समितीला अतिरिक्त पुरावे मागविण्याचा अधिकार राहणार आहे. ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर सर्वप्रथम समितीच्या कार्यालयातील लिपिक अर्जाची तांत्रिक तपासणी करणार आहे. अर्जातील माहिती, अपलोड केलेली कागदपत्रे आणि त्यांची वाचनीयता तपासली जाईल.

त्रुटी आढळल्यास अर्जदाराला त्या दुरुस्त करण्यासाठी अर्ज परत पाठविला जाईल. त्यानंतर सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी अर्ज आणि पुराव्यांची गुणवत्तेच्या आधारे तपासणी करतील. जातीचा दावा आणि रहिवास सिद्ध झाल्यास अर्ज पुढील निर्णयासाठी समितीच्या अध्यक्ष व सदस्यांकडे पाठविण्यात येईल. सर्व सदस्यांनी वैधतेचा निर्णय नोंदविल्यानंतर प्रणालीमध्ये प्रमाणपत्र तयार होईल आणि उपायुक्तांच्या डिजिटल स्वाक्षरीने ते निर्गमित केले जाईल. कागदपत्रांची संबंधित आस्थापनांकडून पडताळणी करणे, दक्षता पथकामार्फत चौकशी करणे, अतिरिक्त पुरावे मागविणे किंवा अर्जदाराला कारणे दाखवा नोटीस बजावणे अशा कार्यवाहीचीही तरतूद करण्यात आली आहे.

सुनावणीसाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

अर्जदाराला सुनावणी देण्याची आवश्यकता असल्यास ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन घेतली जाणार आहे. विशेष आणि अपवादात्मक परिस्थितीत बार्टीच्या महासंचालकांची खात्री झाल्यानंतरच प्रत्यक्ष सुनावणीला परवानगी दिली जाऊ शकते. दक्षता पथकाच्या अहवालानंतर जातीच्या दाव्याबाबत शंका असल्यास अर्जदाराला नमुना २५ अंतर्गत कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा करण्याची संधी दिली जाईल. अर्जदाराला वाजवी संधी आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी दिल्याशिवाय जात दावा अवैध ठरविता येणार नाही, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

६० दिवसांत निर्णय; पाचव्या महिन्यात अंतिम संधी

जात वैधता प्रमाणपत्राबाबतचा निर्णय शक्यतो ६० दिवसांच्या आत घेण्याचे निर्देश समित्यांना देण्यात आले आहेत. निर्णयाची माहिती एसएमएस, व्हॉट्सॲप आणि ई-मेलद्वारे अर्जदाराला कळविण्यात येईल. अर्जात त्रुटी असल्यास त्यांची पूर्तता करण्यासाठी पुढील दोन महिने ऑनलाइन प्रणालीद्वारे सूचना दिल्या जातील. तरीही त्रुटींची पूर्तता न झाल्यास पाचव्या महिन्यात अंतिम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुनावणीची संधी दिली जाईल. त्यानंतरही अर्जदाराने प्रतिसाद न दिल्यास किंवा आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास प्रकरण निकाली काढण्यात येईल.

प्रयोजनानुसार सुधारित शुल्क

शैक्षणिक प्रयोजनासाठी – १०० रुपये
ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी – ५०० रुपये
शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी – १ हजार रुपये
सेवाविषयक प्रयोजनासाठी – १ हजार रुपये
शासकीय योजनांचा लाभ किंवा सवलतींसाठी – १ हजार रुपये

Click Here: Apply for Caste Validity Certificate Online

Read About : Schools Property Tax Refund 2026- शाळांकडून वसूल केलेला कोट्यवधींचा मालमत्ता कर व्याजासह परत करा!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.