Ad Advertisement Ad Advertisement

Gregor Mendel Father of Genetics : जनुकशास्त्राचा पिता मेंडेल!

Gregor Mendel Father of Genetics : मागील काही वर्षांपासून जीएम वाणांची चर्चा सुरू आहे. हे वाण अधिक उत्पादन देतात. त्यांचे मानवी शरीरावर अनिष्ट परिणाम होतात किंवा नाही, हे नेमके अजूनही स्पष्ट झालेले नाही. एक मात्र खरे, या वाणांनी मानवाची भूक भागवण्यामध्ये मोठे योगदान दिले आहे. मात्र, दोनशे वर्षांपूर्वी अशा प्रकारचे वाण तयार करता येतात याची कोणी कल्पनाही केली नव्हती. सेग्रिगेशनच्या सिद्धांतानुसार आई किंवा वडील यांच्यातील गुणसूत्रांमध्ये प्रत्येक गुणधर्मासाठी एक-एक घटक असतो, त्यामुळे प्रत्येक मूल आईचे किंवा वडिलांचे अंशत: किंवा पूर्ण गुण घेते. ज्याकाळी ‘जनुक’ संकल्पनाच नव्हती, त्या काळात संकर प्रक्रियेची सुरुवात करणारा संशोधक म्हणजे ग्रेगर मेंडेल.

जर्मन वंशाच्या अँटन आणि रोझीन या दाम्पत्याच्या पोटी मेंडेल यांचा जन्म २२ जुलै १८२२ रोजी झाला. ऑस्ट्रियातील अँटन यांची थोडी फार शेती होती. या शेतात मेंडेल यांचे बालपण गेले. त्यावेळी ते मधुमक्षिकापालनाच्या कामाचेही निरीक्षण करत. त्यांनी ओपावा येथील शाळेत प्रवेश घेतला, मात्र सातत्याने आजारी पडत असल्याने त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण होण्यास विलंब लागला. वारंवार आजारी पडूनही त्यांनी ज्ञानार्जनाचा ध्यास सोडला नाही. आपले शालेय शिक्षण पूर्ण करून १८४० मध्ये त्यांनी ओलमोक विद्यापीठात प्रवेश घेतला. हुशार असूनही, घरच्या परिस्थितीमुळे आणि नेहमीच्या आजारपणामुळे शिक्षण पूर्ण होण्यास विलंब लागला. वडिलांना मात्र मुलाने शिक्षण थांबवावे आणि शेतीत करावी असे वाटे.

अखेर मेंडेल यांच्या शिक्षणासाठी धाकटी बहीण थेरेसियाने लग्नासाठी साठवलेले पैसे दिले. मेंडेल यांनीही पुढे थेरेसियांच्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन परतफेड केली. यातील दोघे डॉक्टर झाले. बहिणीने पैसे दिले तरी आर्थिक प्रश्न सुटत नव्हता. शेवटी कमी खर्चात शिक्षण घेण्यासाठी त्यांनी एका मिशनरीमध्ये प्रवेश घेतला. वयाच्या एकविसाव्या वर्षी ते ब्रुनो येथील चर्चमध्ये आले. हा चर्च शिक्षणासाठी प्रसिद्ध होता. तेथील वाचनालयात त्या काळात वीस हजारांपेक्षा जास्त ग्रंथ होते.

शास्त्रीय विचारांना तेथे प्रोत्साहन देत. मेंडेल यांच्यावर कृषी विषयाचे शिक्षक नेसलर यांचा मोठा प्रभाव पडला. त्यांनी मेंढीवर अनुवांशिकतेचे प्रयोग केले होते. सुरुवातीस त्यांनी सहाय्यक शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मूलत: मेंडेल यांना गणित, भौतिकशास्त्र आणि तत्वज्ञान विषयात रूची होती. मात्र, पूर्णवेळ शिक्षक होण्यासाठी त्यांना शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांना व्हिएन्ना येथे पाठवण्यात आले. मात्र, ते उत्कृष्ट शिकवू शकत असतानाही लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झाले. तेथे त्यांना ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ डोपलर यांचा सहवास लाभला. पुन्हा ते ब्रुनो येथे भौतिकशास्त्राचे शिक्षक म्हणून रूजू झाले. पुन्हा एकदा त्यांना शिक्षक प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. मात्र ते पुन्हा अनुत्तीर्ण झाले. तरीही हा भावी वैज्ञानिक आपल्या शिक्षणकौशल्याने विद्यार्थीप्रिय ठरला.

भौतिकशास्त्र शिकवत असले तरी त्यांची जीवशास्त्राची ओढ कायम होती. नेसलरही त्यांना जीवशास्त्रीय प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन देत होते. खगोलशास्त्र आणि हवामानशास्त्रातील प्रयोगासोबत ते उंदरावरही काही अनुवांशिकते संदर्भात प्रयोग करत. याबाबत वरिष्ठ नाराज झाले. त्यांना उंदरावरील प्रयोग थांबवावे लागले, मात्र त्यांना अनुवांशिकतेसंदर्भात संशोधन करावयाचे होते. त्यांना त्यातील नवे ज्ञान समजून घ्यायचे होते. वरिष्ठांनी त्यांची रूची पाहून अखेर अनुवांशिकतेवरील प्रयोग वनस्पतींवर करण्यास अनुमती दिली. मेंडेलनी १८५६ पासून वाटाण्यावर संशोधन सुरू केले.

त्यांनी वाटाण्याच्या बियांचा पृष्ठभाग, वाटाण्याचा रंग, फुले येण्याचे ठिकाण, उंची, फुलांचा रंग, शेंगांचा आकार आणि शेंगांचा रंग असे सात गुणधर्म निश्चित केले आणि त्यावर प्रयोग सुरू केले. असे वेगवेगळे गुणधर्म असणाऱ्या वाटाण्यांची रोपे स्वतंत्र वाढवायची आणि फुले आल्यानंतर त्यांच्यामध्ये मिश्र फलन घडवून आणावयाचे प्रयोग त्यांनी केले. प्रत्येक तयार होणाऱ्या रोपांच्या, फुले, फळे आणि बियांच्या नोंदी काळजीपूर्वक करण्यात येत होत्या. एका पिढीनंतर दुसऱ्या पिढीत कोणते गुणधर्म कसे आले आहेत याची ते तुलना करत. हे काम अत्यंत किचकट आणि जिकीरीचे होते. मेंडेल ते अत्यंत काळजीपूर्वक करत होते. पहिल्या पिढीमध्ये आढळलेले निष्कर्ष अत्यंत निराशाजनक होते. त्यांनी पुन्हा पहिल्या पिढीचे मिश्र फलन घडवून आणले. पूर्वीप्रमाणेच नोंदी ठेवल्या आणि त्यांना जनुकशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचे जनुकशास्त्राचा पाया घालणारे निष्कर्ष मिळू लागले.

बुटक्या झाडांसोबत मिश्र फलन घडवूनही पुढच्या पिढीतील सर्वच रोपे उंच झाली. त्या काळच्या आकलनाप्रमाणे ती मध्यम उंचीची येणे आवश्यक होते. यावरून त्यांनी अनुवांशिकता ठरवणारे एक दुर्बल आणि एक प्रबळ असे दोन घटक असावेत असा निष्कर्ष काढला आणि सेग्रिगेशन आणि इंडेपंडंट असॉर्टमेंटचा सिद्धांत मांडला. वेगळ्या शब्दांत आई आणि वडिलांमध्ये प्रत्येक गुणधर्मासाठी एक घटक असतो. त्या गुणधर्माचा घटक जर आईचा प्रबळ असेल, तर तो गुण मुलात उतरतो. वडिलांचा त्या घटकाचा गुण प्रबळ असेल तर तो मुलामध्ये येतो, त्यामुळे मूल अंशत: किंवा पूर्णत: आई किंवा वडिलांप्रमाणे असते. समजा आई गोरी आणि बुटकी असेल आणि वडील काळे आणि उंच असतील तर मुलगा गोरा आणि उंचही होऊ शकतो.

मेंडेल यांच्या आकलनाने आणि त्यानुसार केलेल्या मांडणीतून विज्ञानातील ‘जनुकशास्त्र’ या नव्या अभ्यासविषयाची सुरुवात झाली. त्यांचे संशोधन १८५६ मध्ये प्रसिद्ध झाले. मात्र, समाजाने ते स्वीकारले नाही. संशोधन नजरेआड झाल्यानंतर काही संशोधकांनी या विषयावर प्रयोग केले, त्यांना हेच निष्कर्ष मिळाले. त्यांनी ते आपले संशोधन म्हणून जाहीर केले तेव्हा अनेकांना मेंडेलच्या कार्याचे महत्त्व उमगले. एका नव्या अभ्यासविषयाचा पाया घालणाऱ्या या संशोधकाचे ६ जानेवारी १८८४ रोजी निधन झाले.

डॉ. व्ही.एन. शिंदे
संपर्क : ९६७३७८४४००

Read About : Fake Gold Hallmark Scam : चकाकते, ते सारे सोने नव्हे!
E-Paper : Punyanagari E-Paperसंपादकीय

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.