मनोज जरांगे यांच्याकडून पेनड्राइव्ह सुपूर्द; सील करून पंचनामा, घेतली सही
वडीगोद्री (जि. जालना) : Manoj Jarange SIT Probe 500 Cr Audio Clip – मराठा आंदोलन मागे घेण्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या कथित ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) बुधवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास महाकाळा (ता. अंबड) येथील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. पथकाने जरांगे यांच्याकडून ऑडिओ क्लिप असलेला पेनड्राइव्ह ताब्यात घेतला. हा पेनड्राइव्ह सील करून व्हिडीओग्राफीसह पंचनामा करण्यात आला. तसेच, सीलबंद पेनड्राइव्हवर जरांगे यांची स्वाक्षरीही घेण्यात आली.
मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलन संपविण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाचशे कोटी रुपये दिल्याचा आरोप केला होता. या कथित व्यवहारासंदर्भातील ऑडिओ क्लिपही त्यांनी पत्रकार परिषदेत ऐकवली होती. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या क्लिपमधील संभाषणाची सत्यता आणि त्यामागील वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती.
आयपीएस अधिकारी शैलेष बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी पथकातील तीन ते चार अधिकारी बुधवारी महाकाळा येथे जरांगे यांच्या निवासस्थानी पोहोचले. मुंबई सायबर विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जरांगे यांची चौकशी केली. यावेळी कथित ऑडिओ क्लिप असलेला पेनड्राइव्ह ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पेनड्राइव्ह सील करून पंचनामा करण्यात आला असून, संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले.
मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार
दरम्यान, अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे यांच्याविरोधात मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने अंबड पोलिसांनी बारस्कर यांना पत्र पाठवून जबाब नोंदविण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार बारस्कर यांनी मंगळवारी अंबड पोलीस ठाण्यात उपस्थित राहून आपला जबाब नोंदविला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एसआयटीचे पथक जरांगे यांच्या निवासस्थानी दाखल झाले.
तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही
एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी जरांगे यांच्याशी नेमकी काय चर्चा केली, तसेच चौकशीत कोणती माहिती समोर आली, याचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. आता ताब्यात घेतलेल्या पेनड्राइव्हमधील ऑडिओ क्लिपची तांत्रिक तपासणी करून तिची सत्यता पडताळण्याची पुढील प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
Read About : Sonia Gandhi Belonging Memoir – ‘मला वस्तुस्थिती स्पष्ट करायची होती’
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.