मॅकिन्सेच्या अहवालानुसार, एजंटिक एआयमुळे एका जीवन विज्ञान कंपनीत नियोजनासाठी लागणारे मनुष्यबळाचे तास ८३ टक्क्यांनी कमी झाले
नवी दिल्ली : Agentic AI Business Planning व्यवसाय करायचा, परंतु त्याचे नियोजन डोक्याला ताण असतो, अशा समजुतीने तुम्ही व्यवासायात उतरत नसाल तर एक चांगली बातमी आहे. आता तुम्ही व्यवसायात लक्ष घाला, नियोजन कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) पुढचे पाऊल मानले जाणारे ‘एजंटिक एआय’ करू शकतील. ते कंपन्यांच्या व्यवसाय नियोजनाचा वेळ आणि कामाचा ताण मोठ्या प्रमाणात कमी करू शकते, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष जागतिक सल्लागार संस्था ‘मॅकिन्से’च्या ताज्या अहवालात काढण्यात आला आहे.
एका यशस्वी प्रयोगात या तंत्रज्ञानामुळे नियोजनासाठी लागणारे मनुष्यबळाचे तास ८३ टक्क्यांनी कमी झाले असून, अंदाजातील चुकांचे प्रमाणही सुमारे ५० टक्क्यांनी घटल्याचे स्पष्ट झाले आहे. अहवालानुसार, ‘प्रॉडक्टिव्ह एआय’ आणि ‘एआय एजंट्स’ यांची सांगड घातल्यास कंपन्यांना ठराविक काळानंतर अंदाज बांधण्याऐवजी सातत्यपूर्ण आणि जलद निर्णय घेणे शक्य होईल. माहितीचे विश्लेषण करणे आणि योजनांची अंमलबजावणी करणे यातील मानवी कष्ट यामुळे मोठ्या प्रमाणात वाचणार आहेत.
जीवन विज्ञान क्षेत्रातील यशस्वी प्रयोग
मॅकिन्सेने एका जीवन विज्ञान (लाईफ सायन्सेस) कंपनीसोबत केलेल्या कामाचा दाखला या अहवालात दिला आहे.
या कंपनीच्या मासिक नियोजन प्रक्रियेत पूर्वी सुमारे १०० बैठका होत असत आणि काही भागांत ८ ते १० वेळा बदल करावे लागत होते.
एआय-आधारित अंदाज आणि स्वयंचलनाचा (ऑटोमेशन) वापर करून ही प्रक्रिया नव्याने आखल्यानंतर अंदाजातील चुका ५० टक्क्यांनी कमी झाल्या आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास तब्बल ८३ टक्क्यांनी वाचले.
‘एआय एजंट्स’ नेमके काय करू शकतात?
मॅकिन्सेच्या मते, हे स्मार्ट एआय एजंट्स खालील कामे अत्यंत अचूकपणे पार पाडू शकतात:
- माहिती गोळा करणे आणि तिची योग्य मांडणी करणे.
- अनपेक्षित निकालांची कारणे शोधणे आणि गृहितकांची चाचणी घेणे.
- अंदाजात झालेल्या बदलांचे स्पष्टीकरण देणे आणि पुढील कार्यवाहीची शिफारस करणे.
- ठराविक मर्यादेत राहून मंजूर झालेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे, तसेच अधिक गुंतागुंतीची किंवा जोखमीची प्रकरणे मानवी कर्मचाऱ्यांकडे सोपवणे.
केवळ अचूक अंदाज बांधणे हे उद्दिष्ट नसून व्यवसायाची एकूण कामगिरी सुधारणे हे खरे ध्येय असल्याचे अहवालात म्हटले आहे. संशोधनानुसार, अंदाजाची अचूकता प्रत्येक १ टक्क्याने सुधारल्यास तयार मालाच्या साठ्यात सरासरी २.७ टक्क्यांपर्यंत कपात करता येते. रसायन उद्योगात या तंत्रज्ञानामुळे पहिल्याच टप्प्यात अचूकता १५ ते २० टक्क्यांनी वाढली, तर अतिरिक्त मालाचा साठा २० ते ३० टक्क्यांनी कमी झाला.
तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा
पूर्णपणे स्वायत्त ‘एजंटिक सेल्स अँड ऑपरेशन्स प्लॅनिंग’ अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असल्याचेही अहवालाने स्पष्ट केले आहे. सध्या बहुतांश ठिकाणी एआय केवळ शिफारसी करते आणि त्यावर अंतिम मंजुरी माणसालाच द्यावी लागते.
आता केवळ आकडेवारी तयार करणे हे दुर्मीळ कौशल्य राहिलेले नाही; तर एआय-आधारित निर्णय प्रणालीवर देखरेख ठेवणे आणि ही प्रणाली कधी चुकत आहे हे ओळखणे, हेच खरे कौशल्य ठरले आहे, असे मॉकिन्से अहवालात म्हटले आहे.
Read About : Ultimate Smile AI : आता दंतवैद्याकडे जाण्यापूर्वीच पाहा तुमचे भविष्यातील हास्य; अवघ्या 10 सेकंदांत मिळणार स्माईल प्रिव्ह्यू
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.